top of page

मेहेर बाबांच्या दोन भाषा आणि विज्ञानाची अमूर्त गणिती भाषा

(इथे दिलेले संपूर्ण विश्लेषण मूळ पुस्तकाचा भाग नाही)

मेहेरबाबांना त्यांच्या पुस्तकांमध्ये, सृष्टिनिर्मितीचे आणि उत्क्रांती- अंतर-क्रांती ह्यांच्या अमूर्त संकल्पनांचे स्पष्टीकरण करताना , अनेकदा आपल्या स्वतःच्या भाषेचा उपयोग करावा लागला आहे. ह्या भाषेत कधी-कधी गूढ रूपकांचा उपयोग करावा लागला आहे . विविध धर्मप्रणालींमध्ये देखील गूढ रूपकात्मक भाषेचा प्रयोग दिसून येतो. काळाचा ओघात ह्या रूपकांचा संदर्भ लुप्त होतो किंवा त्याचे विकृतीकरण तरी होते किंवा त्याचा विपर्यास तरी होतो. म्हणून मेहेरबाबांनी आपल्या ग्रंथात , शक्य तेंव्हा ह्या रूपकांचा योग्य अर्थ सांगितला आहे. पण काही वेळा ह्या विषयातले गूढ भाग रूपकांमध्येही सांगता येत नाही. कारण ते अमूर्त असतात. शब्दांच्या पलीकडले असतात. त्या वेळेस आपल्याला मेहेरबाबांवरील श्रद्धेचा सहारा घ्यावा लागतो.


आधुनिक विज्ञान ज्या प्रमाणात स्थूल जगताच्या पलीकडल्या तथ्यात जाऊ लागते , त्या प्रमाणात विज्ञानाला देखील अमूर्त , शब्दांपलीकडल्या भाषेची गरज वाटू लागते आहे. विज्ञानाला व्यक्ती-विशिष्ठ श्रद्धेच्या माध्यमाचे वावडे असल्यामुळे विज्ञानाला गणितासारख्या अमूर्त भाषेचा आधार घ्यावा लागत आहे. अमूर्त गणिती कल्पनांना वास्तुनिष्ठतेच्या नियमांमध्ये सीमित करून विज्ञानाला त्यांचा उपयोग करावा लागतो. ह्या हाताळणी मध्ये मतितार्थाची हानी होऊ शकते , किंवा मतितार्थ लुप्त होऊ शकतो. अनेक आधुनिक संकल्पना ह्या गणितीय अमूर्त संकल्पनांमध्ये अर्हविहीन झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.


अध्यात्म ज्ञानात उपयोग करावी लागणारी गूढ भाषा आणि विज्ञानाच्या गणितीय संकल्पना यांचा इथे विचार करू :


सूक्ष्म जगताच्या तथ्यांविषयी पारंपरिक भाषांमध्ये संवाद साधताना येणाऱ्या मर्यादा


धर्मग्रंथांमध्ये जेंव्हा आंतरिक तथ्यांवर ( सूक्ष्म जगातील ) चर्चा होते, तेंव्हा संवादाचे माध्यम म्हणून ज्या पारंपरिक भाषांचा वापर होतो, त्यात दोन प्रकारच्या मर्यादा येतात. पहिली मर्यादा ह्या विषयाच्या अंगभूत गहनतेची आहे : सूक्ष्म जगतातील विषय माणसाच्या मनबुद्धीच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडले असतात , म्हणून अध्यात्मिक अधिकारी पुरुषांनी यासाठी नेहेमीच रूपकात्मक कथानके, बोधकथा आणि दृष्टान्तांचा उपयोग केला आहे. येशू ख्रिस्ताच्या बायबल मधील बोधकथा असो, किंवा जुन्या ऋषीमुनींनी पुराणात सांगितलेली रूपकात्मक कथानके असो , ह्या सर्वांचा उपयोग माणसाच्या आकलनशक्तीच्या मर्यादांचा विचार करूनच केला गेला आहे. पण ह्यामध्ये गहन आशयाची काही प्रमाणात हानी होते.


