१. "साईनाथांनी मला दैवी शक्ती प्रदान केली.
बाबाजान यांनी मला दैवी आनंद बहाल केला.
उपासनीमहाराजांनी मला दैवी ज्ञान दिले."
"मी अमर्याद शक्ती, ज्ञान व आनंद आहे;
मी 'पुराणपुरुषोत्तम' आहे व या आधुनिक जगाचा उद्धार करण्यासाठी मी आलो आहे."
२. "मी पुराणपुरुषोत्तम आहे. मी जेव्हा म्हणतो की मी अवतार आहे तेव्हा ते मी तसा विचार करून म्हणत नाही किंवा मी ईश्वर आहे असे अनुमान बांधून सांगत नाही. मला माहित आहे, हे असेच आहे. एखाद्याने 'तो ईश्वर आहे' असे म्हणणे ही ईश्वरनिंदा आहे, असे अनेकांना वाटते; पण खरे म्हणजे (माझ्या बाबतीत) 'मी ईश्वर नाही' असे मी म्हणणे म्हणजे, मी ईश्वराची घोर निंदा करत आहे, असे मला वाटते."
३. "तुमच्या हृदयात हे शब्द करून ठेवा: काहीही खरे नाही; फक्त ईश्वरच काय तो सत्य आहे. कशालाच अर्थ नाही; फक्त ईश्वरावरील प्रेमच काय ते अर्थपूर्ण आहे."
४. "तुमच्यातील दोषांची काळजी करू नका; सरतेशेवटी ते जातीलच. जरी ते रेंगाळत राहिले तरी प्रेम एक दिवस त्यांना नष्ट करील. काळजी करू नका. बाबांचं तुमच्यावर प्रेम आहे व तीच खरी महत्त्वाची गोष्ट आहे."
५. धर्म: "सर्व प्रकारच्या संकुचितपणापासून मानवाची मुक्तता करण्यासाठी मुळात धर्माची स्थापना झालेली असली, तरी त्याचे आकलन नीट न झाल्यास, तोच एक पिंजरा बनतो. जगातील सर्व धर्म एकच एक सनातन व विश्वव्यापी सत्य सांगत असतात. पण आपल्या कमकुवतपणामुळे मर्यादित व कोत्या निष्ठांना कवटाळून बसण्याची मानवांत जी प्रवृत्ती आहे, तीच अमर्याद प्रेमसागराचा या ईश्वरी तत्त्वाकडे जाण्याचा त्याचा मार्ग बंद करते. धर्माच्या मूलतत्त्वांनी नव्हे, तर त्यांच्या बाह्य-विधि उपचारांविषयीच्या आसक्तीमुळे माणूस माणसाला पारखा झालेला आहे. अशा रीतीने जगातील थोर धर्म-संस्थापकांच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला गेला आहे. हे स्वतःच निर्माण केलेले तुरुंग फोडून टाका व मी आणलेल्या अमर्याद जीवनाचा आस्वाद घ्या, असे आवाहन मी मानवाला करीत आहे."
६. प्रतिकूल परिस्थिती : एक वरदान : "प्रतिकूल परिस्थिती, संकट किंवा दुर्दैव यांनी तुमच्यावर घाला घातला असता हताश होऊ नका किंवा हातपाय गाळू नका; उलट ईश्वराचे आभारच माना. कारण, त्यांच्या द्वारे धैर्य व सहनशीलता, ही आपल्या अंगी बाणविण्याची संधी त्याने तुम्हाला दिलेली असते. प्रतिकूल परिस्थितीला टक्कर देण्याची हिम्मत ज्याने संपादन केलेली आहे, तो आध्यात्मिक मार्गात सहज प्रवेश करू शकतो."
७. चमत्कार : "पुष्कळ लोक जाणीवपूर्वक किंवा अजाणता चमत्कारांना वाजवीपेक्षा फाजील महत्त्व देतात. ते, चमत्कार म्हणजेच अध्यात्मिकता, अशी चुकीची समजूत करून घेतात... परंतु शास्त्र व अतींद्रियशास्त्र, गुढवाद व अध्यात्मशास्त्र यांतील फरक अगदी निश्चित व स्पष्ट आहे. या फरकातील गर्भितार्थ जर जाणून घेतला नाही, तर गोंधळ उडतो. या स्थूल जगातील सामान्य घटनांइतक्याच गूढ घटनादेखील खोट्या कल्पनेतून निर्माण झालेल्या असतात. अध्यात्मिकदृष्ट्या फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे; ती म्हणजे, ईश्वरी जीवनाचा स्वतः साक्षात्कार करून घेणे व इतरांनाही तसाच साक्षात्कार व्हावा म्हणून स्वतःच्या दैनंदिन व्यवहारात तो प्रगट करणे."
