top of page
shrimeherbaba

उत्पत्तीच्या कथानकावरील उपासनी महाराज आणि मेहेर बाबांचे भाष्य

आज रमदान ईद आहे (ईद-अल-फत्र) आणि मुस्लिम लोक महिन्याभराचे रमदान रोजे आजच्या उत्सवाने संपन्न करतात. हे रोजे आणि हा उत्सव मोहम्मद पैगंबरांनी स्वतः सुरु केलेली परंपरा आहे आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे की पैगंबर मेहेरबाबांच्या पूर्वीचा अवतार आहे. आज अक्षय्य तृतीया (आखा-तीज किंवा आखाजी) पण आहे. आजच्या दिवशी गरीब सुदाम्याने आपल्या मित्राला - भगवान श्रीकृष्णाला पोहे दिले होते आणि श्रीकृष्णाने ते प्रेमाने स्वीकारून त्याला आशीर्वाद दिला होता. आज विष्णूच्या सहाव्या अवताराची - परशुरामाची जयंती देखील साजरी केली जाते. आजच्याच दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली होती असे म्हणतात. आणि आजच महर्षी व्यासांनी महाभारताचे लेखन सुरु केले होते. आज लिंगायत गुरु बसवराज स्वामींची देखील जयंती आहे. बसवराजांनी दक्षिण भारतात भक्ती संप्रदायाला मोठे स्वरूप दिले होते. पूर्वीच्या अवतारांच्या आणि सद्गुरुंच्या संबंधित विशेष असलेल्या आजच्या दिवसासाठी या निरनिराळ्या परंपरा पाळणाऱ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.


ह्या परंपरांचा आणि उत्सवांचा खरा मतितार्थ मेहेरबाबाच सांगू शकतील. मेहेरबाबांनी सांगितले आहे की, मेहेरबाबा प्रेमींना ह्या सर्व परंपरा पाळायची आवश्यकता नाही आणि त्यांचे नामस्मरण करून आपण थेट त्यांचाशी - ह्या युगाच्या अवताराशी - संपर्क करू शकतो. पण, मेहेरबाबांनी हे देखील सांगितले आहे की, ह्या लोकपरंपरा आणि निरनिराळ्या उत्सवांच्या पाठीमागे महत्वाच्या घटनांचा संदर्भ असतो, ज्या पूर्वीच्या अवतारांच्या आणि सद्गुरुंच्या जीवनातील प्रसंगाशी निगडित असतात आणि निदान त्यांचा उल्लेख करून हे उत्सव साजरे करणाऱ्या लोकांना अभिवादन करण्यास काहीच हरकत असू नये. आज विविध धर्म मतांच्या लोकांमध्ये विरोधाचे, हिंसेचे वातावरणात आहे. पण जगातल्या विविध धर्म, संप्रदाय आणि परंपरा यांच्या मधील पराकोटीला गेलेला बेबनाव बघून आज तरी त्या ऐक्याचे प्रकटीकरण झालेले दिसत नाही. बाबांनी स्पष्ट केलेल्या सृष्टी उत्पत्तीच्या कथानकात सर्वच धर्मांनी या संदर्भात कसे एकच सांगितले आहे, हे समजावून दिले आहे. बाबाप्रेमी ह्याचे श्रद्धेने वाचन करून उर्वरित समुदायांना आणि जनमानसाला हे ऐक्य दाखवायला मदत करू शकतात. सर्वच धर्म मते, परंपरा ह्यांना एकत्र करून त्यांना एकाच माळेत बांधण्याचे वैश्विक कार्य मेहेरबाबांनी केले आहे, त्यात आपण सहभागी होऊ शकतो.


मेहेरबाबांनी स्पष्ट केले आहे की, अवतार हाच पहिला सद्गुरू होता आणि त्यामुळे त्याला त्यानंतर येणाऱ्या सर्व सद्गुरूंचा पिता असेही म्हंटले आहे.