आपल्या संदेशांमध्ये मेहेरबाबा मुख्यत्वे दोन भाषांचा वापर करतात असे त्यांनीं स्पष्ट केले आहे. एक भाषा खास त्यांची स्वतःची भाषा असते, जी सामान्य माणसाला कळू शकत नाही. दुसरी, ते आपली सामान्य माणसाची भाषा वापरतात, जसे इंग्रजी , हिंदी, मराठी , गुजराती इत्यादी . पण आपली भाषा सूक्ष्म जगतातील तथ्यांच्या बाबतीत अपुरी पडते. त्यांची स्वतःची खास भाषा म्हणजे त्यांचे मौन आहे , त्या भाषेचा प्रभाव आणि अर्थवाहकता अमर्यादित स्वरूपाची असते, आणि जरी ती आपल्याला कळू शकली नाही तरी कथित घटना होऊन गेल्यावर तिचा प्रभाव आणि अर्थ आपल्याला कळू शकतो. मेहेरबाबांची मौन-वाणी कल्याणप्रद आहे. मेहेरबाबांनी आपले संदेश आणि प्रवचने दिली तेंव्हा त्यांनी आपल्या मौनाच्या माध्यमिक अवस्थेचा उपयोग केला आहे ( जेंव्हा ते वर्णमाला फलकाचा आणि हाताच्या हावभावांचा वापर मौनासोबत करीत होते. ) - आणि या भाषेला आपण मिश्र भाषा म्हणू शकतो.


वेदांता मध्ये चार भाषांचा उल्लेख आला आहे. त्या चार भाषा आहेत - वैखरी, मध्यमा, पश्यन्ति , आणि परा . ह्यातील वैखरी म्हणजे स्थूल जाणीव असणाऱ्या सामान्य माणसांची भाषा ( जसे मराठी, इंग्रजी हिंदी इत्यादी ) , मध्यमा ही सूक्ष्म जगताची भाषा होय ( तिला मध्यमा म्हणतात कारण ती स्थूल आणि मनो जगता मधला दुआ बनते ) , पश्यन्ति म्हणजे मनो-जगताची भाषा जी अंतर्दृष्टीवर अवलंबून असते आणि ती पाहण्याशी ( नूर ) संबंधित असते , आणि परा म्हणजे परमेश्वराशी एकरूप झालेल्यांची भाषा ( जिचा उल्लेख मेहेर बाबा आपली भाषा म्हणून करतात , त्यांच्या महामौनाचीं भाषा. ) . मेहेरबाबांनी संमिश्र भाषांचाही उपयोग केला होता - जेंव्हा ते वर्णमाला फलक वापरत होते तेंव्हा ( मध्यमा ) आणि जेंव्हा ते केवळ आपल्या देहबोलीच्या साह्याने आणि बोटांच्या हालचालींनी आपला संदेश देत असत ( पशान्ति ) तेंव्हा.


जुन्या धर्मग्रंथात आणि पुराणांमध्ये वापरलेल्या भाषेची (वैखरी ) दुसरी मर्यादा म्हणजे काळाच्या ओघात तिचा होणार विपर्यास, मोडतोड आणि विकृती. विपर्यास आणि विकृती अजाणता होऊ शकते अथवा जाणूनबुजून, स्वार्थी हेतूने देखील होऊ शकते. स्वार्थी हेतूने केलेला अर्थाचा अनर्थ ज्यास्त धोकादायक ठरू शकतो. सर्वच जुन्या धर्मग्रंथांमध्ये कमी-ज्यास्त प्रमाणात ही विकृती आढळून येते. म्हणूनच नवीन अवताराला ह्या संबंधीच्या तथ्यांची पुन्हा एकदा नव्याने व्याख्या करावी लागते, तत्कालीन भाषेत स्पष्टीकरणे द्यावी लागतात.


