मेहेरबाबांचे महामौन - प्रवास आणि पडसाद
“धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे” हे ईश्वराचे वचन आहे. हे वचन पूर्ण करण्यासाठीच वर्तमान युगात मेहेर बाबांनी जन्म घेतला आहे. मेहेर बाबांचे मौन हे या अवतारकार्याचे महत्वाचे माध्यम आहे. चौरेचाळीस वर्ष अव्याहत बाब मौन होते. १० जुलै १९२५ पासून तर ३१ जानेवारी ६९ च्या अगदी अखेरच्या घटके पर्यंत. ह्या मोठ्या कालखंडात बाबांनी कित्येक वर्षे सार्वजनिक जीवनात व्यतीत केली, संपर्कात आलेल्या हजारो अनुयायांना मार्गदर्शन केले , अनेक वेळा जगभर प्रवास केला, भारतीय उपमहाद्वीपात देखील प्रचंड गर्दीच्या वाहनांमध्ये हजारो मैलांचा पल्ला गाठला, कित्येक उपदेशपर ग्रंथांची निर्मिती केली, अपघातांमध्ये आपल्या शरीरावर झालेले आघात सहन केले. ह्या सर्व परिस्थतीमध्ये अबाधित मौन राहणे केवळ त्यांच्या सारख्या अवतारी पुरुषालाच शक्य होते.
मौन एक स्तरित वास्तव मेहेरबाबांचे मौन,आणि त्यांनीच सूचित केलेला मौनभंग , तो अद्याप झाला आहे की नाही, ह्या विषयावर अनेक प्रवाद आहेत.कित्येक प्रसंग असे आले कि बाबानी “ मी अमुक तारखेला, अमुक जागी मौन सोडींन “ असे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात त्यांनी मौन सोडले नाही. मौनभंगाच्या संदर्भात बाबांनी वारंवार केलेला अपेक्षाभंग आपल्याला गोंधळात टाकतो. अपेक्षा उंचावून “ पराभूत अपेक्षांच्या” गर्तेत बाबानी आपल्या निकटच्या मंडळींना अनेक वेळा ढकलले आहे. आपल्या नव-जीवनात प्रवेश करतांना रचलेल्या “ नई जिंदगीका तराणा” ह्या बोधगीतात ते म्हणतात “ गज़ल नमुरादिकी हम गा रहे है, कसमसे इरादोको गरमा रहे है” जवळच्या मंडळींचा मेहेरबाबांच्या प्रति असलेला दृढ विश्वास आणि निरपेक्ष प्रेमाची परीक्षा त्यांनी अनेकदा घेतली आहे. निर्भेळ प्रेम आणि निरागस विनोद ह्या दोन हत्यारांचा उपयोग मेहेर बाबांनी प्रेमीजनांच्या हृदयातील अगतिकता आणि निराशा ह्यांचे परिमार्जन करण्यात केला. मेहेरबाबांच्या सहवासात लोकांना शुद्ध प्रेमाचा अनुभव येत असे. तेजःपुंज पण त्याच वेळी निरागस ,पारदर्शी आणि आपलेपणाने पूर्ण असे त्यांचे विलोभनीय व्यक्तिमत्व होते. निराशेच्या गर्तेतून आशा-निराशेच्या पलीकडे नेण्याचे त्यांचे कौशल्य बघून अनेकांनी त्यांचे वर्णन “मनोवैज्ञानिकांचा गुरु” असेही केले आहे. मेहेर बाबांचे मौन हे एक रहस्य आहे. ते एक स्तरित वास्तव आहे. त्याचे विविध पैलू आहेत. स्वतः बाबानी आपले मौन,मौन स्वीकारण्याची कारणे, आपल्या शब्दोच्चाराने ते कधी आणि कसे सोडणार, आणि त्याची परिणिती त्यांच्या अवतारकार्याच्या प्रकटीकरणात कशी होणार ह्याचे विवरण अनेक वेळा विविध प्रकाराने केले आहे. अणुस्फोटानंतर होणाऱ्या साखळी प्रतिक्रियेसारखे ,ह्या दिव्य घटनेचे पडसाद मानवजातीवर भविष्यातील अनेक शतकांपर्यंत कसे होत राहणार ह्याचेही वर्णन त्यांनी वेळोवेळी केले आहे.