top of page

मेहेरबाबांच्या शब्दांचा भावार्थ , आकलन , अन्वयार्थ, अध्यात्म आणि विज्ञान , सृष्टी उत्पत्ती कथानक

वैज्ञानिक विश्वोत्पत्तिशास्त्राचा जन्म आणि विकास गेल्या सव्वाशे वर्षात ( म्हणजेच या अवतारकालात ) झाला आहे. मेहेरबाबांनी देखील “ सृष्टीच्या उत्पत्तीचे कथानक “ ह्या विषयाला आपल्या अवतारकालात विशेष प्राधान्य दिले आहे. दोन निराळ्या प्रवाहातून उत्पत्तीचा विचार होऊनही दोन्हीमध्ये विलक्षण साम्य आणि एक समांतर अनुक्रम दिसून येतो . म्हणून या विषयाला तीन भागात विभागणे सोयीचे होईल - अ ) समानता , ब ) अनुक्रम आणि क ) वेज्ञानिक मर्यादा आणि विज्ञानाचे व्यापक अध्यात्मतत्वात समाकलन


अ ) समानता


समानता पाहण्यापूर्वी ह्या विषयांवर विज्ञानात गेल्या सव्वाशे वर्षात जे अभूतपूर्व संशोधन झाले आहे त्याचा आणि ह्या कथानकावर आपल्या अवतारकालात मेहेरबाबांची दिलेली स्पष्टीकरणे ह्या दोन्हीचा संक्षेपात विचार होणे आवश्यक आहे .

अ १ ) आधुनिक विज्ञानाची महाविस्फोट संकल्पना ( Big Bang theory ) : हा महाविस्फोट १३८०० कोटी वर्षांपूर्वी झाल्याचे शास्त्रज्ञांचे अनुमान आहे. ह्या महाविस्फोटानंतर अवकाश , काळ आणि भौतिक वस्तूंची निर्मिती झाली. प्रचंड वेगाने प्रसरण पावणारे विश्व आणि सर्व दिशांनी वैश्विक पार्श्वभूमीतुन उत्सर्जित झालेले एकसमान तरंग ह्या दोन वैज्ञानिक निरीक्षणांवर ही संकल्पना आधारित आहे.


अ २ ) दोन आधारभूत निरीक्षणे :


विश्वाचा पसारा काळाबरोबर वाढतो आहे, दूरच्या आकाशगंगा आपल्यापासून अधिकच दूर जात आहे हे १९२० च्या दशकातले निरीक्षण आहे . काळाबरोबर वाढत्या प्रवेगाने (Acceleration) वाढत जाणारा विश्व पसारा ( expansion of the Universe ), काळाची उलटी मोजणी केली तर , भूतकाळातील अतिशय घन , उष्ण आणि सूक्ष्मतम विश्वबिंदूकडे दिशानिर्देश करतो.

आपल्याकडे चारही बाजूंनी एकाच तापमामाचे आणि एकाच Wave Bandwidth चे ( तरंगलांबीचा बँड ) उत्सर्जन सतत येत असते , आणि ते आपल्यापासून अतिशय दूरवरून येते. चारही बाजूने येणाऱ्या ह्या उत्सर्जित तरंगांची समानता अतिशय आश्चर्यकारक आहे . म्हणून त्या तरंगांना Cosmic Microwave Background - वैश्विक सूक्ष्म तरंग लांबीचे पार्श्वभागीय उत्सर्जन असे म्हणतात. या पार्श्वभागीय उत्सर्जनाचा शोध १९६४ साली लागला . सर्व बाजूंनी एकसमान तरंग लांबीचे आणि एकाच उष्णतेचे पार्श्वभागीय उत्सर्जन हे देखील एके काळी ही सृष्टी आकाराने अतिसूक्ष्म होती आणि तिचे तापमान अतिउष्ण होते, घनता अमर्याद प्रमाणात मोठी होती ह्या अनुमानांकडे दिशानिर्देश करते .