मेहेरबाबांनी दिलेल्या अध्यात्मिक विषयांवरील स्पष्टीकरणामागचा हेतू


मेहेरबाबांनी आपल्या “ प्रवचना ” द्वारे तसेच “ ईश्वर वाणी ” आणि “ काहीच नाही आणि सर्व काही ” ह्या सारख्या पुस्तकांच्या माध्यमातून अनेक आध्यात्मिक रहस्यांवर प्रकाश टाकला आहे, जे आजवर मानवासाठी अज्ञात होते. नव-मानवाला सुलभतेने हा विषय समजावा ह्याकरीता त्यांनी आपल्या सर्व साहित्यात समकालीन वैज्ञानिक परिभाषेचा उपयोग केला आहे. ही मिश्र परिभाषा आहे, ह्या परिभाषेत त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या खास मौनावाणीचाही प्रयोग केला आहे. ह्या मौन वाणीच्या आकलनासाठी आपल्या हृदयात अवताराविषयी प्रेम, आज्ञाधारकपणा आणि समर्पण असण्याची आवश्यकता आहे. मेहेरबाबा साहित्यातून मानवाशी संवाद साधतात तेंव्हा ते एका पित्याची भूमिका घेतात, आणि लहान मुलांना शिकवावे तसे आपल्याला , शक्य तोवर आपल्या भाषेत शिकवतात. गहन मुद्दे शिकवताना ते आपल्या मौन वाणीचा प्रयोग करतात. ही त्यांची वर्णमाला फलकाची, हावभावांची, खुणांची मिश्र ( मध्यमा आणि पश्यन्ति ) भाषा आहे. डॉन स्टीवन्स ना एकदा त्यांनी सांगितले होते की ह्या पुस्तकांमध्ये आणि शब्दांमध्ये त्यांच्या मौनावाणीचा , अणू स्फोटातून हुन अधिक शक्तिशाली असा आशय लपलेला आहे , जो भविष्यात मानवी हृदयाचे आमूलाग्र परिवर्तन घडवून आणेल.


जगातील सर्व खंडांमध्ये विखुरलेल्या निरनिराळ्या धर्म, जाती, आणि पंथांच्या परंपरांमध्ये आणि पारंपरिक बोधकथांमध्ये सत्याचा अंश दडलेला आहे. ह्या लुप्त होत असलेल्या सत्याला, विविध परंपरांमधून एकत्र आणून, त्यांना एका माळेत गुंफून जतन करण्याचा हेतू मेहेरबाबांच्या साहित्यात आहे. मेहेरबाबांच्या “ ईश्वरवाणी ” ह्या ग्रंथात तीन निराळ्या संज्ञावली एकत्र आणल्या आहेत. त्या आहेत - सुफी, वेदांती , आणि ख्रिस्ती गूढवादी . जगातील हिंदू, इस्लाम आणि ख्रिस्ती या तीन मोठ्या धर्मांमधील संकल्पना आणि संज्ञावली ह्यांचा वापर करून आणि त्यांच्यातील परस्पर साम्य विशद करून , तीनही धर्ममतांना मेहेरबाबांनी ईश्वरवाणीतील “ सृष्टीच्या उत्पत्तीच्या कथानकात ” एकत्र आणले आहे .


ईश्वरवाणीमध्ये विविध धर्ममतांचा समन्वय झाला आहे, तर “ काहीच नाही आणि सर्व काही ” मघ्ये विविध संस्कृती ( हिंदू , सुफी, ग्रीक , रोमन इत्यादी ) , त्यांची सांप्रदायिक पुराणे आणि कथानके, विविध लोककथा ह्यांना एकत्र आणून त्यांच्यातील गाभा कसा एक आहे ह्याचा समन्वय आहे. हे करीत असताना मेहेरबाबांनी ह्या सर्व मिथकांमध्ये काही नवीन कथानकांची भर घातली आहे, जी या समन्वयाचा अक्ष बनून इतर परंपरांना आणि मिथकांना एकत्र आणण्यात हातभार लावतात. ही नवीन कथानके आहेत - “ खोडकर कोंबडीचे पिलू ” , “ राजा सर्वस्व , राजा सर्वज्ञ आणि राणी वैकुंठ ” इत्यादी. ज्या पारंपरिक मिथकांचा समन्वय घातला आहे त्यात प्रामुख्याने येतात “ आदम आणि इव्ह यांची कथा ”, “ शिवपुराणातील कुबेर आणि शिव यांचा संबंध ”, “ शिवलिलामृतामधील उमा-महेश्वर , शिव-पर्वती , दक्ष प्रजापती, श्री गणेश यांची कथानके ” , ग्रीक आणि रोमन परंपरांमधील “ ज्युपिटर , नोहा ” इत्यादी . ही सर्व कथानके सृष्टीच्या उत्पत्तीच्या निरनिराळ्या पैलूंवर प्रकाश टाकतात .


विज्ञान आणि त्याची अमूर्त गणिती भाषा : विचार आणि तर्क यावर आधारित.


गणिताला विज्ञानाची भाषा समजतात. आजच्या अवतार युगात समकालीन विज्ञान आणि त्याची अमूर्त गणिती भाषा या दोहोंनी प्रगतीची अभूतपूर्व मजल गाठली आहे. ह्या दोन्ही विद्याशाखांनी सूक्ष्म सृष्टीच्या गुप्त तथ्यांचा वेध घेण्यास नुकतीच सुरुवात केली आहे. मेहेरबाबांनी सांगितले आहे की इतकी प्रगती करून सुद्धा विज्ञानाने सूक्ष्म जगताच्या सर्वात बाहेरच्या स्तरापर्यंतच मजल मारली आहे. अद्याप त्या स्तराच्या आत शिरकाव करण्यास त्याला यश आलेले नाही.


विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकात विज्ञानापुढे एका कठोर आव्हान होते - ते होते दोन निर्विवाद वाटणाऱ्या पर्यायांमधील एकाचीच निवड करायचे.


एक पर्याय होता : पदार्थ विज्ञानाचे नियम वैश्वीक पातळीवर अबाधित राहतात आणि ते कोणत्याही एका दृष्टिकोनाचे ( संदर्भ चौकटीचे ) बांधील नाहीत आणि प्रकाश वेग देखील कोणत्याही प्रकाश प्रक्षेपणाच्या प्रक्रियेच्या आणि संदर्भ चौकटीच्या निरपेक्ष आहे ,


तर दुसरा पर्याय होता : अवकाश आणि काळ हे कोणत्याही संदर्भ चौकटीशी निरपेक्ष आहेत आणि एकमेकांपासून स्वतंत्र आहेत.


मायकेलसन आणि मोर्ले यांच्या निरनिराळ्या दिशांचा प्रकाशाच्या वेगावर काय परिणाम होतो ह्या संदर्भातील प्रयोगानंतर , दोन्ही पर्याय एकाच वेळी ग्राह्य धरता येणे शक्य नव्हते. आइनस्टाइनने विज्ञानाच्या नियमांच्या आणि प्रकाशाच्या वेगाच्या सार्वभौमत्वाचा आणि संदर्भ चौकटीच्या निरपेक्षतेचा ( identical in all frames of reference ) पर्याय निवडला आणि त्याच्या सापेक्षता सिद्धान्तामध्ये त्याने अवकाश आणि काळ हे संदर्भ चौकटीच्या सापेक्ष ( relative to frame of reference ) आहेत असे प्रतिपादन केले. ह्या सिद्धांताच्या विकासामध्ये गणिताच्या अमूर्त ( Abstract ) संकल्पनांचा मोठा वाटा होता. २००० वर्षांपूर्वी यूक्लीडने विकसित केलेल्या भूमितीशी फारकत घेऊन चार मितीय ( four dimensional ) भूमितीचा आणि रीमनने विकसित केलेल्या वक्रीय भूमितीचा आधार या सापेक्षता सिद्धांतात घेतला गेला. चार मितीय भूमितीत काळाच्या अक्षाचा संबंध इतर तीन अवकाश अक्षांशी लावताना काल्पनिक संख्येचा आधार घेतला गेला ( ऋणात्मक संख्येचे वर्गमूळ - ज्याला वास्तविक मूल्य असू शकत नाही ) अशा रीतीने अवकाश आणि काळ एकमेकांशी काल्पनिक संख्येच्या माध्यमातून एकत्र आले. ह्या गणितीय युक्तीमुळेच चार-मितीय भूमीतीला “समजून” घेता येते. तसेच वक्र भूमितीदेखील अमूर्त गणितीय संकल्पनेच्या आधारावरच “समजून” घेता येऊ शकते. “समजूत” शब्द अवतारणामध्ये टाकण्याचे कारण म्हणजे ह्या सर्व संकल्पना आपल्या सारख्या त्रीमितीय आणि सपाट यूक्लिडीयन भूमितीच्या जगात वावरणाऱ्या भौतिक जगातल्या सामान्य माणसाला करणे शक्य नाही, त्यासाठी आपल्याला अमूर्त गणिती भाषेचाच आधार घ्यावा लागतो . रिमन ने विकसित केलेली वक्र भूमिती ही देखील आपल्या संकल्पनेत बसू शकत नाही. त्यासाठी आपल्याला विकलन भूमिती ( Differential Geometry ) आणि टेन्सर ( Tensor ) या अमूर्त गणितीय संकल्पनांचा आधार घ्यावा लागतो.


गणिताचे आंतरिक तथ्यांशी नाते ?