बाबांच्या ह्या वक्तव्यांचा अर्थ लावतांना, त्यांनीच दिल्येला खालील इशाऱ्याचे भान ठेवल्यास आपला गोंधळ होणार नाही. मेहेरबाबा आपल्या वक्तव्यांमध्ये आपल्याला समजेल अशीच भाषा वापरतात. पण त्याच बरोबर ते त्यांच्या ईश्वरीय जाणिवेच्या पातळीवरील गूढ भाषा देखील वापरतात. उदाहरणच द्यायचं झालं तर सुशिक्षित पिता जेंव्हा आपल्या चार वर्षाच्या पुत्राशी बोलतो तेंव्हा आपल्या मुलाला समजेल अशीच भाषा वापरतो. पण काही वेळेस तो नाईलाजाने किंवा अनावधानाने आपली स्वतःची भाषा देखील वापरतो. बाबांच्या मौनभंग, प्रकटीकरण ह्यासंबंधीच्या विधानांमध्ये आपल्याला समजू शकेल अशा भाषेबरोबरच अवताराच्या ईश्वरीय भाषेचं मिश्रण झाले आहे असे बाबांनी स्वतःच नमूद केले आहे. म्हणूनच ह्या विधानांचा अर्थबोध आपल्याला संबंधित घटना घडून गेल्यावरच होऊ शकेल. बाबांनी मौन सुरु करून आता नव्वद, तर देह ठेऊन आता पन्नास वर्षाचा काळ उलटला आहे. म्हणूनच बाबांच्या मौनविषयावरील वक्तव्यांचे पुनरावलोकन करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. मौनाचे प्रयोजन मेहेर बाबांनी मौन का स्वीकारले ह्या प्रश्नाचे एक सहज समजेल असं उत्तर बाबांनीच दिलं आहे. दोन व्यक्ती रागावल्या असल्यास एकमेकांवर का ओरडतात? असा प्रश्न बाबांनी एकदा केला. उत्तर आलं - खूप राग आल्या मुळे. मग बाबांनी पुन्हा विचारले - दोन प्रेमात पडलेल्या व्यक्ती एकमेकांशी अगदी कुजबुजल्या आवाजात का बोलतात? उत्तर आलं प्रेमात पडल्यामुळे. मग बाबांनीच समर्पक उत्तर दिलं. “राग आल्यावर हृदये एकमेकांच्या खूप दूर जातात - साहजिकच, जवळ असूनही मानाने दूर असतात, ह्याउलट प्रेम करणाऱ्या व्यक्ती दूर असूनही मनानी निकट येतात; एका जोडीला ओरडायची जरूर भासते तर दुसऱ्या जोडीस कुजबुज पुरेशी होते. प्रेमाची मात्रा अजून वाढल्यावर तर शब्दाचीही गरज वाटत नाही..नेत्रांची भाषा पुरेशी होते! मी तुमच्या अगदी जवळ आहे - अगदी तुमच्या श्वासाहूनही जवळ आहे, मग मला तुमच्याशी बोलण्यासाठी शब्दांची गरजच काय?” बाबांनी मौन सुरु करायच्या आधल्या दिवशी, म्हणजेच ९ जुलै १९२५ रोजी त्यांच्या एका अनुयायाने बाबांना एक शंका विचारली, " बाबा! तुम्ही तर सद्गुरू - म्हणजे जगतगुरु! तुम्हीच जर बोलणे बंद केले तर लोकशिक्षण कोण करणार?" ह्या प्रश्नाचे जे उत्तर बाबांनी दिले ते त्यांच्या अवतारकार्याचा एका वाक्यात काढलेला सारांश आहे.