ह्या गाण्यात असे काय विशेष आहे की प्रियतम बाबांनी या गाण्याला इतके महत्व दिले? त्यांनी प्रथम हे गाणे कधी ऐकले त्याची निश्चित नोंद माझ्याजवळ नाही. पण माझ्या अंदाजाप्रमाणे हे गाणे त्यांनी १९३० च्या दशकाच्या शेवटी ऐकले असावे आणि त्याच सुमारास आपल्या महिला मंडळींना त्याची रेकॉर्ड - जी चक हेंडरसन ह्यांच्या आवाजात होती - आपल्या जवळ ठेवण्यास सांगितले असावे. १९४० आणि १९५० च्या दशकात ही रेकॉर्ड मेहेरबाबांनी इतक्या वेळी ऐकली की घासून घासून त्या रेकॉर्डच्या खाचा (Grooves) पूर्णपणे निकामी झाल्या आणि गाणे ऐकू येईनासे झाले! मग त्यांनी आपल्या पाश्चात्य प्रेमींना या गाण्याची मूळ रेकॉर्ड मागवायला सांगितली. ती दुर्मिळ रेकॉर्ड मेहेराझादला आणली गेली. पण ती होती लेस्ली हचिन्सन ह्यांच्या आवाजातली. मग बाबांनी त्या गाण्याचे शब्द एरच जेसावाला ह्यांना नेहेमी आपल्या जवळ ठेवायला सांगितले. इतकेच नव्हे, त्या गाण्याची चाल त्यांना शिकायला सांगितली होती. त्यांनी कारण दिले की माझे शरीर त्यागल्यानंतर हे माझ्याजवळ वाजवायचे आहे. आणि त्यावेळेस जर रेकॉर्ड उपलब्ध झाली नाही तर माझ्या मंडळींना ते गाणे म्हणावे लागेल! मेहेरबाबांनी असे स्पष्ट केले आहे की, “त्यांच्यासाठी ह्या गाण्याचे महत्व आणि अर्थपूर्णता चिरंतन आहे”(THE SONG HAS ETERNAL MEANING FOR ME). “आणि ह्या गाण्याची सुरावट मला सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेच्या अनादी संगीताची आठवण करून देते.”
हे गाणे कोल अल्बर्ट पोर्टर ह्यांनी १९३५ साली इंडोनेशिया जवळच्या समुद्रातुन सफर करताना लिहिले होते, पण त्याचे पहिले सफल रेकॉर्डिंग आर्टी शॉ ह्यांच्या वाद्यवृंदात काही वर्षांनी - १९३८ मध्ये झाले. हळू हळू हे गाणे अतिशय लोकप्रिय होत गेले. चिक हेंडरसन ह्यांच्या आवाजातील ह्या गाण्याच्या दहा लक्ष पेक्षा ज्यास्त रेकॉर्डस् विकल्या गेल्या. गाण्यात दोन कलांचे मिलन होते - गाण्यातील काव्य आणि सुरावट. ह्या दोन्ही बाजूंनी हे गाणे विशेष म्हणावे लागेल. पोर्टर हा केवळ कवी नव्हता, तर तो उत्तम संगीतकारही होता. आणि नृत्य गायनात अजून एका कलेचा समावेश होतो - नृत्यकलेचा. बिगिन द बिगीन ह्या गायन- नृत्याच्या, नंतरच्या दशकांमध्ये कितीतरी आवृत्या, रेकॉर्डस्, नृत्य कार्यक्रम अनेक प्रस्थापित कलाकारांनी सादर केले - वर दिलेल्या तीन कलाकारांव्यतिरिक्त हे गाणे आणि ह्यावर आधारित नृत्य अनेकांनी साकारले : फ्रेड एस्टेयर, एलिनर पॉवेल, जॉन मॅथिस, शेरील क्रो अशी अनेक नावे सांगता येतील. ज्युलिओ इग्लेसिअस ची स्पॅनिश आवृत्ती अतिशय प्रसिद्ध आहे. फ्रॅंक सिनात्रा ने गायलेली आवृत्ती देखील अनेकांना प्रिय आहे. ह्या काव्यातील सर्व सहा कडवी निराळ्या छंदात आहेत, आणि गायनासाठी ते अतिशय अवघड आहे कारण त्याचे मीटर अपारंपरिक आहे.