यूक्लीडची त्रिमीतीय भूमिती आणि इतर अनेक प्रकारची बहुमितीय आणि वक्र भूमिती ( many dimensional and curved geometry ) ; विकलन आणि संकलन ( Differential and Integral ) , हॅमिलटोनिअन आणि लाग्रांजियन , संमिश्र संख्या ( Complex Numbers ), मॅट्रीसेस , टेन्सर्स , सममिती समूह ( Symmetry Groups ) , ह्या सर्व अमूर्त गणितीय संकल्पना आहेत. या संकल्पनांचा उदय गणितींच्या मनामध्ये त्यांच्या कल्पनेने आणि प्रेरणेने झाला. त्या संकल्पना विकसित करण्यात तर्कशास्त्राची गृहीते, नियम आणि प्रमेयांच्या आधार केवळ घेतला गेला होता, आणि त्याशिवाय इतर इतर कोणत्याच भौतिक वस्तू किंवा घटनांचा आधार घेतला गेला नव्हता . या संकल्पनांचा उपयोग मात्र, त्या विकसित झाल्यानंतर कित्येक दशके , आणि काही वेळा कित्येक शतके उलटून गेल्यावर , भौतिक शास्त्रांमध्ये ( पदार्थ विज्ञान शास्त , रसायन शास्त, जीवशास्त्र , संगणक शास्त्र इत्यादी ) घेतला गेला. गणिताच्या अमूर्त भाषेच्या आधारावर ह्या भौतिक शास्त्रांची प्रगती झाली, आणि भौतिक शास्त्रांचे कायदे-नियम सर्वच नवीन परीक्षणे आणि प्रयोग यांच्या कसोटीवर खरे उतरले. वस्तू आणि घटनांच्या इंद्रियगोचर भौतिक जगातील नियम-कायद्यांचा पाया अशा रीतीने अमूर्त आणि स्वयं प्रेरणेने निर्माण केलेल्या आणि शुद्ध मानसिक मूळ असलेल्या गणिताच्या संकल्पनांवर रचला गेला आहे. अविभाज्यांचे गतिशास्त्र ( Quantum Mechanics ) असो किंवा सापेक्षतावाद ( Relativity Theory ) असो , पदार्थ विज्ञानाचे हे सिद्धांत गणिताच्या भक्कम पायावर उभे आहेत. हे सत्य गणिताचा सूक्ष्म जगताशी असलेल्या नातेसंबंधांकडे दिशा निर्देश करते.


विज्ञानाच्या दृष्टिकोनातून भौतिक जगात आणि नियमांमध्ये अनिश्चितता अंतर्निहित आहे.


१९२० च्या दशकामध्ये अणू-रेणू आणि त्यांचे घटक असलेले अणू-कण यांचे नियमन करणाऱ्या “ किमान अविभाज्याचे गतिशास्त्र ” ( Quantum Mechanics ) या नावाचे नवीन गतिशास्त्र विकसित झाले. याचा विकास देखील अमूर्त गणती संकल्पनांच्या आधारावर आला. या नूतन गतिशास्त्राने पदार्थ विज्ञानाच्या मूळ उद्देशातच परिवर्तन केले ! विज्ञानाच्या नियमांचा आधार घेऊन विश्वातील सर्व घटनांचा आणि घटकांच्या सद्यस्थितीत वेध घेऊन त्यांच्या भविष्याविषयी अचूक अनुमान आणि पूर्वकथन शक्य आहे आणि अशा नियमांचा शोध घेणे हाच विज्ञानाचा उद्देश आहे असे पूर्वी मानले जायचे. पण या नवीन गतिशास्त्राच्या अनुसार निसर्गात ( भौतिक विश्वात ) अनिश्चितता हि अंतर्निहित ( Inherent ) असून कोणत्याही घटनाक्रमाचे निश्चित पूर्वकथन हा विज्ञानाचा उद्देश असूच शकत नाही असा क्रांतिकारी उद्देशात्मक बदल करण्यात आला !


