अवतार मेहेर बाबा
काळजी करू नका, आनंदी रहा
मेहेर बाबा चरित्र
अवतार मेहेर बाबांचा जन्म २५ फेब्रुवारी, १८९४ रोजी पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव होते मेहेरवान शेरियार इराणी. आपल्या आयुष्याच्या ७५ वर्षांच्या काळात ते सतत कार्यरत होते. इ.स. १९११-१२ च्या सुमारास डेक्कन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी 'विश्वबंधु संघा'ची स्थापना केली होती. हजरत बाबाजान, सद्गुरु नारायण महाराज, हजरत ताजुद्दिन बाबा, साईनाथ महाराज व उपासनीमहाराज, हे मेहेरबाबांचे सद्गुरू पंचायतन होय. साईनाथ-महाराजांनी मेहेरबाबांना प्रथमदर्शनी 'परवरदिगार' असे संबोधले तर उपासनी महाराजांनी 'आदिशक्ती' म्हणून बाबांचा गौरव करून त्यांची आरती केली. या पाचही सद्गुरूंचे अंश आपल्या ठिकाणी आहेत, त्यांच्या कृपाशीर्वादांमुळेच आपणास ईश्वरीय सच्चिदानंद अवस्थेसह अखिल मायासृष्टीचे ज्ञान प्राप्त झाले, असे बाबा म्हणत. उपासनी महाराजांच्या आज्ञेनुसार, बाबा स्वतंत्रपणे कार्य करण्यास सिद्ध झाल्यावर, हळूहळू त्यांच्याभोवती शिष्य सहकारी जमू लागले. मेहेरबाबा या नावाचा अर्थ आहे, ' कृपासिंधू पिता'. हे नामाभिधान त्यांच्या त्या अनुयायांनीच त्यांना बहाल केले होते.
पुढे इ. स. १९२२ मध्ये शिष्यांना बरोबर घेऊन बाबांनी पुणे-मुंबई पदयात्रा केली. मुंबईत 'मंजिल-ए- मीम' या नावाच्या वास्तुत या शिष्यांसमवेत त्यांनी काही काळ वास्तव्य केले. तेथे त्यांनी आपल्या शिष्यांची आध्यात्मिक पूर्वतयारी करून घेतली.
मे, १९२३ मध्ये अरणगाव ( जि. अहमदनगर ) येथे त्यांनी आश्रम उभारला. त्यामुळेच या सर्व परिसरास 'मेहराबाद' असे म्हणतात. अरणगावच्या दलित वस्तीत त्यांनी शाळा चालविली; दवाखाना व इस्पितळ सुरू केले. इस्पितळातील कुष्ठरोग्यांना ते स्वतः अंघोळ घालत; रोग्यांचे मलमूत्र, कपडे ते स्वतः स्वच्छ करत. गावकरी बांधवांचे प्रबोधन व्हावे व त्यांच्यात चांगल्या चालीरीती रुजाव्यात म्हणून बाबा त्यांना हितोपदेश करत. ते अरण गावातील दलित बांधवांच्या घरी जात. त्यांच्या जात्यावर बसून दळणही दळत.
आपल्या आध्यात्मिक जागृतीच्या विश्व कार्याचे माध्यम म्हणून १० जुलै, १९२५ पासून पुढील ४४ वर्षे बाबांनी आमरण मौन पाळले. या काळात त्यांनी गोरगरिबांची, तसेच उन्मनी अवस्थेतील ईश्वरवेड्या मस्तांनची सेवा तर केलीच, शिवाय ईश्वरी प्रेम-प्रक्षेपणार्थ १३ वेळा विदेश-यात्राही केल्या. प्रसिद्धीची हाव न धरता ते तेथील लोकांत मिसळले. त्यांनी हजारो लोकांना दर्शन दिले, मुलाखती दिल्या व त्यांच्या अंतकरणात आपल्या दैवी प्रेमाचे सूक्ष्म स्वरूपात बिजारोपण केले. कारण, सर्व मानवजात त्यांना ईश्वरी प्रेमात एकत्र आणावयाची होती.
