top of page

मेहेर बाबांचे “मस्त” कार्य - अवतारकार्याचे एक गौरवशाली पर्व

Updated: Feb 22, 2023

मेहेर बाबांचे “मस्त” कार्य हे जागतिक अध्यात्म इतिहासातील एक गौरवशाली आणि “न भूतो न भविष्यती” असे पर्व आहे. अनेक अर्थांनी वैशिष्ठपूर्ण ठरलेले असे हे पर्व अतिशय रंजक आणि त्याचबरोबर गूढ देखील आहे. मेहेर बाबांच्या वैश्विक कार्यामधील ह्या महत्वाच्या टप्प्यात त्यांनी मस्तांना भेटण्यासाठी एक लाख दहा हजाराहून अधिक किलोमीटरचा अथक प्रवास केला. त्यांचा पहिला मस्त संपर्क १९२० च्या दशकात झाला असला आणि ह्या संदर्भातील अखेरचा प्रवास ५० च्या दशकात त्यांनी जरी केला असला तरी खऱ्या अर्थाने त्यांच्या मस्त कार्याचे सर्वाधिक संपर्क आणि प्रवास हे १९३९ ते १९४७ ह्या दरम्यान झाले. द्वितीय महायुद्ध, प्रथम आण्विक अस्त्रप्रयोग, भारत आणि इतर अनेक तत्कालीन ब्रिटिश वसाहतींमधील देशांना मिळालेले राजकीय स्वातंत्र्य, रक्तरंजित ठरलेले भारतीय उपखंडाचे विभाजन इत्यादी प्रचंड वेगाने होणाऱ्या जागतिक स्थित्यंतरांचा हा कालखं ! एका बाजूला होणारे हे दूरगामी जागतिक बदल तर दुसऱ्या बाजूला ह्याच कालखंडात मेहेर बाबांनी हातात घेतलेली मस्त संपर्काची मोहीम हा एक योगायोग नसून मेहेरबाबांच्या आध्यात्मिक कार्याचे दृश्य स्वरूप आहे.


मेहेरबाबांच्या मस्तकार्याचा समग्र इतिहास सांगणारा एक संदर्भग्रंथ बाबांच्या एका इंग्लिश डॉक्टर अनुयायाने अतिशय मेहेनतीने तयार केला आहे. त्या ग्रन्थचे नाव आहे “द वेफेअरर्स” ( पथिक ) आणि लेखकांचे नाव आहे विल्यम डॉनकिन. तो स्वतः मेहेरबाबांचा एक प्रामाणिक अनुयायी व साधक होता. नकाशांद्वारे मस्तकार्याची भौगोलिक व्याप्ती दाखवणारा, सर्व मस्त सम्पर्काची नोंद घेऊन मस्तांची पद्धतशीर सूची, वर्गवारी आणि विभागणी करणारा,बाबांनी केलेल्या मस्त प्रवासाच्या आणि मस्त संपर्का दरम्यान घडलेल्या हृदयस्पर्शी घटनांचे वस्तुनिष्ठ वर्णन करणारा हा ग्रंथ आध्यात्मिक वाङ्मयात मोलाची भर घालतो. ह्या ग्रंथाच्या प्रास्ताविकात मेहेरबाबांनी स्वतः मस्त आणि मस्तकार्याच्या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. मस्तकार्याचा संक्षिप्त परिचय देणाऱ्या सांप्रत लेखात ह्या संदर्भ ग्रंथालाच आधारभूत ठेवले आहे.आध्यात्मिक संघटना आणि अवतार युग


मस्त आणि मस्तकार्याचा संक्षिप्त परिचय करून घ्यायच्या अगोदर मेहेर बाबांनी स्वतः विशद केलेली काही आध्यात्मिक तथ्ये समजून घेणे आवश्यक आहे. रोजच्या घडामोडी असो अथवा दूरगामी परिणाम करणाऱ्या मनुष्यनिर्मित आणि नैसर्गिक घटना असो, त्यांचे योजनाबद्ध संचलन करणारी एकमेव आध्यात्मिक संघटना सदैव कार्यरत असते. ही आध्यत्मिक संघटना गुप्तपणे, पडद्याआडच्या अदृश्य पातळीवर कार्य करते.


कर्म सिद्धांताने बद्ध असलेला, कारण आणि परिणाम ह्यांचे अतूट नाते सांगणारा कायदा परमेश्वराने सर्व सृष्टीला लागू केलेला आहे. ह्या कायद्याच्या अभेद्य अमलाखाली सृष्टी कार्यरत असली तरी देखील त्याला एकच अपवाद आहे, आणि तो म्हणजे - ईश्वरीय प्रेम आणि करुणा. कर्म सिद्धांत आणि ईश्वरीय करुणा ह्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याचे कार्य ही आध्यात्मिक संघटना अव्याहत करीत असते. “ईश्वराच्या इच्छेशिवाय ह्या सृष्टीमध्ये झाडाचे पानही हलू शकत नाही” ह्या तथ्याचा केवळ पुनर्रउच्चार करून मेहेर बाबा थांबले नाहीत तर त्यामागची सविस्तर पार्श्वभूमी आणि कारणमीमांसा मेहेर बाबांनी ह्या अवतार काळात विशद केली आहे.


आपल्याला ज्ञात असलेल्या जागतिक संघटनांप्रमाणेच ही आध्यात्मिक संघटना देखील क्रमवार श्रेणीतत्वावर आधारित असते. अवतारकाळात ह्या संघटनेचे नेतृत्व स्वतः अवतार करीत असतो. साक्षात ईश्वर जेंव्हा मानवी शरीरात प्रकट होतो त्यालाच ‘अवतार’ म्हणतात.सर्व धार्मिक परंपरांमध्ये 'अवतार ' ह्या शब्दाला अनेक पर्यायी शब्द आहेत, जसे -रसूल, प्रेषित किंवा प्रॉफेट, ख्रिस्त, बुद्ध इत्यादी. जगाच्या संकटकालीच हे अवतरण होत असते. दोन अवतारयुगामधील कालखंड सुमारे ७०० ते १४०० वर्षांचा असतो. अवतारयुग हे नेहेमीच जागतिक आणीबाणीचे युग असते. ह्या युगामध्ये जगाच्या इतिहासात क्रांतिकारी बदल होतात. विसावे आणि एकविसावे शतक हे असेच एक आणीबाणीचे, क्रांतिकारी युग आहे.