बाबांच्या समाधीवर ते वाक्य इंग्रजी भाषेत कोरले आहे, त्याचा मराठी अनुवाद असा - " मी शिकविण्याकरता करता नव्हे तर जागृत करण्याकरता आलो आहे." ह्याचाच अर्थ बाबांचे कार्य केवळ दृश्य स्तरावर नसून अदृश्य अशा चेतना जागृतीच्या स्तरावर झाले आहे. बाबांचे मौन आपल्याला चेतनेच्या स्थित्यंतराचा मार्ग मोकळा करून देते. अवतार आपल्यासाठी अमोलिक ठेवा घेऊन येतो.बाबा स्पष्ट करतात “ ह्या शास्वत ठेव्याची देवाणघेवाण ही मौनाच्या माध्यमातून होत असते." मौनाच्या चार अवस्था बाबांच्या मौन-प्रवासाची वाटचाल मुख्यत्वेकरून चार अवस्थांमधून झाली. त्यांच्या जन्मापासून १० जुलै १९२५पर्यंत म्हणजे ३१ वर्ष “वैखरी” अवस्था म्हणता येईल. प्रथमावस्थेत बोलण्याचे किंव्हा लिहिण्याचे कुठलेही बंधन नव्हते. दुसऱ्या अवस्थेत बाबांनी मौन स्वीकारलं. ह्या काळात त्यांनी स्वहस्ताने भरपूर लिखाण केलं . हि दुसरी अवस्था १० जुलै १९२५ ते १ जानेवारी १९२७ पर्यंत होती. म्हणजे जेमतेम १८ महिन्याचा कालखंड.ह्या अवस्थेला आपण संक्रमण अवस्था समजू शकतो. वैदिक परिभाषेत आपण “मध्यमा” अवस्थाही म्हणू शकतो. तिसऱ्या अवस्थेत बाबांनी बोलण्या बरोबर सर्व प्रकारच्या लिखाणाचाही त्याग केला. ह्या अवस्थेचा कालावधी १ जानेवारी १९२७ ते ७ ऑक्टोबर १९५४ , म्हणजे २७ वर्षाचा होता. एका फलकावर लिहिलेली इंग्रजी वर्णमालेची अक्षरे आणि १ ते ९ ह्या संख्यांवर बोट ठेऊन बाबा संवाद साधत असत. ह्या अवस्थेला आपण “वर्णमाला फलक” अवस्था किंव्हा वैदिक भाषेत “पूर्व-पश्यन्ति” अवस्था असेही म्हणू शकतो. बाबांच्या मौनाचा चौथा म्हणजेच अंतिम टप्पा होता ७ जानेवारी १९५४ ते त्यांनी शरीर त्यागले तो पर्यंत, म्हणजेच ३१ जानेवारी १९६९ पर्यंत. ह्या १५ वर्षांच्या चौथ्या टप्प्यात बाबांनी मौनाची तीव्रतम अवस्था स्वीकारली आणि वर्णमाला फलकाचाही त्याग केला. ह्या दरम्यान बाबा संवादासाठी त्यांनी स्वतः विकसित केलेल्या हावभावांच्या बोलीचा वापर करीत असत. ह्या चौथ्या टप्प्यातील मौनाला आपण वैदिक परिभाषेत “उत्तर-पश्यन्ति” अवस्था असेही म्हणू शकतो. बाबांनी आपल्या मौनाच्या चार अवस्थांचा उल्लेख “वैखरी,मध्यमा,पश्यन्ति आणि परा” ह्या वाणीच्या चार वैदिक संकल्पनांशी जोडून कधीही केलेला नाही. पण वेद-उपनिषदांमध्ये आणि अथर्वशीर्षामध्ये वर्णन केलेल्या ह्या चार संवाद-माध्यमांमध्ये आणि बाबांच्या चार मौन अवस्थांमध्ये विलक्षण साम्य आढळते.