मेरे बाबा मौन होते, पण त्यांचे मौन बोलके होते. ते मौन आहेत असे त्यांच्या प्रेमीजनांना कधीही वाटत नसे. १९२५ मध्ये मौन सुरू केल्यावर, पुर्ण दीड वर्ष ते पाटीवर लिहून इतरांशी आपला संवाद साधत असत. त्यानंतर १९५४ पर्यंत वर्णाक्षर-फलकाच्या द्वारे ते आपला आशय व्यक्त करीत. त्यापुढील काळात मात्र, हाताच्या बोटांच्या विलक्षण खुणांनी व हावभाव करून आपले म्हणणे ते सादर करत.
मौनकाळात त्यांनी 'इनफिनाईट इंटेलिजन्स', ' डिस्कोर्सेस','गॉड स्पीक्स', ' गॉड टू मॅन अँड मॅन टू गॉड', ' लिसन ह्युमॅनिटी', 'लाईफ ॲट इट्स बेस्ट',' द एव्हरीथिंग अँड द नथिंग', वगैरे अनेक ग्रंथांची निर्मिती केली. त्यांचे हे साहित्य जगातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. तसेच, त्यांच्या चरित्रावर व कार्यावर विविध भाषांमध्ये साहित्य उपलब्ध असून त्यातील 'परफेक्ट मास्टर', 'अवतार', 'गॉड मॅन',' लॉर्ड मेहेर' ( २० खंड), 'ग्लिमसेस ऑफ गॉड मॅन' ( ६ खंड), इत्यादी ग्रंथ वाचनीय व संग्राह्य असे आहेत.
ईश्वर वेड्या 'मस्तां'साठीही त्यांनी ठीकठिकाणी आश्रम काढले होते. 'मस्त' म्हणजे ईश्वर प्रेमात धुंद झालेले व भोवतालच्या जगाचे भान पूर्णपणे विसरलेले उन्मत्त जीव. त्यांच्यातील सुप्त आत्मिक शक्ती व ऊर्जा यांचा प्रसार विश्वभर व्हावा म्हणून बाबांनी बराच काळ 'मस्त'सेवेचा उपक्रम केला. त्यांच्या 'मस्त' सेवेच्या या कार्यावर डॉ. विल्यम डॉन्किन यांनी 'द वे फेअरर्स' हा ग्रंथराज प्रसिद्ध केला आहे. तो वैशिष्ट्यपूर्ण, मनोरंजक व वाचनीय आहे.
इ. स. १९४९ ते १९५१ या दोन वर्षांत त्यांनी निवडक शिष्यांसह, केवळ ईश्वरावर अवलंबून राहून, भारतात पदयात्रा केली. अनासक्ती, असहायता, निरपेक्षता व सतत हसरा चेहरा, हे चतू:सूत्री या यात्रेचे ब्रीद होते. या काळात ते भिक्षा मागून उदरनिर्वाह करत. या संन्यस्त कालपर्वास त्यांनी नवजीवन ( New Life ) अशी संज्ञा दिली होती.
इ.स. १९५१ मध्ये हैदराबाद ते मेहराझाद ( माळवी पिंपळगाव, अहमदनगर)अशी ४० दिवस पदयात्राही त्यांनी केली होती. पदयात्रेच्या शेवटी त्यांनी मेहराझादमधील टेंबी टेकडीवर १० दिवस एकांतवास करून 'मनोनाशा'चे कार्य केले व अखेर धुनी पेटवून त्यांनी या कार्याची फलश्रुती सांगितली. त्यावेळी ते म्हणाले होते, ''जगातील सर्व धर्मांमधील कर्मकांड, विधीसमारंभ इत्यादी सर्व अनिष्ट प्रथा या ज्वालेत जळून खाक झाल्या आहेत.... ईश्वर सर्वव्यापी आहे... मन जेव्हा इच्छा, वासना, आकांक्षारहित ईश्वरी प्रेमाच्या अग्नीकुंडात भस्मसात होते, तेव्हाच असीम व अविनाशी परमात्मा प्रकट होतो.''
