top of page
Mohan Kher

एकूण आकाशगंगांची सद्गुरूने व अवताराने केलेली गणना आणि अविभाज्याच्या गतिशास्त्रातील झेनो परिणाम


२ डिसेंबर १९२७ ला मेहेरबाबांनी अनेक विश्वांना (आकाशगंगांना) मोजण्याबाबत ही माहिती दिली :


“ह्या सृष्टीत अनेक विश्वे (आकाशगंगा) आहेत जी एकमेकांशी साखळीने जुळलेली आहेत. त्यांची संख्या इतकी आहे की सद्गुरुलादेखील ती मोजता येत नाही. एकदा मी उपासनी महाराजांबरोबर साकोरीला असताना त्यांना मोजायचा प्रयत्न केला. ही विश्वे (आकाशगंगा) सद्गुरुंमधूनच उत्पन्न होऊन (सद्गुरुंच्या विश्वव्यापी शरीरातुन) त्याच्यातच लयाला जातात (इथे मेहेरबाबा सद्गुरूच्या वैश्विक रूपाचा उल्लेख करीत आहेत, जो ‘अर्स-ए-मौला’ या आसनावर विराजमान आहे) आणि तरीही त्याच्या भौतिक नजरेने सद्गुरुला त्यांची संख्या मोजता येत नाही हे खरोखरच आश्चर्यकारक आहे!"


मग मेहेरबाबा विस्ताराने त्या प्रसंगाचे वर्णन करतात ते असे : “१९२१ मध्ये एका रात्री मी महाराजांसोबत बसलो असताना आमच्यामध्ये या विश्वाची संख्या मोजण्याबाबतीत संवाद झाला."


“प्रथम महाराजांनी विश्वांना (आकाशगंगांना) मोजण्याचा प्रयत्न केला. संख्या मोजण्यासाठी त्यांना सर्वप्रथम त्या आकाशगंगांना (संस्कारांनी) जोडणाऱ्या साखळ्यांचा प्रवाह खंडित करावा लागला, जो अव्याहतपणे त्यांच्यातून उत्पन्न होऊन बाहेर जात असतो, कारण तो प्रवाह खंडित केल्याशिवाय विश्वाची गणना होऊ शकत नव्हती. असे करण्यासाठी महाराजांना त्यांच्या वैश्विक मनाला आणि संपूर्ण सृष्टीच्या शक्तीला (काळी ऊर्जा….?) एकत्रित करून विश्वांच्या निर्मितीला थांबवण्यावर (प्रवेगिक प्रसरणाला थांबवण्यावर) केंद्रित करावे लागले. हे अतिशय अवघड आणि धोकादायक होते. परमेश्वराच्या अद्वैतातून द्वैत जन्माला आले, आणि हे द्वैत कधीकधी घातक सिद्ध होऊ शकते. ह्या केंद्रित शक्तीने निर्माण झालेल्या प्रचंड तणावाने सद्गुरूंच्या भौतिक शरीराचा त्याग देखील होऊ शकतो. असे करीत असताना एकदा मी महाराजांना थांबवले आणि एकदा महाराजांनी मला ह्या साखळीच्या प्रवाहाचा प्रवेग थांबवण्यापासून परावृत्त केले, कारण तसे करीत असताना माझ्या भौतिक शरीराला खरोखरच धोका निर्माण झाला होता."


त्यानंतर महाराज मला म्हणाले, “कोणत्याच सद्गुरुला हे मोजण्यात यश आलेले नाही, कारण ज्ञानाचा प्रवाह खुद्द सद्गुरुंपासूनच होत असतो. विश्वाची गणना करण्यासाठी हा प्रवाह थांबवला, तर त्याचा द्वैतावर परिणाम होतो आणि द्वैताच्या त्यावरच्या प्रतिक्रियेमुळे सद्गुरूच्या भौतिक शरीराला धोका निर्माण होतो.”


( लॉर्ड मेहेर मधून पृष्ठ संख्या ८६६ )


१९७७ मध्ये वैज्ञानिकांनी शोधलेल्या झेनो परिणामाची व्याख्या आणि अविभाज्याच्या गतिशास्त्राची पतन संकल्पना, मेहेरबाबांनी १९२१ साली उपासनी महाराजांच्या सहवासात विश्वाच्या संख्येच्या गणतीविषयी कथन केलेल्या प्रसंगाच्या स्मृतींना उजाळा देते.