मेहेर बाबांचे मौन हा एक अंतर्प्रवास आहे . हा प्रवास जाणिवेला अंतर्मुख करणारा आहे. आपल्या अवतारकार्याच्या परिणाम स्वरूप मानवाचा प्रवास सहज संवेदनेकडून (Instinct) तर्क-संगत संवेदनेकडे (Reason) झाला आहे आणि भविष्यात अंतःप्रेरणेकडे (Intuition) होणार असल्याचे बाबांनी सूचित केले आहे.वैखरी,मध्यमा,पश्यन्ति व परा ह्या संवादाच्या चार वैदिक संकल्पना देखील चेतनेचा अंतर्प्रवास दर्शवितात. एका टोकाला पायथ्याशी आहे “वैखरी” - ही सर्वसामान्य माणसाची भाषा, तर दुसऱ्या टोकाला, शिखरावर आहे “परा” - हे आत्म्याचे परमात्म्याशी असलेले संवाद माध्यम.ह्या दोन टोकाच्या अवस्थांमध्ये, पश्यन्ति हि संवादाची दृश्य अनुभूती ,सूक्ष्म आणि मनोजगताची भाषा, तर माध्यमा हा स्थूल आणि सूक्ष्म जगतांना जोडणारा पूल. मौनाच्या अधिकाधिक गडद आणि गहिऱ्या होत जाणाऱ्या रंगछटांचे प्रतिबिंब आपल्याला त्याच क्रमाने बाह्यजगाच्या समांतर इतिहासात, (१९२० च्या दशकांपासून अगदी आजपर्यंत) दिसून येते. संवादाची प्रथमावस्था बाबांच्या अवतारकार्याच्या वैखरी अवस्थेत ( १८९४ ते १९२५) बाबा बोलत असत, गझल व गीतरचना करून आपल्या मधुर आवाजात गात असत. अवताराची प्रत्येक क्रिया बाह्य जगातला कार्यान्वित करते. ह्याच कालावधीत विद्युतचुंबकीय लहरींचा शोध लागला , त्यांच्या साह्याने आवाजाचे दूरवर प्रसारण शक्य झाले, रेडिओ ह्या प्रसार माध्यमाचा विकास झाला. टेलेफोन,ग्रामोफोन हि ध्वनी यंत्रे प्रचलित झाली. संवादाची द्वितीयावस्था १९२५ ते १९२७ च्या दरम्यान, मौनाच्या संक्रमण काळातील मध्यमा अवस्थेत बाबांनी स्वतःच्या हातानी भरपूर लिखाण केलं. ह्या काळात बाबांनी लिहिलेल्या हस्तलिखिताला त्यांनी विशेष महत्व दिले आहे. ते हस्तलिखित अनेक वर्ष बाबा आपल्या बरोबर ठेवत असत, अगदी प्रवासात सुद्धा. त्यानंतरच्या काळात काही वर्षे त्यांनी हे हस्तलिखित बँकेच्या लॉकर मध्ये ठेवले, पण अलीकडच्या काळात मात्र ते हस्तलिखित कुठे आहे हे कोणीच सांगू शकत नाही. कदाचित त्याच्या प्रकाशनाची योग्य वेळ अद्याप आलेली नाही.स्वतः लिहिलेल्या हस्तलिखितांचे प्रकाशन टाळून, संचयित ईश्वरीय ऊर्जेचा उपयोग बाबांनी बाह्य जगतामध्ये प्रकाशन व्यायसायात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यात करून घेतला असे दिसते. ह्या कालखंडात जर्मनीत अल्बाट्रॉस , इंग्लंड मध्ये पेंग्विन आणि अमेरिकेत पॉकेट बुकस ह्या प्रकाशन व्यायसायातल्या कंपन्यांनी अत्यल्प दारात पपेरबॅक पुस्तकाचा फार मोठ्या प्रमाणावर खप सुरु केला. साक्षरतेचा प्रसार होऊन माफक किमतीची ही पुस्तके सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली. शब्दांच्या साह्याने व्यक्त होणारे ज्ञान ‘आम’ न राहता ‘खास’ झाले. आणि अर्थाबरोबरच अनर्थाचीही व्याप्ती