७ सप्टेंबर, १९५३ रोजी प्रियतम मेहरबाबांनी, आपण 'पुरुषोत्तम अवतार' असल्याची घोषणा केली. घोषणेत ते म्हणतात, ''मीच आहे तो परब्रम्ह परमात्मा; श्रेष्ठातील परमश्रेष्ठ..... मी कोणी महापुरुष, महात्मा, संत, योगी वा वली असा कोणी नाही....मी चमत्कार करू शकत नाही. बुद्धिवादी बुद्धीने मला जाणू शकत नाहीत.... अंत:करणात प्रेमबीज पेरून तुम्हाला आत्मजागृत करणे हे माझे कार्य आहे.... अवतार एकमेव असतो. निरनिराळ्या काळात तो झरथृष्ट, राम, कृष्ण, बुद्ध, ख्रिस्त, मुहम्मद इ. मानवी रूपांत जन्मास आला.'' १९५४ मध्ये नगरमध्ये झालेल्या 'दर्शन कार्यक्रमा'त त्यांनी सर्वांना हाक दिली, '' लोकहो, या, माझ्याकडे या.... मला येणे भाग होते व मी आलेलो आहे. "
मेहेर बाबा स्वतःला 'ईश्वर ' वा 'अवतार ' म्हणवतात, याबद्दल काही लोक नाखूष असत, असे असूनही संत गाडगे महाराज व महात्मा गांधीजींसारखे महापुरुष बाबांच्या सतत संपर्कात राहिले. संत गाडगे महाराजांनी तर नोव्हेंबर, १९५४ मध्ये पंढरपुरात जमलेल्या वारकऱ्यांपुढे घोषणा केली की "मेहेरबाबा साक्षात विठोबा, जगद्गुरु आहेत". उन्मनी अवस्थेतील 'मस्त' बाबांना पाहून आनंदाने नाचू लागत. काही मस्त म्हणत," मी अल्लाह पाहिला";"मला राम भेटला";"हा पहा, तो कृष्ण!"
१९५२ मध्ये अमेरिकेत व १९५६ मध्ये साताऱ्यात मेहेर बाबांना जिवावर बेतलेले मोटार अपघात झाले. या अपघातांमुळे त्यांचे शरीर खिळखिळे झाले होते. त्यात त्यांचे रक्त सांडले, शरीरावर जखमा झाल्या, जीभ फाटली, खुब्यावर फ्रॅक्चर झाले. पण तरीही हूं का चूं न करता त्यांनी आपले मौन अभंग राखले.या अपघातांची पूर्वकल्पनाही काही वर्षे अगोदर बाबांनी दिलेली होती. मानवतेच्या कल्याणासाठी आपले रक्त या धर्तीवर सांडणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. आपल्या एका संदेशातते म्हणतात," सामान्यतः माणूस यातना सहन करतो त्या स्वतःसाठी; सद्गुरु मनुष्यमात्रांसाठी; परंतु, अवतार विश्वातील समस्त प्राणीमात्रांसाठी मरणप्राय यातना भोगत असतो. "
नोव्हेंबर, १९५५ मध्ये महेर बाबांनी आपल्या भारतीय भक्तांसाठी महिनाभर 'सहवास कार्यक्रम' केला; पुढे १९५८ मध्ये विदेशातील भक्तांना त्यांनी आपला सहवास दिला. हे संस्मरणीय 'सहवास कार्यक्रम'म्हणजे भक्तांवरील त्यांच्या दैवी प्रेमाचा व आनंदाचा मुक्त वर्षाव होता. नोव्हेंबर, १९६२ मध्ये पुण्यात 'गुरुप्रसाद' या राजप्रासादात त्यांनी देश विदेशांतील आपल्या प्रियजनांचे स्नेहसंमेलन आयोजित केले होते. त्यात ५००० हून अधिक पाश्चिमात्य व पौर्वात्य भक्तजन उपस्थित होते. या प्रसंगी त्यांना उद्देशून बाबा म्हणाले, " जगातील सर्व धर्म घोषित करतात की, केवळ एक परमात्माच काय तो या विश्वसृष्टीतील सर्वांचा पिता आहे. तो पिता मीच आहे!" अध्यात्म व विज्ञान यांचा मिलाफ घडवून सर्व मानवजात एकत्र आणणे, यासाठीही आपले कार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
लक्षावधी लोकांना प्रियतम मेहरबाबांनी दर्शन दिले. दर्शनाच्या वेळी ते लोकांना बजावत, "माझ्या पायां पडणे, मला हार घालणे या क्षुल्लक गोष्टी आहेत. माझे खरे दर्शन म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. माझ्यासाठी फळे, हार-तुरे, भेटवस्तू कशाला आणता?.... अवतार म्हणजे मूर्तीमंत पूर्णत्व. मला हवे आहे ते तुमच्यातील अपूर्णत्व!"