अ ३ ) वैश्विक पार्श्वभागीय उत्सर्जनाची ( Cosmic Microwave Background Radiation ) विशेषता : वैज्ञानिक निरीक्षणद्वारे आढळून आलेला पार्श्वभागीय उत्सर्जनाचा विशेष म्हणजे तिच्यात आणि काळ्या वस्तूच्या ( Black Body Radiation ) उत्सर्जनातील समानता. कोणतीही काळी वस्तू प्रकाशलहरींचे उत्सर्जन करीत असते, आणि त्या उत्सर्जनाच्या तीव्रतेमध्ये ( Intensity ) आणि तरंगलांबीमध्ये ( Wavelength ) एक विशिष्ट नाते दिसून येते, जे सर्वस्वी , त्या वस्तूच्या तापमानाशी संबंधित असते. ह्यालाच Black Body Radiation असे म्हणतात , आणि ह्या उत्सर्जनाचा शोध १९०० साली मॅक्स प्लॅन्क यांनी लावला आणि त्याची परिणीती कालांतराने अविभाज्य एकक गतिशास्त्राच्या ( Quantum Mechanics ) विकासात झाली ; तर वैश्विक पार्श्वभागीय उत्सर्जनाचा शोध १९६४ साली लागला आणि त्याची परिणीती कालांतराने सृष्टीच्या आधुनिक उत्पत्तिशास्त्राच्या विकासात झाली. काळ्या वस्तूच्या उत्सर्जनाचा विशेष म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी ( वारंवारता ) आणि इंटेन्सिटी ( तीव्रता ) ह्यांचा आलेख एका तापमानासाठी एक विशिष्ट आकार घेतो. २.७२५ अंश केल्विन साठी तो आलेख खाली दिला आहे. वैश्विक पार्श्वभागीय उत्सर्जनाचे निरीक्षण करता हुबेहूब हाच आलेख दिसून येतो. कोणत्याही दिशेने निरीक्षण केले तरी ह्या आलेखात काहीच फरक दिसत नाही ( निरनिराळ्या दिशांमधून केलेल्या निरीक्षणात एक लाख भागात एक भाग इतका देखील अंशमात्र बदल दिसत नाही ! ). आधुनिक विश्वोत्पत्तिशास्त्राच्या संकल्पनेच्या मुळाशी वैश्विक पार्श्वभागीय उत्सर्जनाच्या आलेखाची आणि काळ्या वस्तूंच्या उत्सर्जनाची ( २.७२ केल्विन ) ही आश्चर्यकारक समानता आहे , जी सर्व दिशांमध्ये आढळून येते (isotropy).

( १९८९ मध्ये COBE उपग्रहातुन मोजलेले वैश्विक पार्श्वभागीय उत्सर्जनाचे निरीक्षण आणि एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकातीलकाळ्या वस्तूंच्या उत्सर्जनाचे - Black Body Radiation - संशोधन @ २.७२५ अंश केल्विन साठी - ह्यांच्यातील समानता दाखवणारा आलेख )


म्हणूनच वरील दोन आधारभूत निरीक्षणांच्या प्रमाणावरून , उत्पत्तीच्या क्षणी सृष्टीचे सर्व भौतिक ऊर्जा आणि वस्तुमान अतिशय केंद्रित , उष्ण आणि बिंदूसमान घनतम अवस्थेत होते असा वैज्ञानिक निष्कर्ष आहे. ह्याच बिंदूचा महाविस्फोट होऊन ते प्रसरण पावले, थंड झाले आणि यथावकाश तारे, आकाशगंगा आणि असंख्य सूर्यमाला तयार झाल्या - ही महाविस्फोट संकल्पना आहे .


महाविस्फोट संकल्पना हे देखील सांगते की विश्वाची उत्पत्ती ही एक अपूर्व घटना असून ( Singularity ) स्फोटानंतर विश्वाचे जे प्रसरण झाले ( आणि आजही होत आहे ) त्यामागे कोणतीही बाहेरची ऊर्जा अथवा इंधन नव्हते, तर त्या वेळेला उपलब्ध असलेले पदार्थ आणि ऊर्जा ह्यांच्या मध्ये परस्पर रूपांतर होऊन हे प्रसरण झाले . ह्याचाच अर्थ ऊर्जा आणि पदार्थ ह्यांच्यात अंतर्गत अन्योन्य क्रिया हीच प्रसरणाला कारणीभूत आहे.