"मी कोणताही चमत्कार करत नाही. मी परिस्थितीमध्ये बिलकुल बदलही करत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे; माझा आध्यात्मिक अधिकार इतका मोठा आहे की जगातील कोणत्याही कोपऱ्यात, कोणत्याही वेळी, संकटात सापडलेला एखादा माणूस माझा हृदयापासून धावा करेल तर ताबडतोब त्या संकटाचे निवारण होईल. हे काही निरर्थक सांगणे नव्हे; ही वस्तुस्थिती आहे. मी या विश्वाचा स्वामी आहे व माझ्या प्रेमीजनांचा दास आहे."
८. शुल्लक गोष्टीतील जीवन : "सार्वजनिक संस्थांना मोठमोठ्या देणग्या देण्यासारखी महत्कार्ये केली म्हणजेच सेवा झाली असे नाही; जे लहानसहान गोष्टींच्या द्वारे आपले प्रेम व्यक्त करतात, तेदेखील सेवाच करीत असतात. खचून गेलेल्या अंत:करणाला धीर देणारा एखादा शब्द किंवा निराशेतून आशा व प्रसन्नता यांना फुलविणारे एखादे स्मितहास्य यांना देखील महान त्याग व झुंजार वृत्तीने केलेले आत्म-यज्ञ, यांच्याइतकेच सेवा असे समजणे उचित ठरेल. अंतःकरणातील कडवटपणा समूळ नष्ट करून, त्याच्या ठायी नवीन प्रेमाचा उदय घडवून आणणारा एखादा कटाक्ष, त्याच्यामागे सेवेची भावना नसूनदेखील सेवाच ठरतो. या सर्व गोष्टींचा केवळ त्यांच्या त्यांच्या दृष्टीतून विचार केला तर त्या शुल्लक भासतील; परंतु जीवन हे अशा क्षुल्लक गोष्टींनीच गुंफले गेले आहे आणि त्यांच्याकडे जर दुर्लक्ष केले, तर जीवनातील सौंदर्यच नव्हे, तर अध्यात्मिक चैतन्यही लयास जाईल."
९. ध्यानातील प्रभावी शक्ती: "ज्याप्रमाणे एखाद्या विस्कळीत विचारात देखील शारीरिक कृतीत उतरण्याची शक्ती असते, त्याचप्रमाणे ध्यान, म्हणजे सखोल विचार किंवा पद्धतशीर चिंतन, हेही साधकात, त्याला आवश्यक असणारी एक विशिष्ट प्रकारची शक्ती निर्माण करते. परमपद प्राप्त करण्याची इच्छा बाळगणाऱ्यास या शक्तीचा फार उपयोग होतो. तिचा प्रभाव कदाचित एकदम दिसणार नाही, कालांतरानेही दिसणार नाही, पण अखेरीस मात्र तो प्रभाव खात्रीने फलदायी होतोच होतो."
१०. नामस्मरण संस्कारांची घाण कमी करते : " स्वतःची चित्तशुद्धी होण्यासाठी तुम्ही आपल्या विचारांना मोकळे सोडा, परंतु आपल्या कृतींवर मात्र सतत सक्त देखरेख ठेवा. क्रोध, काम व लोभ इत्यादींनी युक्त विचार शब्दांत व कृतींत उतरवू नका. मात्र त्यांना आडकाठी न करता मोकळेपणाने येऊ व जाऊ द्या. मग त्यांनी तुमच्या मनात निर्माण केलेले संस्कार कमी कमी होत जाऊन त्यांचा त्रासही कमी होईल. परंतु तुम्ही जेव्हा असे विकार कृतीमध्ये आणता -उघडपणे किंवा गुप्तपणे -तेव्हा नवीन संस्कार उत्पन्न करता. हे नवीन संस्कार, तुम्ही कृतीमध्ये जे संस्कार उतरविता, त्यांच्यापेक्षाही जास्त भयंकर असतात. हे नवीन संस्कार अधिक पक्केपणाने तुमच्या मनात मूळ धरून बसतात. केवळ ईश्वरी प्रेमाचा अग्नीच सर्व संस्कारांचे एकदाच कायमचे उच्चाटण करू शकतो. तथापि, ज्याप्रमाणे तुरटी एखाद्या भांड्यात असलेल्या गढूळ पाण्यातील घाण शोषून घेते, त्याप्रमाणे माझे स्मरण तुमच्या मनातील संस्कारांची घाण कमी करते. म्हणून ज्या वेळी रागाचे किंवा वैषयिक विचार तुमच्या मनात उद्भवतील, त्यावेळी एकदम माझे स्मरण करा. माझ्या नामाचे जाळे तुमच्या भोवती उभारा, म्हणजे तुमचे विचार डासांप्रमाणे तुमच्या सभोवती गुणगुणत पिंगा घालत राहतील, परंतु तुम्हाला दंश करू शकणार नाहीत. या पद्धतीने वाईट विचार कृतीत उतरविण्यास तुम्ही प्रतिबंध करू शकाल; मग मना तुमच्यामध्ये प्रकट होण्यासाठी जे पावित्र्य आवश्यक आहे, ते शेवटी तुम्ही आपल्या अंत:करणात निर्माण करू शकाल."