जेंव्हा प्रत्येक युगात अवतार येतो, तो आपल्या ईश्वरीय स्वरूपात सृष्टीमधे येऊ शकत नाही, कारण त्याने तसे केल्यास सृष्टीला हानी पोहचू शकते. “जो पडदा पांघरून अवतार सृष्टीमध्ये प्रवेश करतो, तो पडदा तत्कालीन पाच सद्गुरू अवतारावर पांघरत असतात. त्यांनी तसे केले नसते आणि अनावृत्त स्थितीतच अवताराचा सृष्टीत प्रवेश झाला असता, तर सत्य तत्व आणि भासमान मायेमध्ये जे संतुलन सृष्टीमध्ये उपलब्ध असते, त्यांच्यात प्रचंड असंतुलन निर्माण झाले असते. पण, जेंव्हा अवताराच्या पडद्याच्या अनावरणाची योग्य वेळ येते, तेंव्हा तो हा पडदा अनावृत्त करीत असतात. त्या क्षणापासून अवतार आपले अवतारी कार्य सुरु करतो.” (मेहेरबाबांच्या “बीम्स” किंवा “अध्यात्मिक क्षितिजावर टाकलेले प्रकाशझोत” ह्या पुस्तकातून) तसे केल्यामुळे अवतार, जो पिता असतो, त्या सद्गुरुंचे शिष्यत्व पत्करतो.


ह्या अवतारकालात मेहेरबाबांनी सांगितले आहे :


“साई बाबांनी मला माझ्या सत्य स्थिती बाबत (मी अवतार आहे) ठामपणे सांगायला सांगितले, बाबाजाननी मला मी कोण आहे ह्याची जाणिव दिली आणि उपासनी महाराजांनी मला मी कोण आहे ह्याचे ज्ञान दिले. बाबाजाननी मला दैवी आनंद दिला, साई बाबांनी मला दैवी शक्ती दिली, तर उपासनी महाराजांनी मला दैवी ज्ञान दिले.” (मेहेर बाबा द कम्पॅशनेट वन ह्या पुस्तिकेमधून, व्हाईट हॉर्स बर्कले कॅलीफॅार्निया प्रकाशन)


उपासनी महाराजांनी १९२३-२४ साली साकोरी येथे आपल्या प्रवचनांमध्ये ‘सृष्टीच्या उत्पत्तीच्या’ कथानकाबद्दल अतिशय विपुलतेने स्पष्टीकरणे दिली आहेत. मेहेरबाबांनी देखील आपल्या अवतारकाळात याच कथानकावर वेळोवेळी नवीन माहिती दिली आहे, कारण या अवतारकाळाचे हे एक महत्वाचे कार्य होते आणि त्याचा पायाच महाराजांनी १९२३-२४ मध्ये घातला होता. मेहेरबाबांनी दिलेली माहिती विज्ञानावर आधारित, संरचित आणि आधुनिक भाषेचा उपयोग करून (म्हणजे आधुनिक प्रतीके, उदाहरणे ह्यांचा उपयोग करून) दिलेली आहे, तर महाराजांची प्रवचने ग्रामीण मराठीत, अशिक्षित लोकांनाही समजेल अशा भाषेत दिली आहेत, हा फरक असला तरी दोघांचा विषय आणि आशय एकच आहे. अवताराच्या कार्याची व्याप्ती आणि त्याचा संबंध जगातील सर्वच जाती, धर्म परंपरांशी येत असल्यामुळे अवताराची भाषा देखील या सर्वांनाच अभिगम्य असावी लागते. तिचे संदर्भ देखील आजच्या वैज्ञानिक युगाला अनुसरून असावे असे आहेत.


उपासनी महाराजांच्या प्रवचनाचा एक विशेष म्हणजे त्यांचे संस्कृत भाषेवर असलेले प्रभुत्व. संस्कृत शब्दांच्या व्युत्पत्तीची त्यांना विशेष जाण होती. याचा उपयोग करून, ते अनेक मराठी शब्दांचे आणि मराठी नावांचे खरे अध्यात्मिक अर्थ आपल्या प्रवचनात सांगत असत. महाराजांनी ह्या विषयावर जी अनेक प्रवचने दिली आहे, त्यातील एकाचा काही भाग खाली देत आहे (हे प्रवचन महाराजांनी २९ जुलै १९२४ रोजी दिले आहे आणि त्यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाच्या पहिल्या खंडात आहे - पृष्ठ संख्या २४०-२४१). ‘ज्ञान आणि अज्ञान’ या विषयावरील मेहेरबाबांच्या पुस्तकातील मजकूरात आणि ह्यामध्ये विलक्षण साम्य दिसून येते.


मी प्रथम महाराजांच्या प्रवचनाचा (खंड एक, पृष्ठ संख्या २४०-२४१, दिनांक २९ जुलै १९२४) उतारा देत आहे. त्यानंतर लगेच मेहेरबाबांनी ह्याच विषयावर - ज्ञान आणि अज्ञान - केलेले विश्लेषण देत आहे.