अ ४ ) वाढत्या प्रवेगाने प्रसरण पावणारे ( फुगणारे ) विश्व ( Inflationary Universe ) : विश्वाचे प्रसरण होत आहे हा शोध १९२० च्या दशकातच लागला होता . पण त्या वेळेला महाविस्फोट संकल्पनेला इतर कोणताही खात्रीलायक आधार नव्हता. तो आधार १९६४ मधील वैश्विक पार्श्वभागीय उत्सर्जनाच्या निरीक्षणानंतर प्राप्त झाला. विश्वाचे प्रसरण होत आहे ह्या निरीक्षणा नंतर वैज्ञानिकांची अपेक्षा होती की कालांतराने ह्या प्रसरणाचा वेग गरुत्वाकर्षण कमी करेल , किंवा काही काळानंतर हे प्रसरण आकुंचनामध्ये परिवर्तित होईल. पण १९९८ मध्ये दूरच्या सुपरनोवा ( स्फोटक तारा ) च्या निरीक्षणानंतर दिसून आले की , प्रसरणाचा वेग कमी न होता अधिकच वाढतो आहे ! ह्या आश्चर्यकारक शोधानंतर वैज्ञानिकांना “ काळी ऊर्जा ” नावाच्या नवीन उर्जेला गृहीत धरणे भाग पडले. ही ऊर्जा दूरच्या आकाशगंगांवर गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध ( Anti Gravity ) कार्य करते इतकेच सध्या माहित आहे. ती कशी तयार होते याबद्दल वैज्ञानिक कायासच करीत आहेत. एक अनुमान असे आहे की ही काळी ऊर्जा अवकाशाचा ( निर्वात प्रदेशाचा ) मूलभूत गुणधर्म आहे . निर्वात अवकाशात ऊर्जा ( Vacuum Energy or Zero Point Energy ) कशी असू शकेल ह्याला आजतागायत निश्चित उत्तर नसले तरी अविभाज्याच्या गतिशास्त्रात ( Quantum Mechanics ) त्याबाबत अनेक कयास मात्र केले जात आहेत .

अ ५ ) यापुढे आपण मेहेरबाबांनी उत्पत्तीच्या कथानक संदर्भात सूचक विधाने उद्धृत केली आहेत . ( ही ईश्वरवाणी आणि काहीच नाही आणि सर्व काही ह्या दोन ग्रंथांमधून घेतली आहेत ). त्यानंतर ह्या मेहेरबाबांच्या वचनांची आणि वर दिलेल्या चार वैज्ञानिक तत्वांची समानता समजण्यास मदत होईल. ह्या समानतेचे विशिष्ट बिंदू प्रत्येक वचनानंतर कंसात दिले आहेत .खाली दिलेली मेहेरबाबांची विधाने आणि आधुनिक विज्ञानाची निरिक्षणे आणि निष्कर्ष ह्यांच्यातील समानता आश्चर्यकारक आहे , कारण दोन्ही विधानांची पार्श्वभूमी पूर्णपणे निराळी आहे आहे - विज्ञानपद्धतीचा पाया स्थूल माध्यमांतुन केलेल्या विश्वातील अनेक निरीक्षणांचा वस्तुनिष्ठ अभ्यास आहे , तर मेहेरबाबांची विधाने अध्यात्मिक दृष्टीने सृष्टीच्या उत्पत्तीच्या मुळाशी असलेल्या कारणांची चर्चा करताना आणि विशेषतः जाणिवेच्या विकासाची मीमांसा करताना केलेली आहेत .