"मी ईश्वर आहे तसेच तुम्हीही ईश्वरच आहात. परमेश्वराशिवाय दुसरे कोठेच काहीही नाही", असे सांगून मेहेरबाबा मानवाला आत्मजागृतीसाठी सत्य-प्रेम-प्रामाणिकपणाचा व त्यागाचा मार्ग दाखवितात. वेदांमधील ईश्वरासंबंधीचे ज्ञान आणि सुफी तत्त्वज्ञान यांचा सुरेख संगम बाबांच्या तत्वविवेचनात आढळतो. १९५६ मध्ये त्यांनी सुफी पंथाची सनद पुनर्जीवित केली. त्यामुळे आता जगातील सर्व सुफी बाबांच्या प्रेमात अडकले आहेत. विशेष म्हणजे, पाश्चिमात्य ख्रिश्चन-बाबाप्रेमीही मेहेरबाबांना आता ' 'ख्राइस्ट' असे म्हणू लागले आहेत.
मेहेर बाबांच्या एकूण तत्त्वज्ञानाचे वैशिष्ट्यपूर्ण सूत्र थोडक्यात असे सांगता येईल: ईश्वराशी एकरूप होणे हे जीवनाचे साध्य आहे. परमेश्वराच्या स्वतःला जाण्याच्या 'लहरी' मधून विश्वाची उत्पत्ती झाली व जीवात्म्याचा प्रवास सुरू झाला. 'अहं ब्रह्मास्मि'चा साक्षात्कार होईतो जिव्यात्म्याला उत्क्रांतीच्या अवस्थेमधून जावे लागते. त्यामुळे अतिसूक्ष्म वायुरूप द्रव्यापासून दगड, धातू, वनस्पती, किडे, मासे, पक्षी, पशु व मानवयोनी या प्रवर्गांतून जीवाला म्हणजेच जाणिवेला प्रवास करावा लागतो. तरीही उत्क्रांतीच्या या अवस्थांमध्ये गोळा केलेल्या संस्कारांच्या ( कर्मांचे ठसे ) ओझ्यामुळे जिवाला दैवी जाणवेपर्यंत पोहोचता येत नाही. म्हणून मनुष्ययोनीत जीव ८४ लक्ष जन्म-मृत्यू भोगल्यानंतर आंतरिक आध्यात्मिक मार्गातून पुढे प्रवास करू लागतो. या प्रवासात हळूहळू कर्मसंस्कारांचा विलय होत जातो व अखेर जीव आत्म्यापर्यंत येऊन पोहोचतो. त्याला आत्मबोध होतो. अखेरीस जिवात्म्याचा शिवात्मा होतो. हेच अंतिम सत्य आहे.
मध्यम उंचीचे मेहेरबाबा अतिव देखणे व निरागस होते, विनोदी होते सर्वांना ते हवेहवेसे वाटत. ते अविवाहित व मिताहारी होते. ते नेहमी पायापर्यंत रुळणारा सैल, सफेद सदरा व विशेष प्रसंगी कोट परिधान करीत. उतारवयात ते आपल्या केसांची वेणी घालत. आपल्या विशेष अशा वैश्विक व आध्यात्मिक कारणांसाठी ते काही तासांपासून प्रदीर्घ काळापर्यंतचे एकांतवास व उपवास करीत. वेळप्रसंगी जवळच्या शिष्यांनाही ते या कार्यात सहभागी करून घेत असत. आपल्या अवतार कार्याच्या पूर्ततेसाठी १९६६-६७ मध्ये ते 'गुरुप्रसाद' बंगल्यात तब्बल दीड वर्ष एकांतवासात होते. त्यानंतर ऑक्टोबर, १९६८ मध्ये त्यांनी जाहीर केले, "माझे अवतार कार्य शंभर टक्के पूर्ण झाले आहे."
'देवदक्षिणा' देण्याखेरीज श्रीबाबांनी पैशाला कधीही स्पर्श केला नाही. परधन व परस्त्री यापासून सर्वांनी नेहमीच अलिप्त राहण्यासाठी ते आग्रही असत. चमत्कार, धर्मविधी, कर्मकांड, बुवाबाजी इत्यादींच्या ते विरोधात होते. असे असले तरी, आपण स्वतः कोणी मोठे गुरु आहोत, असा हेका बाबांनी कधीही धरला नाही. ते म्हणत, "मी तुम्हाला आत्मजागृत करण्यासाठी आलो आहे, शिकविण्यासाठी नाही. त्यामुळे मी कोणतेही विधिनियम घालून देत नाही."