केवळ निरीक्षण किंवा गणनेच्या कृतीद्वारे, अतिसूक्ष्म लहर-कणांच्या प्रणालीच्या सातत्याने उत्क्रांत होणाऱ्या स्थितीत, अचानक सातत्य खंडित करणारे बदल घडून येतात हे आपण बघितले. ह्यालाच Quantum पतन म्हणतात. जर असे निरीक्षण वारंवार केले, आणि दोन निरीक्षणांमधील काळ कमी केला तर स्थितीची परिवर्तनशिलता कमी होत जाते आणि ह्या निरीक्षणांमधील वेळेचे अंतर शून्यतुल्य (पण शून्य नाही) केल्यास स्थितीत होणारा बदल पूर्णपणे स्थगित होतो. ह्या परिणामाला Quantum झेनो परिणाम म्हणतात.


Quantum झेनो परिणामाचे विश्लेषण करणारा प्रथम शोधनिबंध मिश्रा आणि सुदर्शन या दोन भारतीय वैज्ञानिकांनी १९७७ मध्ये लिहिला होता. आपण जेंव्हा विश्वांची संख्या मोजण्याविषयी मेहेरबाबांचे कथन वाचतो तेंव्हा झेनो परिणामाची आठवण होते कारण प्रणालीची स्थगिती दोन्ही ठिकाणी दिसून येते. विश्वाच्या संख्येची गणना करताना देखील विश्वाच्या उत्क्रांती प्रक्रियेला स्थगिती द्यावी लागते. ही गणना एक वेळा न होता अनेक वेळा होत असल्यामुळे (कारण आकाशगंगांची संख्या फार मोठी आहे), त्या गणनेसाठी कराव्या लागणाऱ्या निरीक्षणांमध्ये शून्य सदृश्य अंतर आहे.


मेहेरबाबांच्या उल्लेखात अजून एक विशेषता त्यांनी सांगितली आहे - ह्या उत्क्रांतीच्या स्थगिती दरम्यान, द्वैतातील सद्गुरूच्या भौतिक शरीरावर प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा भार येऊन त्या शरीराचा नाश होऊ शकतो. झेनो परिणामात देखील मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची उलाढाल होते हे वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे.


ऊर्जा आणि वेळ हे हायसेनबर्ग च्या अनिश्चितता सिद्धांताचे एक द्वैत आहे. आपल्या उदाहरणात वेळेचे अंतर अत्यल्प होऊन शून्याच्या जवळ येते - म्हणजेच वेळेतील अनिश्चितता देखील अतिशय अत्यल्प होत जाते. म्हणूनच ऊर्जेची अनिश्चितता अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढत जाते. मोठ्या प्रमाणावर वाढणारी ऊर्जेची अनिश्चितता, सरासरी उर्जेला देखील मोठ्या मूल्य संख्येची असायला भाग पाडते.


पतन आणि झेनो परिणाम दोन्ही अविभाज्याच्या गतिशास्त्राचे विषय आहेत आणि अविभाज्याचे गतिशास्त्र हे सूक्ष्म प्रणालींचे शास्त्र आहे. इथे आपण विश्वाचा (आकाशगंगांच्या संदर्भात) विचार करीत आहोत, ज्यांचे प्रमाण अतिविशाल अंतराचे आहे. सूक्ष्म प्रणालींच्या विज्ञानाचे परिणाम ह्या अतिविशाल अंतरांसाठी किती संयुक्तिक आहे?


ह्या प्रश्नाचे दोन बाजूंनी उत्तर देता येईल. वैज्ञानिक बाजूने आणि अध्यात्मिक बाजूने :


वैज्ञानिक बाजूने असे सांगता येईल की आज तरी मोठ्या अंतरांना (लक्षावधी प्रकाश वर्षांच्या प्रमाणाची अंतरे) आणि विशाल वस्तूंना (आकाशगंगा आणि त्यांचे समूह, अति विशाल तारे इत्यादी) लागू असणारे विज्ञानाचे नियम अतिसूक्ष्म प्रणालींच्या (अणु, मूलकण) नियमापेक्षा भिन्न आहे. पण या दोन विज्ञानांचा समेट करण्याचे प्रयत्न गेली अनेक दशके होत आहेत. वैश्विक प्रमाणावर परिणाम करणाऱ्या काळ्या ऊर्जेचे मूळ वैज्ञानिक सूक्ष प्रणालींमध्ये (कण-प्रतीकण यांच्यातून निर्माण होणारी निर्वात ऊर्जा) शोधत आहेत. विश्वोत्पत्तीच्या, महाविस्फोटाच्या कालावधीत देखील विज्ञानाचे निरनिराळे नियम आणि चारही निराळी मूलभूत क्षेत्रे एकच होती हे अनुमान आहे. गुरुत्वाकर्षण आणि इतर तीन क्षेत्रांना जोडणारी स्ट्रिंग संकल्पना अमूर्त गणिताच्या भाषेत यशस्वी झाली आहे, आणि तिचे प्रायोगिक प्रमाण शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. म्हणून आज जरी विज्ञान एकाहून अधिक संकल्पनांमध्ये विभाजित असलेले दिसत असले, तरी सर्व प्रमाणांसाठी (आणि सर्व क्षेत्रांना लागू असणारे समान नियम) असणारी संकल्पना भविष्यात यशस्वी होणारच नाही, हे सांगता येत नाही.