आध्यात्मिक संघटनेचे व्यवस्थापन आणि क्रमवार श्रेणी व्यवस्था


जगामध्ये नेहेमीच ५ सद्गुरु कार्यरत असतात.मानव जेंव्हा महत्प्रयत्नाने ईश्वरत्व प्राप्त करतो आणि त्यानंतर लोक-कल्याणासाठी आपले ईश्वरत्व कायम ठेऊन मानवी चेतनेत पुनर्प्रवेश करतो तेंव्हा तो सद्गुरू पदाला प्राप्त होतो. सद्गुरूची माहिती आणि महती जगातल्या अनेक धर्मांमध्ये प्रचलित आहे. वेगवेगळ्या परंपरांमध्ये सद्गुरू ला पर्यायी शब्द उपलब्ध आहेत. सुफी परंपरेत सद्गुरू ला पर्यायी शब्द आहे कुतुब तर मेहेर बाबांनी Perfect Master हा शब्द वापरला आहे.अवतारेतर युगांमध्ये ५ सद्गुरू आध्यात्मिक संघटनेचे सामूहिक नेतृत्व करतात. अवतार युगामध्ये मात्र सद्गुरुंची भूमिका अवतरण घडवून आणून, त्यानंतर नेतृत्व अवताराकडे हस्तांतरित करण्यापुरते मर्यदित असते. अवतार आणि सद्गुरू दोहोंमध्ये जाणिवेच्या पातळीवर काहीही अंतर नसते. दोहोंमध्ये ईश्वरत्वाची जाणीव सामान रूपाने विद्यमान असते, फरक असतो तो त्यांच्या जगताशी असलेल्या कार्यासंबंधाचा.आजच्या व्यवस्थापकीय भाषेत सांगायचे झाले तर अवतार आणि सद्गुरू हे आध्यात्मिक संघटनेच्या क्रमवार श्रेणीत अध्यक्ष/प्रमुख कार्यकारी अधिकारी/संचालक अशा व्यवस्थापनातील सर्वोच्च हुद्द्याच्या भूमिका निभावतात. आता आपण मध्यम आणि कनिष्ट व्यवस्थापनाकडे नजर टाकू.


अध्यात्म मार्गाचा मानवी चेतने पासून ईश्वरीय चेतने पर्यंतचा प्रवास हा फार बिकट आणि जिकिरीचा आहे. मुख्यत्त्वेकरून हा प्रवास संपन्न करण्यासाठी साधकाला तीन जगतात (स्थूल जगत , सूक्ष्म जगत आणि मनो जगत अथवा कारण जगत) विद्यमान असलेल्या सात भूमिकांमधून प्रवास करावा लागतो - त्यांना आपण जाणिवेच्या सात पायऱ्या अथवा सात स्थानके म्हणूया.अध्यात्म मार्गावर अग्रसर असणारे साधक, संत, पीर, वली, फकीर, त्याचप्रमाणे देवदूत आणि अँजेल्स हे सर्व एका विशिष्ट आणि निश्चितअशा संख्याबळाच्या प्रमाणात ह्या सातहि स्थानकांवर आधिष्टित असतात. हे सर्व मार्गस्थ साधक मध्यम आणि कनिष्ट व्यवस्थापनात राहून ईश्वराच्या कार्यात हातभार लावीत असतात.


अध्यात्मसंघटनेच्या कार्यप्रणालीतील मस्तांचे स्थान समजून घेण्या अगोदर मस्त म्हणजे काय, त्यांचे महत्व आणि त्यांचे विशेष समजून घेणे आवश्यक आहे. हा विषय सुलभ करण्यासाठी बाबांनी आपल्या स्पष्टीकरणात त्यांची तुलना इतर आध्यात्मिक साधक, मद्यपी, लहान मुले आणि सामान्य माणसे अशी अनेकांशी केली आहे. प्रत्येक तुलनेद्वारे मस्तांचे वेगवेगळे पैलू आपल्याला अधिक विस्ताराने समजण्यात मदत होईल.


आध्यात्ममार्गावरील साधक आणि मस्त


काही आध्यात्मिक साधक सद्गुरू किंवा अवताराच्या थेट मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करीत असतात. ही वाटचाल वेगवेगळ्या प्रलोभनांनी, संकटांनी आणि थक्क करून टाकणाऱ्या अनुभवांनी परिपूर्ण असते. सद्गुरूच्या देखरेखीचा लाभ त्यांना सतत होत असतो आणि म्हणूनच ते मार्गावरील प्रलोभनांना बळी पडत नाही, त्याचबरोबर मार्गावरील अनुभव त्यांना भ्रमित करू शकत नाही. त्यांचे मानसिक संतुलन कायम राहते. ईश्वराच्या आत्यंतिक प्रेमाची नशा देखील सद्गुरूच्या करुणेमुळे त्यांचा तोल ढळू देत नाही.


मात्र काही बहाद्दर साधक असे असतात कि ते स्वतःच, सद्गुरूच्या थेट मार्गदर्शनाचा लाभ घेतल्या शिवायच ह्या बिकट मार्गावर ‘ एकला चलो रे ‘ करीत असतात. असे साधक ईश्वराच्या तेजस्वी स्वरूपाच्या अनुभवाने आणि त्याच्यावरील आत्यंतिक प्रेमाच्या नशेत आपले संतुलन टिकवू शकत नाही. ते ह्या मार्गावर मोहित, चकित आणि भ्रमित होऊन स्वतःच्याच तीव्रतम अनुभवांच्या विळख्यात ‘मस्त’ असतात. ह्या मस्तीमध्ये त्यांचे बाह्य जगताचे भान तर नष्ट होतेच,पण अध्यात्म मार्गावरची पुढील वाटचाल करण्याचे भान देखील त्यांच्या जवळ असत नाही. त्यांचे बाह्य वर्तन जरी त्यांच्या संबंधितांना वेड्यासारखे वाटत असले, तरी त्यांची आध्यात्मिक श्रेणी जगातल्या ‘ कथित’ विद्वानांच्या पातळीपेक्षा किती तरी अधिक उंचीवर असते.


मस्त, मनोरुग्ण आणि सामान्य माणूस


सामान्य माणूस ह्या द्वैत आणि मायावी जगामध्ये परस्पर विरोधी संस्कारांचे गाठोडे घेऊन जन्माला येतो. कर्मकायद्यानुसार आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांवर मात करताना त्याला परस्पर विरोधी संस्कारांचे ओझे डोईजड होते.मानसिक संतुलन बिघडण्याचा धोका त्याला सतत जाणवत असतो. आध्यात्मिक प्रगतीच्या अभावी परिपूर्ण संतुलन त्याच्या आवाक्यात नसते. तरी देखील आपल्या पूर्व पुण्यायीच्या बळावर आणि आपल्या कुवतीनुसार ह्या अंतर्विरोधांचा सामना करून संस्कारांचे तात्पुरते संतुलन प्राप्त करण्यात तो यशस्वी होतो. मनोरुग्णांची अवस्था कथित ‘शहाण्या’ माणसांसारखीच असते. फरक इतकाच कीं त्यांचे दुबळे मनोबल तात्पुरते संतुलन प्राप्त करून घेण्यास देखील अपयशी होते. शहाणपण आणि वेडेपण ह्यात इतकाच काय तो फरक असतो- इष्ट मनोबलासाठी जरूरी असणाऱ्या पुण्याईचा अभाव.