ही अनिश्चितता भौतिक जगाच्या रचनेचा घटक असलेल्या सूक्ष्म अणुकणांच्या संदर्भातली होती. जोपर्यंत ह्या अणुकणांचे निरीक्षण केले जात नाही तो पर्यंत त्यांचे अस्तित्व पदार्थकण की तरंग-समूह ( wave-packet ) ह्या संभाव्यतेच्या द्वैतात धूसर झालेले असते. ह्या स्थितीत ( जेंव्हा निरीक्षण होत नसते ) असे अस्तित्व दोन निराळ्या संभाव्यतेचे एक अजब मिश्रण असते ज्याची कल्पना करणे शक्य नाही , त्यासाठी गणितासारख्या अमूर्त भाषेची मदत घ्यावी लागते. संभाव्यतेच्या या अजब मिश्रणाला तरंगांचे अमूर्त कार्यक्षेत्र म्हणता येईल ( विज्ञानाच्या भाषेत वेव्ह फंक्शन ) . मात्र ज्या क्षणी त्याचे योग्य वैज्ञानिक साधनांनी निरीक्षण कराल, त्याच क्षणी या अमूर्त कार्यक्षेत्राचे रूपांतर पदार्थ कण अथवा तरंगात झालेले दिसते. ह्याला वैज्ञानिक भाषेत म्हणतात वेव्ह फंक्शन कोलॅप्स ( आपण मराठीत म्हणू - अमूर्त संभाव्यतेचा प्रत्यक्ष स्थूलरूपांतर किंवा पतन ) . एका निरीक्षणाचे पर्यावसान कशात होईल ह्याचे अनुमान करतात येत नाही - हीच ती प्रसिद्ध “अनिश्चितता ” . पण अशी अनेक निरीक्षणे केली तर मात्र त्यांच्या पर्यवसानाची सांख्यिकी शक्यता ( Statistical Probability ) मात्र अतिशय अचूक रीतीने सांगता येते.


आइन्स्टिन “ अनिश्चिततेला निसर्गाच्या मूलभूत रचनेतला एक घटक ” समजण्याचा आणि पर्यायाने या नवीन गतिशास्त्राचा कट्टर विरोधी होता ( देव फाशांचा खेळ खेळत नाही ही त्याची उक्ती प्रसिद्ध आहे ) . त्याने आपलं उर्वरित आयुष्य ( १९२५ ते १९५५ ) याला पर्यायी संकल्पना शोधण्यात घालवली , पण त्यात तो यशस्वी झाला नाही. आज या नवीन गतिशास्त्राला अंदाजे एक शतक पूर्ण होईल, पण आजतागायत याचे खंडन करता येईल अशी निरीक्षणे किंवा संकल्पना समोर आलेली नाहीत, मात्र नवीन गतिशास्त्राचा पाठपुरावा करणारी आणि त्याच्या निष्कर्षांना दुजोरा देणारी मात्र असंख्य निरीक्षणे आज आपल्या समोर आहेत. सांगायचं मुद्दा हा, की आजचे विज्ञान अमूर्त भाषेवरच विसंबून आहे, आणि आजही या गतिशास्त्राच्या अर्थबोधनावर भाष्य ( Interpretation ) करणारे अनेक मतप्रवाह आज आहेत, पण एकवाक्यता मात्र नाही. वरील विवेचनाचे दोन बिंदूत सार सांगता येईल :


१) आधुनिक विज्ञानाला सूक्ष्म जगताचा वेध घेण्यासाठी अमूर्त भाषेचाच आधार घ्यावा लागतो आणि २) आधुनिक विज्ञान, भौतिक विश्वाच्या मूलभूत रचनेतच निश्चितता आणि अनिश्चितता यांचे मिश्रण असल्याचे मानते; आणि त्यातील घटनाक्रमाबाबत निष्कर्ष काढून अचूक अनुमान करणे अशक्य असून, त्या घटनाक्रमातील संभाव्यतेचे अचूक अनुमान करता येणाऱ्या नियमांचे संशोधन करणे , हेच आपले ध्येय मानते.


गणितीय प्रणालीतील अपूर्णता


निसर्गाची रहस्ये कल्पकता , तर्कशास्त्र आणि पदार्थ विज्ञानाच्या साह्याने उलगडण्याचा गणिताचा विशेष गुणधर्म आपण बघितला. पण त्याचबरोबर गणिताच्या अपूर्णतेचे प्रमेय ( Incompleteness Theorem ) देखील १९३१ मध्ये प्रसिद्ध गणिती कर्ट गोडेल ह्याने मांडले आणि सिद्ध केले आहे. गणितीय संकल्पना आणि प्रणाली ह्या एकाच वेळी संपूर्ण आणि सुसंगत असू शकत नाही , हे ते प्रमेय होते. म्हणजेच, विरोधाभास टाळायचा असेल, तर गणितीय प्रणाली ही संपूर्ण राहू शकत नाही. येथे अपूर्णतेत काय अभिप्रेत आहे ? तर अपूर्णता म्हणजे : कोणतीही गणितीय प्रणाली ज्या गृहीतांवर आणि तार्किक तत्वांवर आधारित असते, त्या प्रणालीत नेहेमीच अशी स्वयंसिद्ध विधाने अथवा समीकरणे उपस्थित असतात ज्यांना त्या प्रणालीच्या चौकटीत तुम्हाला सिद्ध करता येत नाही. गणितातले हे प्रमेय अतिशय मूलभूत आहे आणि कोणत्याही तार्किक प्रणालीची अपूर्णता ते स्पष्ट करते, आणि त्याहून महत्वाचे म्हणजे, ते गणिता-पलीकडल्या सूक्ष्म प्रेरणांकडे दिशानिर्देश करते असे मत ह्या प्रमेयावर प्रसिद्ध वैज्ञानिक रॉजर पेनरोज ह्याने व्यक्त केले आहे.