प्रस्तुत काव्य कॅरिबिअन नृत्यावर आधारित आहे, ज्याचे फ्रेंच नाव आहे बीग्विन (Beguine). हाच शब्द मध्ययुगीन महिला नन्स च्या संदर्भात देखील वापरात होता, ज्या महिलांना पोपनी आणि प्रस्थापित ख्रिस्ती चर्चनी मान्यता दिली नव्हती, पण त्या नन्स आपले सर्व आयुष्य ख्रिस्त-भक्तीत व्यतीत करीत असत. हजारो वर्षे लोटून गेली असली तरी हा वैशिष्ट्यपूर्ण कॅरिबिअन नृत्य गायन प्रकार आणि त्याच काळातील त्याच नावाच्या नन्सचा यांचा संबंध कॅरीबियन मधील फ्रेंच वसाहतींच्या माध्यमातून आला असावा. भूतकाळात थोडे अधिक मागे जाऊन असे म्हणता येईल की श्रीमद्भगवतात मधुरा भक्तीची आणि गोपी-कृष्ण रास क्रीडेची जी वर्णने आहेत ती ह्याच नृत्य-संगीत भक्तीची, कृष्ण-कालीन प्रथमावृत्ती होती. पुढील मराठी भाषांतरात हाच कृष्ण-लीलेचा आणि रास-क्रीडेचा संदर्भ घेतला आहे. ह्या संदर्भ साम्याची अनेक कारणे देता येतील. ह्या गीताचा विषय (जो मेहेरबाबांना अभिप्रेत होता) लौकिक प्रेमावर आधारित नसून, ईश्वरी दिव्य प्रेमावर आधारित आहे. मेहेरबाबांच्या सृष्टीच्या उत्पत्तीच्या कथानकात पहिल्या जीवात्म्याचे (म्हणजेच पहिला सद्गुरू, अथवा प्रथमावतार, अथवा खोडकर कोंबडीचे पिलू) नंतर येणाऱ्या जीवात्म्यांशी अतूट नाते आणि चिरंतन प्रेम संबंध आहेत हे स्पष्ट केले आहे आणि म्हणूनच अवताराला वारंवार यावे लागते. मेहेरबाबा म्हणतात की, “ह्या काव्याची अर्थपूर्णता आणि त्याचे महत्व चिरंतन आहे (Eternal Meaning) आणि त्याची सुरावट मला अनादी संगीताची आठवण करून देते”. हे विधान प्रस्तुत संदर्भाला विश्वसनीयता प्रदान करते. ह्याशिवाय मध्य युगातील बिगीन (beguin) नन्स असो किंवा कृष्णकालीन गोपिका असो, या दोन्ही स्त्री प्रेमिकांना त्यावेळच्या प्रस्थापित धर्मगुरूंनी मान्यता दिली नव्हती. या शिवाय अगणित सुफी काव्यात देखील मधुर भावाचा आणि प्रेमी प्रियतम यांचा प्रेम संबंध मद्यपी साकी आणि मदिरेच्या रूपकातून स्पष्ट केला गेला आहे आणि सूफींना देखील मुस्लिम धर्मगुरू मान्यता देत नाहीत. ह्यावरून परमेश्वरी प्रेम, त्याग, विरह, वैराग्य आणि मिलन यांचे ह्यांचे वर्णन सर्वच धर्मांमध्ये आणि आध्यात्मिक साहित्यात विविध भाषांमध्ये, विविध प्रांतात आणि विविध युगांमध्ये केलेले आढळते आणि त्याला चिरंतन महत्व आहे. प्रस्थापित धर्मगुरूंचा विरोध सहन करूनही त्यांचे महत्व कमी झाले नाही .