अ ६ ) ईश्वर वाणीमधील पृष्ठ क्रमांक ९ , आद्य उर्मी संदर्भात - ह्या अतिशय परिमित बिंदूमधून आद्य उर्मी ( जी अतिशय सीमित होती ) प्रकट झाली , आणि त्यातून अनंताची सावली किंवा छाया ( जी छाया किंवा सावली सत्य अस्तित्वाची असल्यामुळे अनंत होती ) हळू हळू दिसू लागली . ह्या अव्यक्त ( अप्रकट किंवा गुप्त ) आद्य उर्मीच्या प्रकटीकरणाच्या अतिशय परिमित बिंदूला “ ओम बिंदू ” असे म्हणतात आणि हा बिंदू असीमित आहे ( स्थानसीमित आहे पण तो सर्व दिशांमध्ये आणि सर्वीकडे व्यापला आहे ) . .. प्रतिकूलतेच्या अनुभवामुळे अनंत आत्म्याच्या अनादी , अविभाज्य स्थिरतेत स्थित्यंतर आले , आणि त्याच वेळेस , एक प्रकारचा उद्रेक झाला , आणि त्यामुळे अनंत अचेतन आत्म्याच्या अविभाज्य समतोलामध्ये प्रथम जाणिवेची किंवा चेतनेची गर्भधारणा झाली , आणि ह्या प्रथम चेतनेबरोबरच सकृतदर्शनी आत्मा परमात्म्याच्या अविभाज्य अवस्थेतून विभक्त झाला

( परिमित बिंदूतून ( ओम बिंदू ) आद्य उर्मी प्रकट झाली आणि हा परिमित बिंदू असीमित आहे हे

ईश्वरवाणीमधले विधान अतिशय गहन आहे. “ परिमित “ शब्दाचा अर्थ आहे हा बिंदू स्थळ-काळाच्या पारिमितीत बद्ध आहे , तर हा बिंदू “ असीमित ” आहे ह्याचा अर्थ आहे तो परात्पर परब्रह्माच्या अनंत महासागरात सर्व दिशांमध्ये दृग्गोचर असून सर्वदूर त्याचे अस्तित्व आहे . वैज्ञानिकानीं निरीक्षण केलेले वैश्विक पार्श्वभागीय उत्सर्जन ज्या बिंदूतून होते , ते देखील आपल्यापर्यंत सर्व दिशांनी येतांना दिसते आणि एकच एक असते. तो बिंदू अतिशय सीमित , घन आणि उष्ण असला तरी तो सर्वीकडे ( असीमित ) असल्याचा निष्कर्ष ह्या निरीक्षणामुळे लावावा लागतो. प्रसरण पावणाऱ्या विश्वाची उलटी कालगणना केली तर ते दूरच्या भूतकाळात सीमित बिंदू सारखे लहान होते , हे समजते , तर सर्व दिशांनी येणारे सामान उत्सर्जन हा बिंदू सर्वत्र पसरला आहे ह्याकडे दिशानिर्देश करते . आपण एखाद्या फुग्याची कल्पना केली तर तो एका सीमित आकारातून मोठा होतो , आणि फुग्यावरील पृष्ठभागात तुम्ही कोठेही असला तरी इतर सर्व भाग दूर जात असल्याचा अनुभव येतो. म्हणूनच विज्ञान ह्या बिंदुचा जो स्फोट होतो त्याला ” अपूर्व ” घटना असे संबोधतात. मेहेरबाबा ह्यालाच “ ओम बिंदू “ म्हणतात आणि त्याची अपूर्वता “ परिमित “ आणि “ असीमित “ अशा दोन परस्पर विरोधी अर्थाच्या वाटणाऱ्या शब्दांच्या प्रयोगाने व्यक्त होते. “ ईश्वरवाणी ” ह्या पुस्तकात स्फोट ऐवजी मेहेरबाबा उद्रेक हा शब्द वापरतात . ( तर “ काहीच नाही आणि सर्व काही ” ह्या पुस्तकात विस्फोट आणि अमर्याद संघर्ष हे शब्द वापरले आहेत ) खरोखर , मेहेरबाबांच्या आणि वैज्ञानिकांच्या स्पष्टीकरणारील समानता थक्क करणारी आहे . )