विज्ञानाची “ अनिश्चितता “ आणि गणितीय प्रणालीची “ अपूर्णता ” काय सुचवते ? - व्यापक आध्यात्मिक दृष्टिकोण


विज्ञान आणि गणित ह्यांचा डोलारा तर्क आणि बुद्धीच्या भक्कम पायावर उभा आहे. पण हा पाया खरोखर भक्कम आहे का ? तर्क आणि बुद्धीच्या साह्याने एखाद्या विषयाचा अभ्यास त्या विषयाचे छोटे छोटे सुटसुटीत भाग करून , त्या छोट्या भागांचे विलगीकरण करून होतो. विलगीकरण आणि विभाजन हे या अभ्यासाचे महत्वाचे तत्व आहे ( In English, this is called Reductionism ) . ह्यात पूर्णत्वाची हानी करून ते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न असतो. विज्ञान आणि गणितामध्ये ह्या पद्धतीने २००० वर्षे प्रगती करून त्या पद्धतीची परिसीमा गाठली आहे. जोपर्यंत अभ्यास भौतिक वस्तूंचा आणि नियमांचा होता, तोपर्यंत ही तुकडे करून विषयाची हाताळणी करण्याची पद्धत अत्यंत यशस्वी ठरली. २१ व्य शतकात विज्ञानाने आणि गणिताने भौतिक वस्तूंच्या मुळाशी असलेल्या ऊर्जांचा, मूलकणांचा , आणि त्यांच्यातील मूलतत्वांचा शोध सुरु केला , आणि आणि त्याचबरोबर त्यांना अनिश्चिततेचा आणि अपुर्णत्वाचा सामना करावा लागला. जोवर ही दोन शास्त्रे भौतिकतेच्या पृष्ठभागावर शोध-संशोधन करीत होती तोपर्यंत भेद करून शोधण्याची पद्धती उत्तम होती, पण भौतिकतेच्या मुळातील सूक्ष्म प्रेरणा आणि ऊर्जा यांचा शोध सुरु झाल्याबरोबर ही पद्धती अपुरी पडू लागली आणि त्या शास्त्रांना आपल्या संकल्पनांमधील “अनिश्चिततेची” आणि प्रणालींमधील “अपूर्णतेची ” जाणीव झाली.


त्याच बरोबर विज्ञान पद्धतीमध्ये “ वस्तुनिष्ठतेला “ अतिशय महत्व दिले गेले आहे. जसे कोणताही प्रयोग कोण्या व्यक्तीने केला याला महत्व नसून, तो प्रयोग कोणीही केला असो , पण विज्ञानाने प्रमाणित केलेल्या नियमांचे पालन करून केल्यास त्याचे निष्पन्न एकच असले पाहिजे , ह्याला महत्व आहे ; आणि असेच प्रयोग ग्राह्य मानले जातात. पण नवीन गतिशास्त्रात “ निरीक्षक सापेक्षता ” दिसून आली. तरीही, वैज्ञानिक “ निरीक्षण सापेक्षता ” हा देखील निसर्गाचाच नियम आहे हे अजूनही मान्य करत नाही. त्यासाठी वैज्ञानिकांनी निरीक्षक ( जाणीव असलेला ) आणि निरीक्षण साधन ( जाणीव नसलेले ) असा भेद करून वस्तुनिष्ठता अजूनही सार्वभौमच आहे असा आग्रह धरला आहे. खरे तर साधन निरीक्षणाला साह्य करते , पण निरीक्षण हे हे जाणीव असलेल्या निरीक्षकांशिवाय अर्थपूर्ण होऊच शकत नाही. म्हणून वैज्ञानिकांनी वास्तुनिष्ठतेचे सार्वभौमत्व त्यागून, काही निवडक कसोट्या वापरून व्यक्तिनिष्ठ निरीक्षणाला देखील मान्यता दिली पाहिजे. पण असे झालेले दिसत नाही. तसेच विभाजन पद्धती सर्वच बाबतीत उपयोगी पडेल हा आग्रह सोडून, समग्रतेची पद्धत ( holistic methods ) स्वीकारली पाहिजे. समग्र पद्धतीने विचार केल्यास उद्गमन प्रवृत्ती ( Emergent Behaviour ) असलेली निरीक्षणे आणि त्यासंदर्भातल्या अपूर्व वाटणाऱ्या घडामोडी ( जसे अवस्था स्थित्यंतर, स्फटिकांचे उद्गमन, चुंबकीय शक्तीचे उद्गमन इत्यादी ) यांचे स्पष्टीकरण होऊ शकते. काही वैज्ञानिक विभाजन पद्धती बरोबरच समग्र विचार आणि उद्गमन प्रवृत्तीची स्पष्टीकरणे यांनाही आता महत्व देऊ लागले आहेत. पण समग्र विचारप्रणाली किंवा साकल्य वाद , आणि सशर्त व्यक्तिनिष्ठता, ह्या पद्धतींबद्दल विज्ञानामध्ये अजूनही एकमत नाही.