मस्तांची गुणात्मक अवस्था वरील दोन्ही अवस्थांपेक्षा भिन्न आहे. मस्तांकडे मानसिक ताकदीची कमी नसते. आपल्या स्वतःच्या पुण्याईच्या बळावर ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर विलक्षण झूजारूपणे ते कोणत्याही सद्गुरूच्या थेट मार्गदर्शनाशिवायच प्रगती करतात. ह्या मार्गावरील प्रलोभने आणि भ्रमित/चकित करून टाकणारे अनुभव ह्यांचा स्वबळाने सामना करीत असतांना त्यांच्या परस्पर विरोधी संस्कारांची घडी विस्कटून जाते. आत्यंतिक ईश्वर प्रेमाची नशा त्यांना चढते. मार्गातील बेभान करून टाकणारे दैवी अनुभव त्यांना अत्यानंदाच्या एका असंतुलित शिखरा पासून दुसऱ्या असंतुलित शिखरावर नेऊन बसवीत असतात. ह्या दैवी असंतुलनातून अवतार किंव्हा सद्गुरू हेच त्यांचे मार्गदर्शन करून त्यांचे असंतुलन दूर करू शकतात. ह्या संतुलना अभावी त्यांचे बाह्य वर्तन सामान्य माणसाला मनोरुग्णासारखे वाटते.


मनोरुग्ण, सामान्य माणूस, मस्त ह्या अवस्थांचे ईश्वराशी नाते स्पष्ट करणारे एक सोपे कोष्टकच मेहेर बाबांनी दिले आहे, ते असे - ज्याचे मन पूर्णपणे थांबलेले आहे तो परमेश्वर, ज्याचे मन कार्यरत आहे तो मनुष्य, ज्याचे मन थांबण्याच्या प्रयत्नात आहे तो मस्त, तर ज्याचे मन वेगाने भरकटत आहे तो मनोरुग्ण!


मनोरुग्णासाठी आणि मस्तांसाठी स्थापित आश्रम


मेहेरबाबांचे मस्तांबरोबरचे कार्य हा आपला प्रमुख विषय असला तरी मेहेर बाबांनी मनोरुग्णांच्या कल्याणासाठी जे कार्य केले त्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. विसाव्या शतकातील वेगाने होणाऱ्या क्रांतिकारी घटनांमुळे आणि वाढत्या अनिश्चिततेमुळे मानसिक विकारांचे प्रमाण सतत वाढत जाऊन आजमितीस सुमारे १५ ते २० टक्के लोक न्यूनगंड , उदासी, निराशा,चिंता ( डिप्रेशन) , खंडित मानसीकता ( स्चीझोफ्रेनिया) , द्विध्रुवी विकार ( bipolar disorder) इत्यादी मानसिक विकारांनी ग्रस्त आहेत.


अवतारकार्य हे सर्वसमावेशक असते. मेहेरबाबांनी १९३८ मध्ये मनोरुग्णांसाठी आणि मस्तांसाठी आश्रम काढला आणि ह्या आश्रमात त्यांनी मस्तानबरोबरच मनोरुग्णांची अतिशय प्रेमाने सेवा केली. मनोरुग्णांना समाजाच्या दूर “ पागलखान्यात” टाकून त्यांचा इलाज करण्यापेक्षा त्यांना प्रेमाने समाजात सामावून घेण्याची गरज आहे ह्याचे उदाहरणच मेहेरबाबांनी जगासमोर प्रस्तुत केले. ह्यासाठी त्यांची केवळ शारीरिक सेवा सुश्रुषा करून ते थांबले नाहीत. आपल्या एका प्लिडर नावाच्या अनुयायाला त्यांनी काही सूचना केल्या. प्लिडरने महत्प्रयासाने राजा गोपीचंद ह्याच्या जीवनावर आधारित एका नाट्यप्रयोगाची निर्मिती केली. विशेष म्हणजे ह्या नाट्यप्रयोगात सर्व भूमिका मनोरुग्णांनी आणि मस्तांनी निभावल्या होत्या. प्लिडर आणि इतर मंडळींनी ह्या प्रयोगासाठी सर्व मनोरुग्णांकडून आणि मस्तांकडून कसून तयारी करून घेतली. २१ ऑगस्ट ला मेहेराबादला हा लोकविलक्षण प्रयोग झाला. सर्व मनोरुग्णांनी आणि मस्तांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्या. मेहेरबाबा प्रयोगाला स्वतः उपस्थित होते. त्यांनी सर्वच अभिनेत्याचं आणि प्लिडरचं भरभरून कौतुक केलं. मेहेर बाबांनी जाहीर केले,’ हा प्रयोग माझ्या वैश्विक कार्याशी निगडीत आहे.’ जगाच्या रंगमंचावर पुढे होणाऱ्या महायुद्ध, फाळणी, जातीय आणि वंशवादी हिंसा ह्याची जणू ही रंगीत तालीमच बाबांनी करून घेतली. ह्या हिंसायुक्त घटनांना जागतिक रंगमंचावर प्रस्तुत करण्यासाठी अवताराला ‘वेड्यांच्या’ अभिनयाचा उपयोग झाला असावा. ह्या प्रयोगाचे आध्यात्मिक प्रयोजन असेल ते असो, ह्यानंतर लवकरच बाबांनी मनोरुग्णांबरोबरचे आपले कार्य आटोपते घेतले, आणि आपले सर्व प्रयत्न मस्त कार्यावर केंद्रित केले.


मनोरुग्णांना सोबत घेऊन केलेल्या कार्याचा परिणाम आज आपण बघत आहोत. मनोरुग्णांना आता ज्यास्त चांगली सहानुभूतीची वागणूक मिळते. मनोरुग्ण चिकित्सेमद्धये देखील आज नातेसंबंध, प्रेम, आपुलकी ह्या गोष्टींना आता ज्यास्त महत्व प्राप्त होते आहे. संयोगाने हार्वर्ड विद्यापीठात १९३८ साली जॉर्ज वालियनट ह्याने सुरु केलेल्या शोध प्रकल्पाचा निष्कर्ष सुद्धा हेच सांगतो - नातेसंबंधातील प्रेम आणि आपुलकी आपल्याला मनोविकारांपासून दूर ठेवते. हा शोध प्रकल्प जगामधील सर्वात ज्यास्त काळ चाललेला शोध प्रयोग म्हणून आज प्रसिद्ध आहे. पण या निष्कर्षाचे बीज अवताराने १९३८ साली सुरु केलेल्या मनोरुग्ण आश्रमात रुजवले होते ह्याची आपल्याला थोडीही कल्पना नाही. म्हणूनच मेहेर बाबांनी म्हंटले आहे कि अवताराची वर्तमान काळात केवळ अवहेलनाच होते, भूतकाळातल्या अवतारांची पूजा होते आणि भविष्यात येणाऱ्या अवताराची उत्कंठेने प्रतीक्षा केली जाते!