" माझ्यापेक्षाही माझ्या नामात खूप शक्ती आहे. म्हणून मी माझे स्वतःचे नामस्मरण अखंडपणे करत असतो."
११. जग म्हणजे केवळ भ्रम आहे : "जादुगाराचे चमत्कार, ते पाहणाऱ्यांच्या भ्रमावर आधारलेले असतात. मृगजळापेक्षा त्यांची सत्यता अधिक नसते. त्याप्रमाणे सृष्टी ही मायेमुळे खरी वाटते. लहान मुले जादुगाराची वाहवा करतात. त्यांना जादुगाराचे खेळ खरे वाटतात. पण मोठया माणसांना माहीत असते की, तो त्यांची फसवणूक करीत असून, त्याचे चमत्कार खोटे आहेत. अज्ञानी लोक जगतालाच अंतिम सत्य समजतात. तथापि, जग म्हणजे केवळ भ्रम आहे, हे फक्त ज्ञानी लोक जाणतात."
१२. टीका करू नका : "आपल्या बांधवांवर टीका करण्याची सवय ही वाईट आहे. तिच्या मुळाशी पुष्कळ वेळा स्वतःच्या नैतिकेची प्रौढी, अहंपणा व श्रेष्ठत्वाचा खोटा अहंगंड ही असतात... काही वेळा असूयेची किंवा सूडाची भावना तिच्यापासून व्यक्त होते."
१३. सर्वश्रेष्ठ परोपकार : "आपण स्वतः केलेले अन्याय आणि स्वतःवर इतरांनी केलेले अन्याय या दोहोंना विसरून जाणे ही गोष्ट मानवास अशक्य आहे. आणि हे विसरू शकत नसल्यामुळे क्षमा करणे त्यांना अवघड जाते. परंतु क्षमाशीलता हा सर्वश्रेष्ठ परोपकार होय. स्वतःजवळ धन आणि मालमत्ता मुबलक असताना गरिबांस त्यांचे दान करणे, ही सोपी गोष्ट आहे. परंतु क्षमा करणे ही कठीण गोष्ट आहे. एखादा ती करू शकला तर ती सर्वांत उत्तम गोष्ट ठरेल."
१४. विनाश थांबविण्यासाठी अवतार येतो : "अवतार हा निरनिराळ्या रूपांत, निरनिराळ्या नावांनी, निरनिराळ्या काळी आणि जगताच्या निरनिराळ्या भागांत दृश्यमान होत असतो. पारमार्थिक दृष्टीने मानवजातीचा नवीन जन्म होत असताना तो मुर्तरूप धारण करीत असतो. अवताराच्या प्रगटीकरणापूर्वीचा काळ हा एक प्रकारचा पुनर्जन्म असल्यामुळे, या काळात मानवास पुनर्जन्मापूर्वीचे निरतिशय दुःख भोगावे लागते. या काळात मनुष्य वासनेचा नेहमीपेक्षा अधिक गुलाम बनलेला, लोभाकडे अधिक आकृष्ट झालेला, त्याचप्रमाणे भीतिग्रस्त व अधिक क्रोधाविष्ट झालेला दिसतो. 'बळी तो कान पिळी' अशी स्थिती होऊन, श्रीमंत गरिबांवर जुलम करतात; जे सत्ताधीश असतात त्यांच्याकडून, मूठभर सत्ताधीशांच्या फायद्यासाठी बहुजनसमाज लुटला जातो. ज्या मनुष्यास शांती अगर स्वस्थता मिळत नाही, तो उत्साहवर्धक कृत्रिम उत्तेजक द्रव्यात ( Excitement ) स्वतःस विसरण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे समाजाची सर्व बाजूंनी अधोगती होते. राष्ट्रीय व जातीय द्वेष उत्पन्न होऊन ते वाढीस लागतात, युद्धे उद्भवतात; मानवजात अगतिक होऊन हताश बनते. ही विध्वंसाची लाट थांबविण्याची शक्यता दिसेनाशी होते. नेमक्या याच वेळी अवतार येतो."