अ ७ )काहीच नाही आणि सर्वकाही ” मधून , पृष्ठ सहा , भाग एक , प्रकरण - महासागर : “ जेंव्हा उर्मी ( लहर ) आली , तेंव्हा प्रशांत आणि स्तब्ध महासागरात प्रचंड ढवळाढवळ झाली , आणि दोन विरुद्ध अवस्था - सर्व काही आणि काहीच नाही यामध्ये तसेच ज्ञान आणि अज्ञान यामध्ये अमर्याद प्रमाणात परस्पर क्रिया आणि संघर्ष दिसून आला . ह्या संघर्षातून अमर्यादित स्वरूपाच महाविस्फोट दिसून आला , ज्याला आद्य सुरुवात म्हणतात. ( Nothing and Everthing मध्ये Infinite Clash आणि Explosion हे शब्द वापरले आहेत , ज्याचा अनुवाद मराठीत अमर्याद संघर्ष आणि महाविस्फोट असा केला आहे . )


“ ईश्वरवाणी ” पुस्तकामध्ये सृष्टीची उत्पत्ती सर्व साधारण जीवात्म्याच्या दृष्टिकोनातून वर्णन केली आहे , तर “ काहीच नाही आणि सर्व काही ” ह्या पुस्तकात सृष्टीची उत्पत्ती पहिल्या जीवात्म्याच्या , अवताराच्या वैश्विक दृष्टिकोनातून वर्णन केली आहे - म्हणूनच सर्वसाधारण जीवात्म्याच्या संदर्भात उद्रेक - Clash -हा शब्द आला आहे तर वैश्विक संदर्भात अमर्याद महासंघर्ष आणि स्फोट - Infinite Clash and Explosion हे शब्द आले आहेत ) ह्या महाविस्फोटाचा परिणाम अज्ञानावर बघायला मिळाला , कारण ज्ञानावर कशाचाही परिणाम होऊ शकत नाही. ( ज्ञान जाणते असते , ते सर्व काही असते ) . तर या उलट अनंत अज्ञान असंख्य सीमित अज्ञानांमध्ये विस्फ़ोटित झाले , कारण अज्ञान अजाणते होते , “ काहीच नाही ” अवस्थेत होते. ”

( ‘ काहीच नाही ’ आणि ‘ सर्व काही ’ सुरुवातीला एकच होते आणि त्यांचे विभाजन होऊन त्यांच्यात ओम बिंदूमढे संघर्ष झाला आणि विश्वाच्या उत्पत्तीचा स्फोट झाला असे मेहेरबाबा स्पष्ट करतात. मेहेरबाबांच्या साहित्यात , विरुद्ध अवस्थांमधील - ‘सर्व काही’ विरुद्ध ‘काहीच नाही ‘ , प्राण (ऊर्जा ) विरुद्ध आकाश ( मूलकण ) - ह्यामधील अमर्याद संघर्ष किंवा महाविस्फोट ह्याचा अनेकदा उल्लेख आला आहे . आधुनिक विज्ञानात महाविस्फोटाच्या मुळाशी आणि सतत वाढत्या वेगाने होणाऱ्या प्रसरणाच्या मुळाशी काळी ऊर्जा किंवा zero point energy ( शून्यातून निर्माण होणारी ऊर्जा ) किंवा Vacuum Energy ( निर्वातातून किंवा काहीच नाही मधून येणारी ऊर्जा ) असल्याचे अनुमान केले जात आहेत. विज्ञानात वस्तुमान आणि ऊर्जेच्या परस्पर परिवर्तनाचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विस्फोटक ऊर्जेचा शोध १९३० आणि १९४० च्या दशकात लागला होता आणि त्या प्रचंड ऊर्जेचा विध्वंसक प्रयोग देखील १९४५ साली जगाने बघितला आहे . पण विज्ञानात “ काळी ऊर्जा ” , “ शून्य बिंदू ऊर्जा ” किंवा “ निर्वात ऊर्जा ” अस्तित्वात असल्याचे निश्चित अनुमान विसाव्याच्या शतकाच्या अखेरीचे आहे . ही ऊर्जा वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होणारी अणू ऊर्जा नव्हे . विज्ञानाला सध्यातरी काळी ऊर्जा अनाकलनियच आहे , आणि एका कयासाप्रमाणे ही ऊर्जा अवकाशाच्या निर्वात प्रदेशातून ( मेहेरबाबांच्या भाषेत शून्यतेतुन किंवा ‘ काहीच नाही ’ मधून ) निर्माण होते . खरे पाहता मेहेरबाबांची स्पष्टीकरणे अतिशय स्पष्ट आणि निर्णायक भाषेत दिली गेली आहेत, आणि विज्ञानाची वाट या बाबतीत अंधारीच आहे. तरीदेखील , वरील विवेचनावरून वैज्ञानिक आणि मेहेरबाबांच्या अध्यात्मिक स्पष्टीकरणामध्ये विलक्षण साम्य पुन्हा एकदा समोर येते. )