मस्त आणि लहान मुले


मेहेर बाबा आपल्या मस्तप्रेमाचे वर्णन करतांना सांगतात, “ मला जर खरोखर कोणाचा सहवास प्रिय असेल तर तो लहान मुलांचा आणि मस्तांचा. दोघांचाही निरागस स्वभाव मला भुरळ घालतो. लहान मुलांचा निरागस स्वभाव त्यांच्या निष्पाप असाहाय्यतेशी निगडीत असतो. तर मस्तांच्या निरागसपणाचे मूळ त्यांच्या सामर्थ्यात असते. ईश्वरप्रेमाच्या ज्वालेची आग केव्हढी भयंकर असते ह्याचा अनुभव फक्त मस्त आणि सद्गुरूंनीच घेतलेला असतो.ह्या ज्वालेत स्वेच्छेने होरपळणारे हे मस्त ईश्वरालाही एक आव्हानच असतात. ना त्यांना ईश्वर मिलनाची तमा असते ना त्यांना स्वतःच्या विभक्त अस्तित्वाची जाणीव असते. ते तर ईश्वरीय इच्छे पुढे पूर्णपणे नतमस्तक,शरणागत आणि समर्पित असतात. ह्या समर्पणापुढे प्रत्यक्ष ईश्वर देखील मस्तांना स्वतःच्या अस्तित्वात सामावून घेऊन त्यांच्या मिलनासाठी उत्सुक असतो.


अनेक मस्त बाबांना काही भेटवस्तू अर्पण करीत असत. एखाद्या बालकाने आपल्या आई वडिलांना द्याव्या तशाच ह्या वस्तू काहीशा बालिश आणि विचित्र असत - जसे त्यांनी वापरलेले जुने आणि फाटलेले कपडे, पागोडे, गादी किंवा त्यांच्या व्यसनाचे सामान- जसे बिडी चिलम इत्यादी. मेहेर बाबा मात्र हे सर्व निरुपयोगी सामान अत्यंत प्रेमाने आणि कौतुकाने जपून ठेवत असत. मस्तांच्या भेटवस्तूंनी भरलेली एक ट्रंक आजही मेहेराबादच्या संग्रहालयात जतन करून ठेवलेली आहे.


मस्त आणि मद्यपी


सुफी शायरी मध्ये मद्य ( दैवी प्रेम), मद्यपी ( प्रेमी) आणि साकी ( प्रियतम) ह्या संबधी व्यापक रूपकात्मक संदर्भ आपल्याला आढळतात. सुफी शायरीवर विशेषतः हाफिझ आणि रूमी ह्यांच्या शायरीवर मेहेर बाबांचे निरतिशय प्रेम होते.म्हणूनच आपल्या लाडक्या, निरागस आणि ईश्वरप्रेमाने दिवाण्या झालेल्या लेकरांना त्यांनी ‘मस्त’ ही जी उपाधी दिली ती सुफी रूपकांशी मिळती जुळती असावी ह्यात आश्चर्य नाही.


मेहेरबाबांनीं मस्तांची तुलना मद्यप्याशी केलेली आहे. मद्यप्याला मद्याची नशा असते आणि त्याच्या बेभानपणाची मात्रा मद्याच्या तीव्रतेवर अवलंबून असते. तद्वतच मस्ताच्या ईश्वरप्रेमाची मात्रा आणि त्याची बेभान अवस्था त्याच्या अंतर्गत जाणिवेच्या प्रगतीवर अवलंबून असते. पण दोघांच्या बेभान अवस्थेत एक महत्वाचा फरक आहे. मद्यप्याच्या बेभानपणाला उतारा आहे. तो कधीतरी भानावर जरूर येतो. पण मस्ताच्या नशेची मात्रा वाढतच जाते. ती कमी कधीच होत नाही. बेभानपणाची त्याची अवस्था निखळ असते, त्यात त्याला होणारा आनंद अवर्णनीय असतो. त्याला शेवटपर्यंत काहीही उतारा नसतो. सभोवतालचे जग त्याच्या दृष्टीने शून्य होते, त्याच्या अंतःकरणात होणाऱ्या आध्यात्मिक शक्तींचा उत्पात त्याच्या मनुष्यसुलभ सवयी, विकार, संस्कार आणि जाणीव पूर्णपणे नष्ट करून टाकतात. त्याचे वर्तन सुसंकृत समाजाच्या वहिवाटीच्या पूर्णपणे विपरीत होऊ लागते. त्याचे भौतिक स्वरूप कितीही घृणास्पद,गलिच्छ आणि ओंगळवाणे दिसत असले तरी त्याचे आंतरिक, आध्यात्मिक स्वरूप तेजस्वितेचे आणि ओजस्वी असते.


सामान्य माणसाचे सर्व लक्ष स्वतःच्या शरीराचे भरण-पोषण आणि सौदर्यीकरणाकडे केंद्रित असते. तरी शरीराची झीज कोणीही थांबवू शकत नाही.ह्याउलट मस्त ईश्वरप्रेमाच्या नशेमध्ये इतके बेभान असतात कि तिच्या ज्वालेचा दाह देखील त्यांना आनंददायी असतो.अनेक मस्त दिगंबरावस्थेत राहतात.रणरणते ऊन, कडाक्याची थंडी, किंवा सोसाट्याचा वारा देखील त्यांच्या नग्न शरीराला जणू स्पर्श करू शकत नाही. ना त्यांना सर्दी-पडशाचा त्रास होतो ना त्यांना कॉलरा , निमोनिया, आदी संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. बव्हंशी हे नग्न मस्त कुठल्याश्या सार्वजनिक स्वच्चतागृहाच्या जवळ आपला आशियाना मांडून वर्षानुवर्षे एकाच स्थानावर बसलेले अथवा उभे आढळतात. तर काही मस्त अन्नपाण्याची पर्वा न करता सतत भटकत असतात. संपूर्ण दुर्लक्षित असूनही त्याचे शरीर स्वतःच आपले रक्षण करण्यास समर्थ असते. कबीराच्या स्वानुभव सांगणाऱ्या एक दोह्यांचा बाबा ह्या संदर्भात उल्लेख करतात.