वाढली. संवादाची त्रितीयावस्था १ जानेवारी १९२७ पासून बाबांनी लिखाणही पूर्णपणे बंद केले. संवादाचे माध्यम म्हणून वर्णमाला फलकाचा वापर सुरु केला. ह्यापुढे २७ वर्षे बाबांची ही पूर्व-पश्यन्ति मौनावस्था होती. ह्या दरम्यान बाबांचे मौन अधीकच प्रखर झाले, आणि ह्याच काळात त्यांच्या कार्याला देखील वेग प्राप्त झाला. विश्व संचराच्या, नवजीवनाच्या ह्या काळात बाबांनी अखंड प्रवास केला. अवतारकालाची ही सर्वात ज्यास्त सक्रिय,उर्जावान अवस्था. ऊर्जा हा सूक्ष्म जगताचा स्थायीभाव. म्हणूनच ह्या दुसऱ्या मौनावस्थेला “पूर्व पश्यन्ति” असेही म्हणता येईल. पश्यन्ति म्हणजे पाहणे - आवाजाचे दृश्य माध्यम. ह्या तीन दशकांमध्ये, सिनेमा,टेलिव्हिजन ही दृश्य माध्यमे फार मोठ्या प्रमाणात विकसित झाली. दृश्य माध्यम हे “मुद्रण आणि श्राव्य” माध्यमांपेक्षा ज्यास्त प्रभावी असते.दृक-श्राव्य माध्यमाच्या विस्ताराने निरर्थक शब्दांना फसव्या दृश्यांची जोड मिळाली. आणि अर्थाबरोबर अनर्थाची व्याप्तीही शिगेला पोहचली.इलेक्ट्रॉनिक्स चा झपाट्याने विकास झाला. संगणक युगाची ही नांदी होती. संगणक आणि मोबाईल फोन्स मोठ्या प्रमाणावर सामान्य लोकांपर्यंत उपलब्ध होण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत तंत्रज्ञानाचा विकास ह्या काळात झाला. ह्या दोन्ही माध्यमांमध्ये वर्णमाला फलकाचा उपयोग प्रामुख्याने होतो. ज्या काळात वर्णमाला पट्टी वर अवलंबून प्रसार माध्यमांची क्रांती झाली त्याच काळात बाबांचे मौन-माध्यम वर्णमाला फलक असणं हा योगायोग नव्हे तर अवतार-कार्याचा दूरगामी परिणाम दर्शविणारे बोलके उदाहरण आहे. संवादाची चतुर्थावस्था ७ ऑक्टोबर १९५४ रोजी बाबांनी वर्णमालाफलकाचा त्याग केला आणि मौनाची नवीन - देहबोलीची, हाताच्या आणि बोटांच्या इशाऱ्यांची, चेहेर्यावरील बोलक्या भावतरंगांची अवस्था सुरु झाली.ही मूक-बधिरांची भाषा नसून बाबांनी विकसित केलेली एक नाविन्यपूर्ण अशी आगळी-वेगळी भाषा होती .ही भाषा एकाच वेळी विशिष्ट आणि संदर्भ सापेक्ष आहे आणि त्याच बरोबर सार्वत्रिक आणि संदर्भ निरपेक्ष देखील आहे. ही मौनाची“उत्तर पश्यन्ति” अवस्था. “मनोजवं मारुततुल्यवेगं!“- मनोजगताची वेगवान भाषा! ह्या अवस्थेचे प्रयोजन बाबांनी स्पष्ट केले आहे. “संवादासाठी मी पूर्णपणे आंतरिक माध्यमे विकसित केली आहे. जगतातील प्रत्येक जीवमात्र आता माझ्या थेट संपर्कात येणार आहे. म्हणून मला आता वर्णमाला फलकाचीही गरज नाही.” ह्याचा परिणाम बाह्य जगतात होतांना दिसत आहे. टेलिव्हिजन हे माध्यम घराघरात पोहोचले आहे. इंटरनेट चे विश्वव्यापी जाळे आता निर्माण होऊ लागले आहे . पृथ्वीतलावर झपाट्याने हे जाळे जनमानसात पसरू लागले आहे. मोबाईल इंटरनेट आणि स्मार्ट फोन्स च्या जगात वर्णमाला फलकांची जागा आभासी वर्णमालेने घेतली.