प्रेम, प्रामाणिकपणा व सेवाभाव यांवर त्यांचा भर होता. मेहेरबाबा प्रेमस्वरूप होते. ते जगले फक्त प्रेमासाठी. सर्वांवर त्यांनी उदंड प्रेम केले. आपल्या प्रेमीजनांनी सतत आपले नामस्मरण करावे यासाठी त्यांचा आग्रह असे. "माझ्यापेक्षाही माझ्या नामात खूप शक्ती आहे, म्हणून मी माझे स्वतःचे नामस्मरण अखंडपणे करत असतो," असेही त्यांनी म्हटले आहे. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्तीमार्ग व समाजसेवा इ. ईश्वराकडे जाणाऱ्या मार्गांचे त्यांनी विवरण केलेले आहे. परंतु त्यांचा खरा भर प्रेम मार्गावर, नामस्मरणावर व प्रत्यक्ष शुद्ध आचरणावर होता. ते म्हणत, "ईश्वर हा उपदेश करण्यासाठी नव्हे, तर आचरणात आणण्यासाठी आहे.... ईश्वर स्वतंत्र आहे. प्रेमाने व नामस्मरणाने त्याला जाणता येते.... आयुष्याचे साध्य काय तर ईश्वरप्राप्ती. ईश्वर जर आहे तर, नक्कीच त्याला प्राप्त केले पाहिजे. सद्गुरू कृपेने आपण नक्कीच त्याला प्राप्त करू शकतो. माझ्यावर अंत:करणपूर्वक प्रेम करा, मी दिलेल्या आज्ञा पाळा. ईश्वरप्राप्तीचा हा सोपा मार्ग आहे."
३१जानेवारी १९६९ रोजी माध्यन्ही त्यांचे देहावसान झाले. देह सोडण्याच्या काही तास अगोदर त्यांनी आपल्या शिष्यांना निक्षून बजावले होते, "मी म्हणजे हे शरीर नव्हे". आठवडाभर म्हणजे ७ फेब्रुवारी पर्यंत त्यांचे पार्थिव मेहराबादेतील समाधीस्थानात ठेवले होते. तेथेच त्यांचे दफन करण्यात आले. निर्वाणाच्या ४० वर्षे अगोदर हे समाधिस्थान त्यांनी बांधून घेतले होते. समाधिमंदिराच्या छताच्या चारही कोपऱ्यांवर हिंदू, इस्लाम, पारशी, ख्रिश्चन, या धर्मांची प्रतीके कोरलेली आहेत. तसेच प्रवेशद्वारावर 'Mastery in Servitude' ( सेवकत्वातील स्वामित्व ) असे ध्येयवाक्य कोरलेले आहे.
फेब्रु. १९५८ मध्ये झालेल्या ऐतिहासिक सहवास कार्यक्रमात प्रियतम मेहर-बाबांनी या समाधिस्थानाचे असाधारण महत्त्व सर्वांना सांगितले होते. त्यावेळी ते म्हणाले होते,"मी माझे शरीर सोडल्यानंतर, माझे पार्थिव या समाधीत विश्रांती घेईल. साऱ्या जगासाठी माझी समाधी व मेहराबादचा परिसर एक महत्त्वपूर्ण पवित्र तीर्थक्षेत्र होईल. आणखी ७० वर्षांनी या परिसराचा विकास होऊन, येथे एक मोठे शहर उदयास येईल. त्यावेळी समाधीच्या पूजेसाठी व दर्शनासाठी जगभरातून ईश्वरभक्तांची व तत्त्वज्ञानी विद्वानांची गर्दी लोटेल....""मी देह सोडल्यानंतर शंभर वर्षांपर्यंतच्या काळात जे कोणी या समाधिस्थानाचे दर्शन घेतील, त्यांना माझ्या प्रत्यक्ष दर्शनाचाच लाभ होईल.... मात्र, माझे निवासस्थान प्रत्येकाच्या हृदयातच असेल," असेही बाबांनी निक्षून सांगितले आहे.