तन त्याजे तन राहे, तन राखे तन जाय; येही अचंबा हमने देखा, मादा कालको खाये ( आम्ही असे आश्चर्य पहिले - शरीराचे रक्षण करूनही शरीर गेले, पण शरीराचा त्याग करूनही शरीर राहिले, निष्प्राण कलेवराने मृत्युवरही मात केली)


वैश्विक कार्यात मस्तांचा सहभाग


मस्त त्यांच्या विशिष्ट अवस्थेमुळे जरी आध्यात्मिक संघटनेचा औपचारिक भाग होऊ शकत नसले तरी देखील, मस्तांच्या उन्नत अध्यात्मिक पातळी मुळे आणि त्यांच्या गुणविशेषांमुळे त्यांची आपल्या अवतारकार्यासाठी मदत होण्याच्या अनेक संभावना मेहेरबाबांना ज्ञात होत्या. त्या संभावना मेहेर बाबांना कार्यान्वित करायच्या होत्या.


मस्त जगातल्या व्यावहारिक बाजू कडे पूर्ण उदासीन असले तरी ते आपल्या संपर्कातील व्यक्तींच्या अध्यात्मिक गरजां विषयी कमालीचे संवेदनशील असतात.त्यांच्या उच्च अध्यात्मिक अवस्थेमुळे ते जवळच्या व्यक्तीचा अध्यात्मिक विकास घडवून आणू शकतात. त्याचप्रमाणे त्यांचे मन जगातल्या असंख्य लोकांशी एकाचवेळी संपर्क साधू शकते. जगातल्या मोठमोठ्या राजकारणी नेत्यांपेक्षा, अवताराला हवे असलेले जागतिक स्थित्यंतर घडवून आणण्यासाठी मस्तांचा अधिक परिणामकारक उपयोग होऊ शकतो.


जेंव्हा मेहेर बाबा मस्तांच्या मदतीसाठी त्यांच्या निकट जात तेंव्हा बाबा त्यांच्या कडून होऊ शकत असलेले वैश्विक कार्यदेखील करून घेत असत. मस्त जेंव्हा आपले मन अवताराच्या हवाली करतो तेंव्हा तो अवताराशी जवळचा प्रेमसंबंध प्रस्थापित करीत असतो. ईश्वर प्राप्तीच्या मार्गात रुळावरून घसरलेली त्याच्या जीवनाची गाडी, पुनश्च रुळावर आणून त्याला पूर्णत्वाकडे जाणाऱ्या अति जलद मार्गावर अवतार नेऊन ठेवतो. त्याचबरोबर आपल्या वैश्र्विक कार्यासाठी मेहेर बाबा मस्तांच्या हृदयातला अलगावआणि निष्कर्म वृत्ती नाहीशी करून नाविन्यपूर्ण कृतीचा चरंजीव झरा जागृत करीत असत. अवताराचे मस्त कार्य म्हणजे ‘ एका दगडात दोन पक्षी मारण्याचा’ काहीसा प्रकार होता. अशा तर्हेने सर्व मस्तांना कमी अधिक प्रमाणात आपल्या अवतारकार्यात सामील करून घेऊन त्यांना आपल्या आध्यात्मिक संगठनेत अतिरिक्त कार्यकारी अधिकाऱ्याचे स्थान बाबांनी दिले.


“मस्त हे माझ्या वैश्विक कार्याचे सर्वात चांगले माध्यम आहे”


मस्त कार्यासाठी काही निवडक लोकांचीच निवड मेहेर बाबांनी केली होती. त्यामध्ये प्रामुख्याने सर्वश्री बैदुल, काका बारिया आणि एरच जेसवाला ह्यांचा उल्लेख करावा लागेल.वेळोवेळी बाबांनी ह्या कार्यात इतर अनेक मंडळींना सहभागी केले आहे, पण अधिकांश मस्त प्रवासात ह्या तीन मंडळींची बाबांना सर्वाधिक मदत झाली. मस्तांना ओळखणे सर्वसामान्य माणसाला अशक्य असते. म्हणूनच बाबा जेंव्हा मस्तांना शोधण्यासाठी मंडळींना पाठवत तेंव्हा मस्तांचा ‘वास’ लागावा (ओळख पटावी) अशी विशेष चिकित्सक शक्ती बाबा त्यांना देत असत. बाबा आणि मंडळींचा मस्त कार्यासाठी होणार प्रवास अतिशय दगदगीचा आणि कष्टाचा होत असे. त्याची पुढे दिलेली आकडेवारी आपल्याला ह्या महान कार्याची अल्प-कल्पना देऊ शकेल. प्रथम जवळची मंडळी मस्त दर्शना साठी पुढे जात. बाबांचा “ मोठा भाऊ “ किंव्हा “साहेब” असा उल्लेख करून त्या मस्ताला संपर्का साठी तयार केले जाई.त्यासाठी मस्तांची मनधरणी करण्याचे अत्यंत जिकिरीचे काम करावे लागे. मस्तांचा लहरीपणा सांभाळून त्यांची मर्जी राखणे सर्वाधिक चिकाटीचे काम होते. कोणत्याही परिस्थितीत मस्तांना नाराज न करता त्यांच्या सर्व मागण्या, कितीही वेळ लागला आणि कष्ट पडले, तरी पूर्ण करण्याची मंडळींना सख्त ताकीद होती. बाबा स्वतः मस्तांच्या अगदी क्षुल्लक मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत असत. इतर बाबतीत वेळेबद्दल काटेकोर असणारे मेहेरबाबा मस्तासाठी अमर्याद वेळ, खर्च आणि कष्ट करायला सदैव तयार असत.मस्तांच्या सान्निध्यात प्रायः त्यांच्या देखरेखी साठी एकादा मुजावर असतो. त्याला जरी मस्ताच्या अध्यात्मिक अवस्थेची पूर्ण कल्पना नसली तरी हा वेडा नसून कोणीतरी अवलिया आहे ह्याचा अनुभव मस्ताच्या प्रदीर्घ सहवासाने त्याला प्राप्त झालेला असतो. अशा काही मोजक्या लोकांना सोडून सभोवतालचे इतर सर्व लोक मात्र त्याला एक विचत्र सवयी असलेला अर्धवट शुद्धीवर असलेला वेडा असेच समजतात.