अ ८ ) काहीच नाही आणि सर्व काही मधून , पृष्ठ ३१ , भाग एक , प्रकरण - परात्पर परब्रह्म अवस्था : “ परात्पर परब्रह्म अवस्थेतील अनंत महासागरात सर्व काही आणि काहीच नाही ह्या दोन्ही अवस्था होत्या , त्यामध्ये अनंत ऊर्जा ( प्राण ) आणि अनंत अवकाश ( आकाश ) दोन्ही आहेत. सर्व काही मध्ये ओम बिंदू असतो , ज्यातून “ काहीच नाही ची ” सुरुवात झाली - ह्या सुरुवातीने मर्यादित “ सर्व काहीच्या ” उत्क्रांतीचे स्वरूप घेतले आणि हे मर्यादित सर्व काही आद्य महासागरात सुप्त स्वरूपात होते. महासागरात ज्ञान असते , पण महासागराला त्याची जाणीव नसते , ही अचेतन अवस्था त्याचे ( महासागराचे ) आद्य अज्ञान असते . जेंव्हा लहर उचंबळून आली , तेंव्हा महासागरात बुडबुडे तयार झाले , आणि काहीच नाहींच्या महासागरातील प्रत्येक थेम्ब प्रश्न विचारू लागला “ मी कोण आहे ? ” , “ मी कोण आहे ? ” . ह्या बुडबुड्यांच्या लाटेत अवकाश आणि ऊर्जा ह्यांच्यामध्ये प्रचंड मोठा संघर्ष सुरु झाला , ह्यातून एक प्रचंड मोठी चळवळ , प्रचंड मोठी हालचाल सुरु झाली , ज्याचा परिणाम सर्व काहींवर झाला. तो परिणाम म्हणजेच सर्व काहींच्या महासागरात प्रत्येक थेम्ब विचारू लागला “ मी कोण आहे ? ” , “ मी कोण आहे ? ” अ ९ ) काहीच नाही आणि सर्व काही पृष्ठ ३४ - भाग एक , प्रकरण - परात्पर परब्रह्म अवस्था : ऊर्जा ( प्राण ) आणि आकाश ह्यांचा संघर्ष सृष्टीच्या निर्मिती पूर्वी झाला होता ( महाविस्फोटाच्या पूर्वी ) तसेच तो सृष्टीच्या निर्मिती नंतरही होत राहिला , आणि ह्या संघर्षाचे मूळ कारण आहे इच्छा - वासना. सृष्टी निर्मितीच्या पूर्वी - तेज ( अग्नी ) , प्राण ( ऊर्जा ) आणि आकाश ओम बिंदूच्या जवळच प्रकट झाले. ह्या सर्व शक्ती ( आणि संभावना ) लहरींतून निर्माण झाल्या. ( येथे विश्वाच्या प्रसरणामागचा वेग आणि प्रवेग आणि त्यामागची ऊर्जा कोणती आहे याचे रहस्य मेहेरबाबा उलगडतात . या वेग - प्रवेगा मागची मूळ उर्मी ही परात्पर परमेश्वराच्या ( महासागराच्या ) आत उसळलेली जाणीव प्राप्त करून घेण्याची लहर आहे . ह्या लहरींमुळे समुद्रात प्रचंड उलथापालथ होऊन असंख्य बुडबुडे निर्माण होतात . हे बुडबुडे म्हणजे असंख्य जीवात्मे आणि आणि ह्या असंख्य लहरी म्हणजे विविध आकाशगंगा - ज्या एकमेकांपासून वेगाने दूर जातांना दिसतात . ह्या सर्वांचे मूळ कारण स्वतःची ओळख प्राप्त करून घ्यायची उर्मी. महाविस्फोटाच्या पूर्वी काय होते ह्या प्रश्नाला अद्याप विज्ञान आपल्या व्याप्तीतील प्रश मानीत नाही . ) अ १० ) काहीच नाही आणि सर्व काही मधून पृष्ठ ३४ ; भाग एक , प्रकरण : परात्पर परब्रह्म अवस्था : “ स्थूल बुडबुड्यांची निर्मिती ही ऊर्जा ( प्राण ) आणि आकाशाच्या ( अवकाश ) ह्यांच्या मुळ संघर्षाची पुढे विस्तारणारी परिणीती आहे , कारण अवकाश आता स्थूल रूपात असते , आणि ऊर्जा आता स्थूल रूप घेते. म्हणूनच ऊर्जा आणि आकाशाच्या संघर्षाची सर्वात तीव्र अवस्था स्थूल जगतात पाहायला मिळते ( ह्याचे प्रात्यक्षिक आपल्याला सुपरनोव्हा - Supernovae - म्हणजेच स्फोट पावणाऱ्या तार्यामध्ये बघायला मिळते ) . अशा रीतीने स्थूल सृष्टीमध्ये तारे , आकाशगंगा , ग्रह इत्यादींची सातत्याने उत्क्रांती होत असते . ” ( मूळ विश्वाचा पसार जेंव्हा अस्तित्वात आला , त्यामागे महाविस्फोट होता