मराठी भाषांतरात रास क्रीडेचा संदर्भ देऊन हे काव्य मराठी भाषिकांना समजून घेण्यात मदत होईल. अर्थात पोर्टरची अप्रतिम शब्दसंपदा मराठीत व्यक्त करण्यात मर्यादा पडतात. पोर्टरला ह्या काव्याची प्रेरणा कलाकाराच्या उद्दीपित अवस्थेत मिळाली असावी आणि आपल्या हातून असे चिरंतन अर्थवाही काव्य आणि संगीत लिहिले गेले ह्याची त्याला कितपत कल्पना होती, कुणी सांगावे? एक मात्र निश्चित, १९३० साली लिहिलेले आणि संगीतबद्ध केलेले हे काव्य शंभर वर्षानंतर आजही लोकप्रिय असण्यामागे मेहेरबाबांचा आशीर्वादच आहे (पोर्टर मेहेरबाबांशी कधीही भेटला नव्हता, पण ह्या काव्यामुळे निश्चितपणे अवतार मेहेर बाबांच्या अनंत आशीर्वादांचा धनी झाला आहे).
अर्थातच, मेहेरबाबांच्या सूचने प्रमाणे हे गीत ३१ जानेवारी १९६९ ते ७ फेब्रुवारी १९६९ ह्या सात दिवसात मेहेरबाबांच्या सान्निध्यात सात वेळा वाजवले गेले होते. आपल्या शरीरत्यागाच्या कालावधीत ह्या गीताचे बोल आणि सूर, तिथे उपस्थित व्यथित प्रेमी-जनांना आणि भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना, मेहेरबाबा त्यांच्या सहवासात नेहेमीच राहतील आणि त्यांचे प्रेम चिरंतन आहे, हीच ग्वाही देत आहेत. म्हणूनच, ह्या गीताचे अनन्यसाधारण महत्व आहे.
(कंसामध्ये पुढील काव्यपंक्तींच्या मागची भूमिका मराठीमध्ये आणि त्यानंतर मराठी भाषांतरित काव्यपंक्ती - ६ कडवी - दिली आहे.)
विरह मिलन रास
(पुराण पुरुषाच्या स्मृतीने व्याकुळ होऊन पृथ्वीला त्याच्या पुनरागमनाची ओढ लागली आहे. नवीन अवतार नजीकच्या भविष्यकाळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. प्रेम विरहित शुष्क कोरडी वसुंधरा त्याच्या प्रेमाच्या सरींनी पुन्हा ओलेती होऊन हिरवीगार साडी नेसणार आहे. अवतार आपली रास लीला पुन्हा नव्याने रचणार आहे. पृथ्वी त्याच्या विरहानंतर मिलनास उत्सुक आहे. पृथ्वी गात आहे....)
त्यांनी होती रास रचली
सुमधुर सुरेल स्मृती जागली
उन्हात भाजली माती, रातसरीनें दरवळली
सदाबहार स्मृती, हिरवी ताजी झाली ——— १
(पुराण पुरुष पृथ्वीच्या आणि त्यावरील जीवसृष्टीच्या मिलनाला तेव्हढाच उत्सुक आहे. आपल्या प्रेमींना बोलावतो “या माझ्या बछड्यांनो, मी पुन्हा तुमच्या मध्ये आलो आहे. गाऊ या, नाचू या, मौज करू या! माझ्या नवीन गोप-गोपींनो, माझ्या अंतरंग प्रेमी-प्रेमिकांनो, तीच रास क्रीडा पुन्हा रचण्यास मी उत्सुक आहे. माझ्या प्रभेच्या छायेत, माझ्या तेजस्वितेत आणि माझ्या सहवासानी मंतरलेल्या वातावरणात तुमचे स्वागत आहे. अवतार त्यांना साद देतो आहे .…)
चांदण्यातळी मी फिरून तुम्हासमीप, येतो युगायुगात
सागरतीरी वाळवंटी थाटला वाद्यवृंद, आहे ताला सुरात
डोलत नारळी पोफळी, आहे ताल धरित
रास रचू, सुरु करा नृत्याचा, प्रथम झंकार ——— २
(पुराण पुरुष त्यांना सांगतो - सर्वांसाठी मी असह्य यातना कशा सहन करतो परमेश्वरालाच ठाऊक! हे ओझे इतर कोणाला पेलवणार नाही, पण, तुमच्या विरहगीताने मला बांधून ठेवले आहे, तुमच्या व्याकुळतेची मी उपेक्षा करू शकत नाही आणि तुमच्या समीप मला वारंवार यावेच लागते. “सर्व काही आणि काहीच नाहीच्या” महासागरातून मी सर्वप्रथम बाहेर आलो, तुम्ही माझ्या मागोमाग बाहेर आलात, म्हणून तुमची आणि तुमच्या मागे अनंत काळापर्यंत येणाऱ्या पिलांची अपरिमित जबाबदारी माझ्यावर येते. पूर्ण पुरुषाची करुणा त्याच्या मौन शब्दांमध्ये प्रकट होते….)