मस्तांना भेटण्या अगोदर स्वतःची ओळख लपवण्याचे मेहेर बाबांना काय कारण होते? ह्या प्रश्नाचे उत्तर देतांना मेहेरबाबा म्हणतात “ माझे खरे स्वरूप मी काही थोड्या अधिकारी पुरुषांसमोरच प्रकट करीत असतो. सर्वसामान्य माणसांपासून माझे खरे स्वरूप लपवून ठेवणे मला अतिशय सोपे असते. पण मस्तांसारख्या आध्यात्मिक प्रगती केलेल्या व्यक्तींपासून मला स्वतःचे स्वरूप लपविण्या साठी ज्यास्त खबरदारी घ्यावी लागते. मी जेंव्हा मस्तकार्यासाठी त्यांच्या संपर्कात जातो, तेंव्हा त्यांच्या आनंदमय अवस्थेतून बाहेर काढूनच मला त्यांच्यी मदत करता येते. जर त्या मस्ताला संपर्काच्या आधीच माझ्या सत्य स्वरूपाची ओळख पटली तर ते मला टाळायचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत त्यांच्या मनाविरुद्ध मी त्यांच्याबरोबर कार्य करू शकत नाही. संपर्कानंतर आणि प्रेमसंबंध प्रस्थापित झाल्यावर ते माझे सत्यस्वरूप जाणून माझ्याबरोबर चांगले सहकार्य करू शकतात, आणि त्यांना मदत करणे आणि त्यांना माझ्या वैश्विक कार्यात सहभागी करून घेणे मला सुविधाजनक होते.”


मेहेर बाबांनी सांगितले आहे कि ‘मस्त हे माझ्या वैश्विक कार्याचे सर्वात चांगले माध्यम आहे.’ ह्या माध्यमाचा पुरेपूर उपयोग मेहेर बाबांनी आपल्या अवतारकार्यात करून घेतला. प्रामुख्याने केवळ ह्या कार्यासाठी आपल्या जीवनाची ८-९ वर्षे खर्च केली. त्यासाठी केलेल्या प्रवासाच्या आकडेवारी कडे केवळ एक नजर टाकली तरीही आपले मन विस्मयचकित होते.


मस्तकार्यासाठी केलेला प्रवास, त्याची भौगोलिक व्याप्ती आणि आकडेवारी


जगातील बहुतांश मस्त हे भारतीय उपमहाखंडात आहेत. काही थोडे ( हाताच्या बोटांवर मोजण्या इतके) मस्त इजिप्त, अरेबिया, चीन, तिबेट ह्या देशात आहेत. ह्याचे कारण असे की अध्यात्मिक दृष्टीने भारत हा एक महत्वाचा देश आहे आणि विश्वउत्पत्ती ज्या बिंदूपासून सुरु झाली (ओम बिंदू ) त्यापासून भारत देश सर्वात जवळ आहे.


सुरुवातीला दिलेल्या माहिती अनुसार मस्त कार्याचा कालावधी जगातल्या प्रचंड उलथा-पुलथीचा कालखंड होता. १९३९ ते १९४८ ह्या दरम्यान बाबांनी काढलेल्या मस्तकार्याच्या मोहिमेची व्याप्ती खालील आकडेवारीवरून लक्षात येईल. ह्या आठ-नऊ वर्षात बाबांनी भारतीय उपमहाखंडात (आताचा भारत, पाकिस्तान , श्रीलंका ह्या भागात ) १ लाख १० हजार किलोमीटर्स चा प्रवास केला आणि सुमारे ९५० मस्त संपर्क केले. ह्याच कालावधीत त्यांनी ८५०० साधू आणि १११५० गरीब लोकांशी सुद्धा संपर्क साधून त्यांना मदत केली. हा प्रवास बाबा आणि त्यांच्या निवडक मंडळींनी पायी, बैलगाडी, घोडागाडी, लहान मोठी बोट, मोटर कार, बस, रेल्वे अशा मिळेल त्या सर्व वाहतुकीच्या माध्यमातून केला. ते दिवस दुसऱ्या महायुद्धाचे, स्वातंत्र्याच्या चळवळीचे, फाळणीच्या दंग्यांचे होते. प्रवास अतिशय कष्टकर होता. मस्तांचा विशीष्ठ ठावठिकाणा नसतो.ह्या विशाल परिसराच्या ३०० हुन अधिक लहान मोठ्या गाव/खेड्यांमध्ये थांबून बाबा सभोवतालच्या परिसरात मस्त संपर्काला जात असत. नकाशात बघितल्यावर लक्षात येते कि मस्तांना आपल्या प्रेमबंधनात अडकवण्यासाठी बाबांनी टाकलेले जाळे इतके रुंद होते आणि त्याची वीण इतकी बारीक होती की त्या जाळ्यामध्ये संपूर्ण भारतीय उपमहाखंड पिंजून काढला. मस्त-भेटीची अनेक ठिकाणे रेल्वे अथवा रस्त्यांपासून आणि मनुष्य वस्ती पासून दूर , दरी-खोऱ्यात, वाळवंटात, ओसाड माळरानात होती. तिथे जाण्याची सोय उपलब्ध नव्हती. वेळप्रसंगी पायी जाऊन, छोट्या होडीने मान्सून मधील पावसात भरलेल्या नदी नाल्यांमधून, कधी वाळवंटात रणरणत्या उन्हातून, तर कधी कडाक्याच्या थंडीत दर्या-पर्वतांमधून प्रवास करीत बाबा मस्तांची भेट घेत. अशा तर्हेने ह्या ९ वर्षात मेहेरबाबांनी लीलया आपल्या प्रेमाने संपूर्ण मस्त-विश्व पादाक्रांत केले.