ज्यामुळे सृष्टीचा कमालीच्या प्रवेगाने विस्तार झाला. पण सृष्टीच्या उत्पत्ती नंतरही हा विस्तार वाढत्या वेगाने होतोच आहे हे मेहेरबाबा इथे स्पष्ट करतात. -[ अ ९ ) पहा ]- वर्तमान युगातही हा विस्तार वाढत्या वेगाने होतोच आहे हे १९९८ पर्यंत विज्ञानाला ज्ञात नव्हते. १९९८ साली सुपरनोव्हाच्या ( स्फोटक तारा ) चा अभ्यास जेंव्हा वैज्ञानिकांनी केला तेंव्हा त्यांना हे कळले की विश्वाच्या विस्ताराचा वेग वर्तमानातही वाढतोच आहे ! हे अनुमान वैज्ञानिकांना आश्चर्य चकित करणारे होते कारण प्रस्थापित संकल्पाने नुसार प्रसारणाला वेग काही कालावधीनंतर गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने कमी करेल. पण निरीक्षणे उलट्याच दिशेला जात होती. मेहेरबाबांनी १९६७ - ६८ मध्ये काहीच नाही आणि सर्व काही ह्या पुस्तकात मात्र ह्या निरंतर चालू असणाऱ्या प्रारणाच्या प्रवेगाचा उल्लेख स्पष्टपणे केला आहे . -[ अ ९ ) पहा ]- ( संयोगाने मेहेरबाबांच्या १९६७-६८ मध्ये स्फोटक ताऱ्यांचा उल्लेख वर्तमानातही होत असलेल्या विस्ताराच्या संदर्भात केला आहे . ) ब ) अनुक्रम आतापर्यंत आपण विज्ञान आणि मेहेरबाबांनी दिलेले अध्यात्मिक ज्ञान या दोहोंतील विलक्षण समानता समजून घेतली . आता आपण विज्ञानाचे शोध नेमके कधी लागले आणि मेहेरबाबांकडून ह्या संबंधीची स्पष्टीकरणे कधी दिली गेली ह्या कडे नजर टाकू. ब १ ) विश्वोत्पत्ती कथानकात मेहेरबाबांनी दिलेल्या स्पष्टीकरणाचा अनुक्रम : सृष्टीच्या उत्पत्तीचंबाबाबत स्पष्टीकरणे मेहेरबाबांचे जे दोन प्रकाशित ग्रंथ आहेत “ ईश्वरवाणी ” आणि “ काहीच नाही आणि सर्व काही ” ह्यात प्रामुख्याने दिली आहे . ह्या पुस्तकांसंबंधी निवेदने मेहेरबाबांनी अनुक्रमे १९५४ /५५ ह्या वर्षी आणि १९६७-६८ ह्या वर्षी दिली आहेत. पण मेहेरबाबांनी स्वतःच स्पष्ट केले आहे की ह्या दोन्ही पुस्तकांचा मजकूर आणि इतरही माहिती मेहेरबाबांच्या अप्रकाशित हस्तलिखितात ( जे आजतागायत कोठे आहे हे एक रहस्यच आहे ) १९२५/२७ साली त्यांनी दिलेली होती. त्याचप्रमाणे मेहेरबाबांच्या इतरही पुस्तकांमध्ये ( टिफिन लेक्चर्स , Infinite Intelligence , आणि १९२०/३०/४० ह्या दशकातील अनेक नोंदी ज्या मेहेरबाबांच्या मंडळींनी संकलित केल्या होत्या आणि ज्यांचा समावेश त्यांच्या लॉर्ड मेहेर ह्या विस्तृत चरित्रात केला आहे ) सृष्टिनिर्मिती बद्दल माहिती विखुरलेली आहे. थोडक्यात ह्या विषयावरील बाबांची स्पष्टीकरणे १९२५ पासून दिली गेली आहेत. आणि हा विषय , ज्याच्यावर मेहेरबाबांनी वेळोवेळी “ उत्पत्तीचे कथानक - The Theme of Creation ” ह्या शीर्षकाखाली अनेकांना ध्यान करायला सांगितले होते , मेहेरबाबांच्या वैश्विक कार्यात एक महत्वाचा विषय होता - कारण या कथानकाचा त्यांनी वारंवार उल्लेख त्यांच्या अवतारकालात केला आहे . ब २ ) आता आपण आधुनिक विज्ञानात विश्वोत्पत्तिशास्त्राच्या विविध सिद्धांतचे शोध आणि निरीक्षणे कधी प्रकाशित झाले हे बघू : एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ( १९०० - १९५० ) विश्वोत्पत्ती संदर्भात दोन पर्यायी सिद्धांत वैज्ञानिकांच्या दोन गटांमध्ये पुरस्कृत करण्यात येत होते - विश्वाच्या स्थिर अवस्थेचा ‘ संतुलन सिद्धांत ’ आणि विस्तारित होणाऱ्या विश्वाचा ‘ महाविस्फोट सिद्धांत ’.