प्राचीनकाळी ऋषी मुनी प्रतिसृष्टी निर्माण करू शकत असत आणि अति-विध्वंसक ब्रह्मास्त्राची निर्मिती आणि प्रयोग करू शकत असत हे आपण वाचले आहे.आजचा वैज्ञानिक यंत्रमानव-तंत्रज्ञान ,सर्वस्पर्शी इंटरनेट आणि जैव-तंत्रज्ञान ह्यांच्या मदतीने कृत्रिम जाणीव (AI -Artificial Intelligence) प्रसवण्याची महत्वाकांक्षा बाळगून आहे. आपल्या नजरेसमोर उलगडणारा प्रसार, संवाद आणि प्रवास माध्यमांचा हा ऐतिहासिक उत्कर्ष आणि जैविक तंत्रज्ञानाने मारलेली मजल विस्मयजनक तर आहेच पण भयावह देखील आहे. प्रचंड शक्तीशाली सिंव्हावर आरूढ होण्यासाठी विवेकाचा आसूड जवळ असणे अत्यावश्यक असते. विवेका अभावी ब्रह्मास्त्रधारी अश्वत्थाम्याचे अधःपतन आपण ऐकले आहे. कोणतेही तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्रासारखे असते. त्याचा उपयोग सर्जनशील आणि विध्वंसक दोनीही रीतीने करता येतो. मानवी मनाचा नैसर्गिक कल हा स्वार्थी आणि विवेकहीन कृतीकडे अधिक असतो. अणुशक्तीचा शोध लागला आणि सर्वप्रथम त्याचा उपयोग १९४५ मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर अण्वस्त्रांद्वारे केलेल्या संहाराने झाला. सर्जनशील प्रयोग -वीजनिर्मिती करायला मात्र एक दशकाचा काळ लागला. विश्वसंकटाची चाहूल मुद्रण आणि दृक-श्राव्य माध्यमांचा अभूतपूर्व विकास, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झालेली अर्थ आणि अनर्थाची व्याप्ती, विज्ञानाची प्रगती, त्यातून निर्माण झालेली प्रचंड ऊर्जा आणि त्या ऊर्जेचे होणारे दुरुपयोग हा सर्व घटनाक्रम अवतार कार्याशी निगडित आहे. महामौनाच्या साह्याने संचयित केलेली ऊर्जा बाबांनीच मानवाला उपलब्ध करून दिली आहे.अनर्थाचा आणि विनाशाचा मार्गच एकप्रकारे मोकळा करून दिला आहे . विसाव्या आणि एकविसाव्या शतकात, म्हणजेच मेहेरबाबांच्या अवतारयुगात अनेक ज्वलंत समस्या आज आपल्यासमोर विक्राळ स्वरूप धारण करून उभ्या आहेत. ह्या सर्व समस्या प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मानवनिर्मितच आहेत. अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे, जैव विज्ञान आणि इंटरनेट ह्यातून तयार झालेले यंत्र-मानव (रोबोटिक) तंत्रज्ञान व त्याचा दुरुपयोग ,लोकसंख्यावाढ आणि साधनांचा तुटवडा, वंशद्वेष आणि दहशतवाद ह्या झाल्या प्रत्यक्षपणे मानवनिर्मित समस्या. तर जल-वायू प्रदूषण, हवामानातला बदल, वाढणारे जागतिक तापमान आणि भूकंप, चक्रीवादळे, त्सुनामी