पुन्हा व्यथित ते जीणे, यत्नांपलीकडले काज
पिळवटले हृदय सुरावटीने, केला नाईलाज
धुरा प्रेषिताची, प्रेमाच्या आणेची जाग
वचन देतो, नाही दुरावणार कधीहि, आज ——— ३
(सांप्रत अवतार-युगाला पूर्वीच्या अवतारांची स्मृती आहे. पूर्वीच्या अवतारकालाचे ‘ते दैवी क्षण’, ‘तो प्रसन्न आनंद’, त्या सोनेरी आठवणी त्याच्या स्मरणात आहे. सांप्रत युगाला आधीच्या चुकलेल्या वाटसरूंची देखील आठवण आहे, ज्यांनी आपल्या मोहापायी त्या अमृत सहवासाची संधी गमावली होती. त्यांनी मागच्या वेळी गमावलेला आनंद त्यांना पुन्हा प्राप्त करू देण्यास सांप्रत युग उत्सुक आहे. म्हणून ते म्हणते....)
कोण ते दैवी क्षण, काय तो प्रशांत आनंद!
चाखत असता सांजेचे सोन-कण, अवचित झाला रसभंग! विखुरले हर्षामृत,
पश्चात सुचली बुद्धी - दवडली संधी पडून मोहात
जाणतो मी कोणती व्यथा छिन्न करते हृदयास ——— ४
(प्रेमाची परिणीती होते त्यागात आणि वैराग्यात; प्रेमी आपल्या स्वतःची आहुती वैराग्यात द्यायला अद्याप तयार नाही. धगधगती प्रेमज्वाला त्याला भुरळ जरूर घालते, पण त्या रास लीलेच्या यज्ञात स्वतःला अर्पण करण्यास अद्याप तो तयार नाही - हीच त्याची दुविधा मनस्थिती प्रेमी उघड करतो. प्रेमज्वालेचा अंगार आपल्या स्मृतिमनात जपून ठेवतो, पण तिला अग्नीचे रूप येऊ देत नाही. त्याची भीतीयुक्त हुरहूर तो प्रकट करतो….)
नको ते दाहक नृत्य, नको व्यथा घातक- मधुर!
होती धगधगत प्रेम ज्वाला, राहूदे सुप्त अंगार!
असुदे मृत इच्छा निद्रिस्त, तेवत मम स्मृतीत मात्र
जरी करतील सुरु ते नृत्य घातक-मधुर ——— ५
(तो करुणामय पूर्ण पुरुष, ते खोडकर कोंबडीचे पिलू, प्रेमींच्या हृदयातली द्विधा जाणतो आणि सोडवतो, आणि त्याला आपल्या प्रेमाच्या दिव्य रास लीलेत ओढतो. प्रेमींच्या मीपणाचे आगीत होरपळणे, त्या वेदनांचेच आता अमृतात रूपांतर होते, त्या यातना आता प्रेमींसाठी आत्मानंदाने मंतरलेल्या स्वर्गीय संगीतात रूपांतरित होतात, त्याचा पुनर्जन्म झालेला असतो. पुराणपुरुषाच्या आलिंगनात तो विसावतो. “मी तुझ्यावर निरतिशय प्रेम करतो, तू स्वतःवर करशील त्याहूनही अधिक, आणखी अधिक, इतके की, माझे प्रेमी माझ्या पूर्ण मिलनासाठी पात्र होतील, माझ्याशी - प्रियतमाशी - एकरूप होतील” हे शब्द पुराणपुरुष सांप्रत आणि भविष्यातील सर्वच प्रेमींसाठी गात आहे....)
चला नाचू, पुन्हा रंगू या, त्या रास-क्रीडेत
जोवर तेच चांदणे का न रचते फुलोरा नभात,
जोवर तू कानांत माझ्या का न गुणगुणत,
“प्रिये मी करतो प्रेम तुझ्यावर!”
अरे अचानक, आलोत की स्वर्गात,
सुरु आहे तीच रास क्रीडा! ——— ६
Comments