मस्तभेटीचा हृदयस्पर्शी वृत्तांत आणि सात मस्ताश्रम


बाबांच्या मस्त संपर्काची झलक पाहण्यासाठी एका मस्ताच्या प्रथम भेटीचा वृत्तांत आता आपण बघू . १९३९ सालच्या फेब्रुवारी महिन्यात बाबा अजमेरला होते. बाबांनी सांगितले कि ईश्वराशी एकरूप झालेला एक मजझुब मस्त ( मस्तांचा एक प्रकार ) येथे जवळच आहे. बाबांच्या सुचने प्रमाणे श्री काका बारिया आणि आदी इराणी ख्वाजा चिस्तींच्या दर्ग्या जवळच्या दोन खोल्यांच्या एका झोपडी वजा घरात त्याला घ्यायला गेले. त्या मस्ताचे नाव होते चाचा. त्याची राहायची जागा अतिशय गलिच्छ होती. त्याला चहाचं व्यसन होते. सतत, म्हणजे दर ५ मिनिटांनी त्याला चहाचं कप लागत असे, आणि दिवसाकाठी अंदाजे १०० कप चहा तो फस्त करीत असे! सतत चा चा असे म्हणत तो चहाची मागणी करीत असे, म्हणून त्याचे नाव पडले ‘चाचा’ ! काका आणि आदी ह्या दोघांनाही त्याने चहाचं आग्रह केला. चहा पिऊन दोघांचे पोट भरून गेले पण चचा त्यांच्या सोबत यायला तयार झाला नाही. शेवटी ते दोघे चाचा ला न घेताच माघारी गेले. बाबांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा दोघांना चाचा कडे पाठवले. पुन्हा तोच प्रकार घडला.असे ओळीने अनेक दिवस झाले. दोघे कंटाळून गेले. अखेरीस बाबांनी चाचाला आणायचा आग्रह सोडला. पण पुन्हा काही दिवसांनी बाबांना चाचाची आठवण झाली. आदी इराणी जायला तयार होत त्यांचा नव्हते. पण बाबांच्या आग्रहाखातर ते आणि काका बारिया पुन्हा प्रयत्न करायला तयार झाले. त्यादिवशी आदी इराणींनी धीर करून चाचा ला हात धरून विनंती केली, ‘ आज आमच्याबरोबर चला, माझा मोठा भाऊ तुमची वाट कित्येक दिवस बघत आहे.’ आश्चर्य म्हणजे चाचा तयार झाला! त्या ठिकाणी चाचा तब्बल ३० वर्षे एकाच जागेवर बसून होता. इतक्या वर्षात त्याने ती जागा एकदाही सोडली नव्हती! त्याची देखभाल करणारा मुजावर देखील चकित झाला. मुजावरची कशीबशी समजूत घालून दोघांनी चाचाला चालतं करायला मदत केली कारण ३० वर्षांनी प्रथमच चालतांना चाचा अडखळत होता. कसेबसे त्याला टांग्यावर बसवण्यात दोघांना यश आले. इकडे बाबा वाटच पाहत होते. त्यांच्या सुचने प्रमाणे मंडळींनी गरम पाणी आणि स्नानाची सर्व व्यवस्था तयारच ठेवली होती. त्याची अवस्था बघून बाबा म्हणाले ‘ह्याने ३० वर्ष स्नान केले नाही!’ त्याची कसर काढण्यासाठी बाबांनी बादल्या मागून बादल्या भरून गरम पाणी त्याच्या अंगावर टाकण्यास सुरवात केली. त्याच्या कपड्याच्या चिंध्या चहाच्या डागांनी मलीन होऊन त्याच्या शरीरावर चिकटल्या होत्या. बाबांनी त्याच्या कपड्यांच्या चिंध्या कात्रीने कापून अतिशय हळुवारपणे शरीरापासून अलग केल्या. त्याची त्वचा कपड्यांसोबत निघायचा धोका होता! तीच गोष्ट डोक्यावरच्या टोपी आणि फेट्याची. इथेही चहाचे डाग होते. त्याला चहा आपल्या डोक्यावर टाकायची सवय होती. टोपी टाळूला चिकटली होती. अतिशय प्रेमानी आणि चिकाटीने बाबांनी त्याची चिकटलेली टोपी काढली. पांढरी जखमी झालेली त्वचा नाजूक होती. कित्येक तास त्याला स्नान घालण्यात खर्च झाले. हे सर्व झाल्यावर बाबांनी त्याच्या अंगावर नवीन पांढरी कफनी घातली. आपल्या आवडत्या लेकराला स्नान घातल्याचा आनंद बाबांच्या चेहऱ्यावर झळकत होता.


स्वच्छ तयार झाल्यावर चाचाने लगेच चहाची फर्माईश केली आणि आपल्या शरीराच्या आत आणि बाहेर यथेच्य चहा ओतायला सुरवात केली. मस्तांनी असे कितीही प्रमाद केले तरी त्यांना काहीही सांगायची मंडळींना परवानगी नव्हती. बाबांची सख्त ताकीद होती, कोणत्याही स्थितीत त्यांचा रागरंग सांभाळायचा. मर्जी बघून, गोडीगुलाबीने त्यांच्याकडून हवे ते करून घ्यायचे.. मंडळींना त्रास जरूर व्हायचा, सहनशीलता पणाला लागायची, पण अखेरीस मस्तांची निरागसता आणि मेहेरबाबांचे प्रेमाचे प्रात्यक्षिक आपला प्रभाव टाकायचे आणि मंडळी देखील मस्तांवर प्रेम करू लागायची. मेहेर बाबांनी चाचाला विचारले, ‘ काही दिवस इथेच राहशील का?’ चाचा चे उत्तर आले,’ तुम्ही मदत केली तर राहीन’ त्यानंतर बाबांनी स्वतःच्या हातांनी त्याला जेवण भरवले. आणि स्वतः त्याला त्याच्या खोलीवर घेऊन गेले. ह्या प्रथम संपर्का नंतर पुढील अनेक वर्षे बाबा अजमेरला चाचाच्या भेटीसाठी येत राहिले. बाबा त्यांच्या वैश्विक कार्यासाठी त्याच्या बरोबर एंकान्तवासात राहत असत. अशा वेळेस मंडळींपैकी कोणालाच त्या स्थानाच्या जवळ जायची परवानगी नसायची. एखादवेळेस कोणी चुकीने गेलाच तर त्याला प्रकाशाचा असहनीय झोत दिसणे, विजेचा झटका लागणे असे अनेक जीवावर बेतणारे अनुभव आलेले आहेत. हा एकांतवास फक्त चाचा साठी नव्हे तर सर्वच मस्त संपर्कांचा अविभाज्य भाग होता. मेहेरबाबा एकांतवासात मस्तांसोबत जे कार्य करीत ते नेमके काय होते त्याचा विस्ताराने उल्लेख बाबांनी कधी केला नाही. पण त्या कार्याचा भाग म्हणून जी ऊर्जा उत्पन्न होत असे तिचा अनुभव सर्वसाधारण माणसाला धोकादायक होता हे निश्चित. बाबांनी शेकडो मस्तांबरोबर कार्य केले असले तरी त्यात ५ मस्त बाबांचे आवडते होते, ज्यांच्याबरोबर बाबांनी अनेक वेळा सम्पर्क केला, त्यांना प्रधीर्ग काळापर्यंत आपल्यासोबत ठेऊन घेतले. चाचा हा त्या ५ आवडत्यां पैकी एक होता. एकदा तर बाबा त्याला साताऱ्याला आपल्या मस्ताश्रमात घेऊन आले होते. दुसऱ्या काही मस्तांना त्यांच्या वैश्विक कार्यासाठी बाबा फ्रान्स आणि श्रीलंका अशा दूरदेषात देखील घेऊन गेले होते.