१५. ईश्वराचे निवासस्थान : "मनाच्या आवाजाचे मुळीच ऐकू नका. अंत:करणाच्या आवाजाचे ऐकत जा. मन हे चंचल असते. अंत:करण तसे असत नाही. मन घाबरते, अंत:करण निर्भय असते. तर्क व मन म्हणजे संशयकल्पना यांचे घर असते. उलट अंत:करणातून हीन वासना, द्वेष, स्वार्थ यांची हकालपट्टी करा, म्हणजे ईश्वर तुमच्या खऱ्या आत्मस्वरूपात, तुमच्यात प्रकट होईल."
१६. निंदकाचे घर : "जो तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतो त्याच्यावर रागावू नका, तर खुष व्हा. कारण तुमच्या संस्कारांचे ओझे हलके करून तो तुमची सेवाच करीत असतो... त्याची कीवही करा. कारण तो स्वतःच्या संस्कारांचे ओझे अधिक जड बनवीत असतो."
१७. "लोक हो, आपल्या अज्ञानातून जागे व्हा... तुम्हापैकी प्रत्येक जण ईश्वराव्यतिरिक्त अन्य कोणी नाही. अवतारच तेवढा ईश्वर आहे असे नव्हे, तर मुंगी व चिमणी सुद्धा ईश्वरच आहेत. बाह्यात्कारी भेद दिसतो तो केवळ जाणीवशक्तीच्या अवस्थांमधील फरक आहे. अज्ञानात राहू नका. आपल्या मानवी बंधूंमध्ये भेद करू नका... ईश्वरी प्रेमाच्या लाभासाठी झटा... संसारातील आपली कर्तव्यकर्मे पार पाडीत असतानादेखील आपल्या प्रियतम ईश्वराशी असलेले आपले खरे ऐक्य ओळखून, ते अनुभवण्यासाठी जीवन जगा. पवित्र व्हा, साधे रहा. सर्व एकच असल्याने सर्वांवर प्रेम करा. दुसऱ्याला मदत करण्यासाठी परामावधीचे कष्ट घ्या. ईश्वरी प्रेमाच्या देणगीशिवाय अन्य कसल्याही बक्षीसाची इच्छा धरू नका. मी माझ्या ईश्वरी प्रामाणिकपणास स्मरून सांगतो की, जितके मिळावे म्हणून तुम्ही तळमळत राहाल त्याहून कितीतरी पटींनी अधिक मी तुम्हांस देईन. माझ्या दिव्य प्रेमाच्या ठिणगीने तुमच्या हृदयात ईश्वरी प्रेमासाठी तीव्र तळमळ रुजो. त्यासाठी तुम्हां सर्वांना माझ्या आशीर्वाद."
१८. " प्रार्थनेमागील सारभूत तत्त्व कोणते?... बहुतेक प्रार्थनांच्या बुडाशी, परमेश्वराजवळ काहीतरी ऐहिक किंवा आध्यात्मिक लाभाची मागणी करण्याचाच हेतू सर्रास आढळून येतो. वास्तविक परमेश्वर इतका दयाळू व उदार आहे की, तो आपल्या भक्तांना, त्यांनी काही न मागतादेखील, ते जेवढे घेऊ शकतात त्यापेक्षा कितीतरी अधिक देत असतो. त्यांच्या खऱ्या गरजा काय आहेत याची त्याला त्यांच्यापेक्षा अधिक सखोल जाणीव असते. म्हणून ईश्वराजवळ कसलीही भिक्षांदेही वृत्ती ठेवणे, ही अनावश्यक गोष्ट होय. तिच्यामुळे पुष्कळ वेळां, प्रार्थना करणारा जे आंतरिक प्रेम व जो पूज्यभाव व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत असतो, त्यांना बाध येतो.
" ईश्वराची आदर्श प्रार्थना म्हणजे त्याच्या यथार्थ स्वरूपाची सहजस्फुर्त स्तुती. तुम्ही त्याची स्तुती करता ती याचक वृत्तीने नव्हे, तर आत्मविस्मृतीमध्ये त्याच्या यथार्थ स्वरूपाचा आस्वाद घेण्याच्या हेतूने. तो स्तुत्य आहे म्हणून तुम्ही त्याचे स्तवन करता."
Kommentare