मेहेरबाबांनी हृदयात ईश्वरी प्रेम आणि समर्पण जागृत करण्यावर भर दिला आहे. ह्या प्रेममार्गात समग्रता , ऐक्य, साकल्य-वाद ह्या सर्व तत्वांचे नैसर्गिक रीतीने उद्गमन होत असते. त्याचबरोबर , जेथे आवश्यक आहे तेथे वस्तुनिष्ठता आणि त्याचबरोबर योग्य ठिकाणी सशर्त व्यक्तिनिष्ठ श्रद्धा ह्याचीही सांगड ह्या प्रेममार्गात सहजपणे घातली जाते.


आधीच्या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे , विज्ञानाची प्रगती ही सरळ रेषेत न होता चक्राकार आणि नागमोडी होते , त्याचे हेच कारण आहे. कधी कधी तर एक चक्र पूर्ण करून विज्ञान पूर्वीच्याच स्थानावर आल्यासारखे वाटते, पण प्रत्यक्षात त्याने स्प्रिंग च्या पिच च्या दिशेने थोडीशी मजल मारली असते. अर्थातच ही नागमोडी प्रगती धीम्या गतीने होते आणि सूक्ष्म तथ्ये जाणून घेण्याच्या प्रयत्नात विज्ञानाची मजल केवळ सूक्ष्म जगाच्या सर्वात बाहेरच्या स्तरापर्यंत पोहचली आहे.


विज्ञानाला अधिक व्यापक अध्यात्मिक संदर्भात पाहण्याची गरज


मेहेरबाबांनी विज्ञान आणि हजारो वर्षांच्या सामूहिक परिश्रमाने केलेल्या त्याच्या उत्तुंग कामगिरीची दखल घेतली आहे. त्यांनी विज्ञानाला त्याज्य न ठरवता, त्याच्या उपलब्धीचा योग्य विनियोग करण्यावर भर दिला आहे. विज्ञानाचा योग्य उपयोग व्हायच्या आधी, विज्ञानाला आध्यात्मिकतेचा व्यापक संदर्भात स्थानापन्न करून पाहण्याची गरज मेहेरबाबांनी प्रतिपादित केली आहे. नवीन मानवता, विज्ञानाच्या वैश्विक नियमांना , मेहेरबाबांच्या प्रवचनाच्या प्रकाशात , व्यापक आध्यात्मिक संदर्भात बसवून , त्यातील तथ्यांचा आणि नियमांचा योग्य उपयोग, सर्वांच्या कल्याणासाठी करून घेणार आहे अशी ग्वाही अवतार मेहेर बाबांनी दिली आहे.

6 views0 comments

Recent Posts

See All

उत्पत्तीच्या कथानकावरील उपासनी महाराज आणि मेहेर बाबांचे भाष्य

आज रमदान ईद आहे (ईद-अल-फत्र) आणि मुस्लिम लोक महिन्याभराचे रमदान रोजे आजच्या उत्सवाने संपन्न करतात. हे रोजे आणि हा उत्सव मोहम्मद पैगंबरांनी स्वतः सुरु केलेली परंपरा आहे आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे क

Comments


bottom of page