बहुतांश मस्तांचा संपर्क बाबांनी त्यांच्या राहत्या ठिकाणी जाऊन केला. पण काही वेळा ज्या भागातील मस्तांचा संपर्क साधायचा असेल त्या भागात बाबांनी मस्ताश्रम स्थापन केले आणि अनेक मस्तांना स्वतःच्या देखरेखीत काही कालावधी साठी ते ठेऊन घेत असत. अशे ७ मस्ताश्रम काही काळासाठी बाबानी स्थापित केले होते त्या गावांची नावे होती - अजमेर (१९३९), जबलपूर (१९३९), बंगलोर (१९४०), मेहेराबाद (१९४०), रांची (१९४०), महाबळेश्वर( (१९४६) आणि सातारा( १९४७).मस्ताश्रमात तर बाबांबरोबर अनेक मस्त एकाच वेळी राहत असत. मस्ताश्रमातील मस्तांची सर्व सेवा, त्यांचे स्नान करणे, त्यांना दाढी करून देणे, त्यांचे संडास साफ करणे अशी अनेक कामे बाबा स्वतः आनंदाने करत. मस्ताश्रमाच्या वातावरणाची आपण कल्पनाच फक्त करू शकतो.


मस्तकार्याचे फलित


१९३८ -१९३९ च्या सुमारास जगभर राजकीय वातावरण तापले होते. यूरोप मध्ये वंशवादाचा आणि साम्राज्यवादाचा आणि सीमित राष्ट्रवादाचा अतिरेक झाला होता. भारतात जातीयवाद पराकोटीला पोहचला होता. अमेरिका, रशिया आणि जपान ह्या देशांमध्येही वंशवाद आणि साम्राज्यवाद पसरू लागले होते. वातावरण तापले असतांना भडका उडण्यासाठी एका ठिणगीची तेव्हढी गरज असते. ह्याकाळात मेहेरबाबांनी महायुद्ध अनिवार्य आहे अशा अर्थाची अनेक विधाने केली होती. जुन्या, जीर्ण आणि भ्रष्ट झालेल्या व्यवस्थेचा सुनियोजित आणि सुनियंत्रित विनाश व्हायची वेळ आली होती. त्याशिवाय नवीन, न्याय्य आणि सर्वसमावेशक अशा पर्यायी व्यवस्थेचा उदय होणे शक्य नव्हते. अवताराचे कार्य प्रातिनिधिक आणि प्रतीकात्मक असते. दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी ज्या काळात पडली नेमक्या त्याच कालखंडात (१९३६ ते १९४०) बाबांनी मनोरुग्णांसाठी आणि मस्तांसाठी पहिला आश्रम काढला, त्यांच्या कडून नाटकासाठी अभिनय करून घेतला. त्यानंतरच्या काळातील मस्तकार्या दरम्यान (१९४० -१९४८ ) भारतामध्ये राहून अवतार मेहेर बाबा त्यांच्या पडद्याआडच्या आध्यात्मिक संघटनेच्या माध्यमातून दुसऱ्या महायुद्धाचे आणि युद्धानंतर जगात झालेल्या रचनात्मक बदलांचे संचालन करीत होते असे दिसते. युद्धाच्या काळातील अनेक घटना देखील बाबांनी आपल्या मस्त कार्याशी जोडून सांगितल्या आहेत.मस्तांच्या माध्यमातून विश्वकार्याला गती आणि निश्चित दिशा मिळाली. मित्र राष्ट्रांचा विजय आणि ऍक्सिस ताकदींचा पराभव सुनिश्चित झाला. ह्या सुमारास मोहम्मद नावाच्या मस्ताला तर त्याच्या सर्व लहरी सांभाळून बाबा फ्रान्सला घेऊन गेले होते, कारण मोहम्मदचा आंतरिक संबंध फ्रान्स देशाशी होता.युद्धानंतर क्रमाक्रमाने साम्राज्यवादाचा अंत झाला. वंशवाद अस्तंगत होऊ लागला. भारतात जातीयवादाचा भडका उडाला, फाळणी झाली आणि हळूहळू जातीयवादाचा भस्मासुरही अस्तंगत होऊ लागला. भारतासोबतच इतर अनेक राष्ट्रे स्वतंत्र झाली, लोकशाही राजवट जगभर पसरू लागली.मध्यंतरी शीतयुद्धाचा कालखंड येऊन गेला. नंतर रशियन राष्ट्रसंघाची शकले होऊन शीतयुद्धाचा देखील अंत झाला.जागतिक एकीकरणाचा प्रक्रिया दोन पावले पुढे आणि एक पाऊल मागे अशी सुरु आहे. ह्या सर्व सकारात्मक बदलांना मिळालेल्या गतीचे मूळ कारण १९४० च्या दशकात बाबांनी अविश्रांत मेहेनतीने आणि मस्तांच्या सहकार्याने केलेले वैश्विक कार्य हेच आहे. हे सर्व दूरगामी बदल अकस्मात झाले नाहीत.काही तर अजूनही आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत. त्यातले काही बदल घडून यायला ५० ते १०० वर्षांचा कालखंड जरूर लागेल.


महायुद्धाच्या अज्ञात सरदारांना मानाचा सलाम!

समाजाने वेडे ठरवलेल्या मस्तांच्या मदतीने हे महान कार्य मेहेर बाबानी यशस्वी केले.मस्तांचे वैश्विक कार्यातील योगदान बघता त्यांना मेहेरबाबांनी पुकारलेल्या आध्यात्मिक युद्धाचे अज्ञात सरदार आणि त्यानंतरच्या रचनात्मक क्रांतीचे अज्ञात शिलेदार म्हणणे योग्य होईल! ह्या लेखाद्वारे त्याची तोंडओळख करून द्यायचा हा एक प्रयत्न! अर्थातच सर्वच घटना आणि संदर्भ ह्यांचा उल्लेख इथे शक्य नव्हता. त्यासाठी सर्व बाबाप्रेमींनी ‘वेफेअरर्स’ आणि ‘लॉर्ड मेहेर’ हे आणि इतर ग्रंथ वाचून ह्या अज्ञात सरदारांना सलाम केला पाहिजे.

12 views0 comments

Recent Posts

See All

उत्पत्तीच्या कथानकावरील उपासनी महाराज आणि मेहेर बाबांचे भाष्य

आज रमदान ईद आहे (ईद-अल-फत्र) आणि मुस्लिम लोक महिन्याभराचे रमदान रोजे आजच्या उत्सवाने संपन्न करतात. हे रोजे आणि हा उत्सव मोहम्मद पैगंबरांनी स्वतः सुरु केलेली परंपरा आहे आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे क

Comments


bottom of page