मेहेरबाबांनी सांगितलेल्या अध्यात्मिक नियमात एक तत्व वारंवार समोर येते, ते म्हणजे या विश्वाचे स्तरीय वास्तव. ह्या सृष्टीचे मनो जगत, सूक्ष्म जगत आणि स्थूल (भौतिक) जगत हे तीन प्रमुख स्तर आणि त्या प्रत्येक स्तरात, पुन्हा विविध लघु स्तर मेहेरबाबा स्पष्ट करतात. त्याचबरोबर त्यांनी यामध्ये सूक्ष्मातून स्थूलाकडे जाणारा विशिष्ट पदानुक्रम सांगितला आहे. स्थूलाचे अवलंबित्व नेहेमीच सूक्ष्मावर दाखवलेले आहे. म्हणून आध्यात्मिक दृष्टीनेहि विश्वाच्या गणनेत सूक्ष्म वस्तूंना लागू होणारी गतिशास्त्राची परिभाषा निश्चितच अयोग्य नाही.


एकान्तवासाचे कारण


मेहेरबाबा आपले वैश्विक कार्य करताना एकान्तवासात राहत असत. त्यावेळी त्यांच्या मंडळींपैकी एक त्यांच्या खोलीबाहेर उभा राहत असे. कित्येकदा त्याला आत जायची किंवा पाहायची देखील परवानगी नसे. त्याचप्रमाणे मेहेरबाबा जेंव्हा मस्तांची भेट घेत असत, तेंव्हा देखील ते मस्ताला घेऊन एकांतवासात बसत असत, आणि कोणालाही तेथे जायची अथवा काय कार्य चालू आहे ते बघायची सक्त मनाई होती. अनेकदा मंडळींच्या अनावधानामुळे किंवा इतर काही कारणामुळे त्यांनी या नियमाचे उल्लंघन केल्यास, त्या स्थळातील ऊर्जेमुळे किंवा अतिशय प्रखर प्रकाश दिसल्यामुळे संबंधितांच्या स्वास्थ्यावर प्रतिकूल परिणाम झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. काही विशेष एकांतवासाच्या प्रसंगी, जसे मेहेरबाबांनी जेंव्हा स्वित्झर्लंड मध्ये टेकडीवर, आणि सेंट फ्रान्सिस च्या जागेवर एकांतवास केला होता तेंव्हा तर बाबांनी एक मोठे क्षेत्र आखून त्या क्षेत्राच्या आत धनगर किंवा पाळीव प्राणी यांचा शिरकाव देखील वर्ज्य केला होता. ह्या सर्वांच्या मुळाशी कारण म्हणजे, त्यांच्या वैश्विक कार्यावेळी त्यांची नजर विश्वात संचार करीत असते आणि त्या वेळेस अवताराच्या निरीक्षणातून उत्क्रांती प्रक्रियेला स्थगितीचा धक्का बसून (झेनो च्या परिणामामुळे) प्रचंड ऊर्जा त्या ठिकाणी प्रकट होत असावी. म्हणूनच, मेहेरबाबा अशा वेळी मंडळींना विशेष काळजी घायला का सांगत असत, हे समजू शकते.

3 views0 comments

Recent Posts

See All

उत्पत्तीच्या कथानकावरील उपासनी महाराज आणि मेहेर बाबांचे भाष्य

आज रमदान ईद आहे (ईद-अल-फत्र) आणि मुस्लिम लोक महिन्याभराचे रमदान रोजे आजच्या उत्सवाने संपन्न करतात. हे रोजे आणि हा उत्सव मोहम्मद...

Comments


bottom of page