ह्यांचे वाढते प्रमाण ह्या वरवर निसर्गजन्य वाटणाऱ्या पण अप्रत्यक्षपणे मानवनिर्मित असलेल्या समस्या. मौनभंगाची “परा” अवस्था आणि पुनरूज्जीवन अवताराचे महामौन आणि त्याचे विश्वव्यापी कार्य विनाशाचे प्रयोजन कसे होऊ शकते? ह्याचे उत्तर मेहेर बाबांनी दिले आहे. नवनिर्मिती साठी जीर्ण आणि दूषित झालेल्या व्यवस्थेचा विनाश होणे आवश्यक असते. वेळोवेळी ह्या संहाराचा उल्लेख बाबा करतात आणि पूर्वनियोजित धोक्याची ताकीद देतात “ जागे व्हा! पूर्वनियोजित घटनाक्रमानुसार जे व्हायचे, ते निश्चित होणार. माझ्या शब्दोच्चराचा क्षण समीप आहे, माझा दामन हाती घट्ट पकडून ठेवा.” शब्दोच्चराचा संबंध मौनभंगाच्या "परा" अवस्थेशी आहे. हा मौनभंग सृष्टीमधील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयातील जागृतीला कारणीभूत होणार आहे. आधीच उल्लेख केलेल्या बाबांच्या वचनाचा येथे पुनरुच्चार आवश्यक आहे. “पूर्वनियोजित विनाश” बाबांनी “आपल्या भाषेत “ वर्णन केला आहे. हा विनाश मानवी जाणिवेच्या सूक्ष्म म्हणजेच संस्कार पातळीवर होणार हे निश्चित पण दृश्य जगताच्या पातळीवर तो किती आणि कसा प्रकट होईल ? एका बाजूने अवतार विनाशकारी प्रवृत्तींना वेग देतो, पण त्याच बरोबर आपल्या मौनाच्या माध्यमातून ह्या प्रवृत्तींना विवेक आणि संयमाची खीळ घालण्याचे कार्य देखील निरंतर सुरु आहे. म्हणूनच अण्वस्त्रांचा प्रथम प्रयोग १९४५ साली झाल्यानंतर त्या विनाशकारी प्रयोगाची पुनरावृत्ती आज ८३ वर्ष लोटली तरी झाली नाही. हा एक चमत्कारच समजला पाहिजे. ह्यामागचे खरे कारण "परस्पर विनाशाची" भीती नसून अवताराने मौनाच्या माध्यमातून संचयित आणि योजनाबद्ध रीतीने प्रसारित केलेल्या विवेक ऊर्जेत आहे. अन्यथा भीती कधीही विवेकाला जन्म देऊ शकत नाही. वंशवादाविरोधी, लिंगभेदाविरोधी, सर्वच धर्मांमधील पूर्वग्रहाने कलंकित झालेल्या कर्मकांडांविरोधी ह्या सारख्या सत्प्रवृत्त आणि उदारमतवादी आंदोलनामध्ये जगभर समाधानकारक वाढ होतांना आपण पाहत अहोत . ह्या उलट, दुसऱ्या बाजूनी वंशद्वेष, वर्णद्वेष, स्त्रियांवरील अत्याचार, आतंकवाद ह्या सारख्या दुष्ट प्रवृत्तींचाही प्रभाव वाढत असल्याच्या घटनाही घडत आहेत. अवताराच्या मौनाने प्रेरित सर्जनशील आणि विनाशकारी दोन्ही प्रवृत्तींच्या गतिशील समतोलाचा आजवरचा प्रवास कसा झाला हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण गत शंभर वर्षांच्या घटनांच्या प्रकाशात केला. बाबांनी समाधिस्थ होऊन केवळ ५० वर्षे झाली आहेत. भविष्यात १०० वर्षापर्यंत (वर्तमान अवताराचे प्रकटीकरण) आणि ७०० वर्षापर्यंतच्या (पुढचा अवतारकाल) घटनांचा उल्लेख बाबांनी केला आहे. मौनभंगाच्या “परा” अवस्थेत अवताराचे प्रकटीकरण कोणत्या स्वरूपात होईल? सर्जनशील आणि विनाशकारी घटनांचा ह्या गतिमान समतोलाची पुढील साखळी नक्की कोणती असेल?