ज्ञान शब्दाची दोन मुळाक्षरे आहेत - ज्ञ आणि न, म्हणजेच ‘कळणे’ आणि ‘नाही’. म्हणजेच ज्ञानाचा अर्थ झाला ‘न कळणे’. जेंव्हा आपल्याला सद्गुरूंकडून ज्ञान प्राप्त करायचे असते, त्याचा अर्थ होतो आपणाला जगातील कोणत्याही घटना अथवा परिस्थितीबाबत ‘न कळणे’ अशी स्थिती हवी असते. (सामान्यतः ज्ञान ह्याचा अर्थ ‘कळणे’ असा घेतला जातो - एका अर्थाने ते बरोबरच आहे, कारण जगातील कोणत्याही घटना अथवा परिस्थितीबाबत ‘न कळणे’ अशी स्थिती अंततः अनंत आनंदाची जाणीव होणाऱ्या अनुभवात होते. म्हणूनच, ‘ज्ञान’ चा खरा (मूळ) अर्थ ‘न कळणे’ असा जरी असला, तरी त्याचा प्रापंचिक अर्थ ‘कळणे’ असा घेतला जातो).


ज्ञान म्हणजे केवळ ‘कळणे’ - ‘कळणे’ ही अवस्था स्वतःच्या स्थितीचा अनुभव घेऊ शकत नाही. ‘न कळणे’ ह्या स्थितीची तेंव्हाच कल्पना करू शकतो, जेंव्हा काही तरी वस्तू अथवा स्थिती ‘कळण्यायोग्य’ असेल - म्हणूनच ज्ञान ह्या शब्दामध्ये ‘न’ चा क्रम ‘ज्ञ’ नंतर येतो, ह्या अक्षर क्रमावरून हे लक्षात येते की, जो ‘कळण्याच्या’ स्थितीचा ‘अनुभव घेऊ शकत नसणारा’ असतो तो ज्ञानी … जो ‘न कळण्याचा’ स्थितीला प्राप्त होतो, तोच ‘कळण्याच्या’ शुद्ध अवस्थेला पात्र होऊ शकतो.


हे करण्यासाठी (‘न कळण्याचा’ स्थितीला प्राप्त करण्यासाठी) ह्या जगाशी संबंधित सर्व परिस्थिती आणि घटना ह्यांना ‘कळण्याच्या’ स्थितीतून (जाणिवेतून) उद्भवणाऱ्या सर्व दुःखे आणि यातना सहन कराव्या लागतात आणि त्यानंतरच सद्गुरुकृपेच्या मदतीने तो ‘न कळण्याच्या’ स्थितीला प्राप्त करू शकतो, त्या स्थितीच्या माध्यमातुन तो कळण्याच्या शुद्ध स्थितीत एकरूप होतो.



सुरुवातीला केवळ ‘कळणे’ ही स्थिती होती, पण तिला कळून घेता येत नव्हते (कळण्याची जाणीव नव्हती); ह्याचाच अर्थ होतो की ’न कळण्याची’ स्थिती देखील अगदी तेंव्हापासून होती - म्हणजेच सुरुवातीपासून ज्ञानाची स्थिती होती आणि मायावी प्रकृतीची (अज्ञानाची) स्थिती देखील होती. या मायावी प्रकृतीच्या आधारावरच - म्हणजे ‘न कळण्याच्या’ आधारावरच - आत्म्याचा मनुष्य शरीरापर्यंतचा घसरणीचा प्रवास (महाराज ज्याला घसरणी चा प्रवास म्हणतात त्याला मेहेरबाबा जाणिवेची उत्क्रांती म्हणतात); आणि मनुष्य जन्म मिळाल्यावर जीवात्मा जगाच्या संदर्भातल्या सर्व वस्तू, घटना आणि परिस्थिती या बाबत मिथ्या ‘कळण्याचा’ अनुभव करू लागला (हीच पुनर्जन्माची अवस्था आहे). त्यानंतर परतीचा प्रवास सुरु झाला (अंतर-क्रांती किंवा चढणीचा प्रवास) आणि ह्या प्रवासानंतर जीवात्मा शुद्ध ‘कळण्याच्या’ अनुभवापर्यंत - (आत्मसाक्षात्कार किंवा अनंत प्रज्ञा) म्हणजे आपल्या मूळ स्थितीपर्यंत पोहोचला (ह्या स्थितीत आणि मूळच्या स्थिर जाणिवेचा तेवढा फरक होता).


सुरुवातीला फक्त ‘कळण्याची’ स्थिती होती; कारण त्या स्थितीबद्दल काहीच कळू शकत नव्हते (त्या स्थितीला जाणीव नव्हती); त्या स्थितीचा अनुभव घेता येऊ शकत नव्हता, म्हणजेच ही ‘न कळण्याची’ स्थिती उद्भवली - सृष्टीची उत्पत्ती झाली, त्याच बरोबर मिथ्या कळण्याची स्थिती उद्भवली इत्यादी. आता उलट प्रवास करून आपण कळण्याचा स्थितीत परत जाऊ शकतो - आणि कळण्याच्या स्थितीत (जाणीव ठेऊन) जाऊ शकतो (अनंत प्रज्ञा अवस्था) - ज्ञान अवस्था आणि शुद्ध ‘कळण्याच्या’ अवस्थेचा अनुभव घेऊ शकतो. बस! आपल्याला इतकेच करायचे आहे , एकदा हे झाले की आपल्याला येण्यासाठी अथवा जाण्यासाठी काहीच उरत नाही!


आता मेहेरबाबांनी १९६८ साली मेहेराझाद येथे सांगितलेला - ज्ञान आणि अज्ञान - या विषयावरील भाग पुन्हा देत आहे :


ज्ञान आणि अज्ञान


सुरुवातीला अनंत ज्ञान होते, पण या ज्ञानाला आपण अनंत ज्ञान असल्याची माहिती नव्हती. ज्या क्षणी ज्ञानाला आपण सज्ञान असल्याचा शोध लागला, त्याच क्षणी ते सज्ञान झाले! पण त्याला कशाचे ज्ञान झाले होते?


आपल्याला ज्ञान नाही, याचे ज्ञान त्याला झाले होते. हेच ‘न कळणे’ किंवा अज्ञान (स्वतःबद्दल), अनंत अचेतनाला स्वतःला ज्ञान करून घेण्याचे माध्यम बनले. अज्ञान हे ज्ञानाची छाया आहे आणि अनंत अज्ञान हे अज्ञान आहे हे कळण्यासाठी ज्ञानाला त्याच्या अनंत छायेचा (अनंत अज्ञानाच्या छायेचा) अनुभव घ्यावा लागतो, कारण अनंत अज्ञान हे माध्यम आहे, ज्या माध्यमातून अनंत ज्ञानाला स्वतःबद्दल ज्ञान होते (आत्मसाक्षात्कार होतो). प्रकाशाचा अनुभव घ्यायचा असेल तर अंधःकाराचा अनुभव प्रथम आवश्यक असतो. प्रकाश म्हणजे आंतरिक सत्य अस्तित्व (जे स्वयंभू असते); आणि तसेच, अंधःकार म्हणजे बाहेरचे मायावी (किंवा भासमान) अस्तित्व (जे अस्तित्वात नसते).


सत्य आंतरिक स्वयंभू अस्तित्व समजण्यासाठी (ते अस्तित्व जे स्वतःमध्येच अस्तित्वात असते) बाहेरचा मायावी अनुभव असणे आवश्यक असते. हा बाहेरचा अनुभव ह्या अनंत अस्तित्वाला जाणून घेण्याचा मार्ग आहे. बाहेरच्या अस्तित्वाचे माध्यम मायावी आहे हे जेंव्हा अनुभवाला येते, तेंव्हा जे सर्व घडत आहे ते स्वप्नामध्ये घडत आहे हे कळते. तेंव्हाचा अनुभव असा असतो की काहीच घडलेले नाही, काहीच घडत नाही, आणि काहीच घडणार नाही; पण हा अनुभव (साक्षात्कार) तेंव्हाच होतो जेंव्हा अज्ञानाचा (बाहेरच्या ज्ञानाचा) अनुभव घेतला जातो.


अवतार मेहेरबाबा आपल्या वैश्विक कार्यात पाचही सद्गुरुंना सहभागी करून घेत असत. उत्पत्तीच्या कथानकावरील विवेचनाचे हे एक उदाहरण होते. मेहेरबाबा ज्या कथानकावर वैश्विक कार्य करीत होते, त्याचा पाया महाराजांनी १९२३-२४ मध्ये रचला होता. त्यानंतर मेहेरबाबांनी मौनाच्या आरंभापासून त्यांच्या शरीराच्या त्यागापर्यंत ह्या कथानकाचा वारंवार उल्लेख केला आहे. स्वाभाविकच दोहोंच्या आशयात साम्य आढळते. वर जरी एक छोटेसे उदाहरण दिले असले तरी, असे कित्येक उतारे आपण दोघांच्या पुस्तकात बघू शकतो ज्यांचा आशय एकच आहे.

6 views0 comments

Comments


bottom of page