ह्या प्रश्नांची उत्तरे अजूनही काळाच्या उदरात लपलेली आहेत.पण त्याची अंतिम कडी वैश्विक समन्वयाची , ऐक्याची, विश्वबंधूत्वाची असणार आहे.” सर्वच पंथांमधील निरर्थक कर्मकांडांचा भाग नष्ट करून, “सत्य” आणि “प्रेम” ह्या मूळ तत्वांचे पुनरुज्जीवन करून,पूर्व अवतारांच्या वचनांचा अर्थ पुनर्प्रस्थापित करून, सर्वच धर्मांना एका माळेतील मण्यांसारखे ओवून मी एकत्र आणणार आहे” हे बाबांनीच स्पष्ट केले आहे. आपल्या विषयाचा समारोप त्यांच्या विश्वबंधुत्वाची ग्वाही देणाऱ्या प्रेरणादायी संदेशाने करणे संयुक्तिक ठरेल. विश्वबंधुत्वाची ग्वाही
"पूर्वी होऊन गेलेल्या अवतारांनी मानवजातीसाठी अनेक शब्द दिले आहेत , नियम सांगितले आहेत, अनेक उपदेश केले आहेत. त्या शब्दांची पायमल्ली करून मानवाने त्या शब्दांचा उपहासच केला आहे. किती इसाई " थोबाडीत मारल्यावर आपला दुसरा गाल पुढे करतात?” आणि " शेजाऱ्यावर प्रेम करा " ह्या ख्रिस्ताच्या उक्तीचे पालन करतांना दिसतात?” “अल्ला सर्वोपरी आहे " हे पैगंबराचे बोल कितीसे मुसलमान आचरणात आणतात? " स्वधर्माची मशाल " किती हिंदूंनी तेवत ठेवली आहे? किती बौद्ध " शुद्ध करुणेचे जीवन” व्यतीत करतांना दिसतात? " सत्य वचन,विचार आणि आचार " ह्या आदेशाचे पालन कितीशे झोरस्तर पंथीय लोक करतांना आढळतात?" "पूर्व अवतारांनी दिलेल्या आज्ञा-वचनांची अवहेलना होत असल्यामुळे माझ्या ह्या वर्तमान युगातील अवतारांत मी मौन पाळले आहे. शब्दांद्वारे तुम्हाला पुरेशे नियम आणि सूचना दिलेल्या आहेत. आज त्यांचे प्रत्यक्ष जीवनात पालन करण्याची वेळ आलेली आहे...अज्ञान आणि असमर्थता ह्यामुळे मानवाकडून ईश्वर-वचनाची अवहेलना होत आलेली आहे. ह्याचे प्रतिकूल परिणाम जगताला द्वेष, युद्धे, परस्परविरोधी विचारधारा,निसर्गजन्य दुर्घटना आणि ह्या द्वारे मिळालेल्या हाल-अपेष्टांमार्गे भोगावे लागतात. या सर्वांची परिसीमा गाठल्यावरच अवताराचे प्रकटीकरण होते आणि ईश्वरीय सत्य-तत्वाची स्थापना होते." "माझे मौन आणि होऊ घातलेला मौनभंगामुळे अज्ञानाच्या भयंकर आणि शक्तिशाली विळख्यातून मानवाची मुक्तता होणार आहे. माझ्या मौनभंगाच्या माध्यमातून ईश्वराच्या विश्वव्यापी अद्वैताचा अनुभव उपलब्ध होईल.ह्याद्वारे निर्माण होणारी विश्वबंधूत्वाची प्रत्यक्ष अनुभूती हा दैवी योजनेचा भाग आहे. माझे मौन अनिवार्य होते आणि लवकरच होऊ घातलेला मौनभंग हा देखील अपरिहार्य आहे."
Comments