१९६४ नंतर “ महाविस्फोट सिद्धांताचे “ सबळ पुरावे मिळाल्यामुळे सर्वच वैज्ञानिकांमध्ये त्या संदर्भात एकमत झाले. ( वरील स्तंभ आलेखात ( महाविस्फोट किंवा Big Bang ह्या शब्दावलीचा उल्लेख किती वेळा झाला ह्याचा आलेख ) प्रस्थापित पाक्षिकात मिळालेल्या शब्द गणनेच्या आधारावर हेच दिसून येते. ) अंतरिक्षाचे दुर्बिणीद्वारे निरक्षण करून १९२० च्या दशकामध्ये हबल आणि इतर वैज्ञानिकांना असे आढळून आले की हे विश्व प्रसरण पावत आहे ; इतकेच नव्हे तर ह्या प्रसरणाचा वेग दूरच्या आकाशगंगांसाठी ( galaxies ) ज्यास्त आहे आणि जवळच्या आकाशगंगांसाठी कमी आहे. हे निरीक्षण दुरून येणाऱ्या प्रकाशाच्या तरंगलांबीच्या फेरफारातून - wavelength change - ( ज्याला डॉप्लर रेड शिफ्ट हे नाव आहे ) करण्यात आले. ह्या प्रसरणाकडे आकाशगंगांचा वेग अथवा गतिवर्धन ह्या दृष्टीने न बघता, अंतराळाच्या परिमाणाचे प्रसरण ( scale expansion of space itself ) ह्या दृष्टीने बघितले तरच दूरच्या आकाशगंगा अधिक गतीने दूर का जात आहेत हे समजू शकते. सामान्य माणसाच्या भाषेत याला आपण अंतराळाची ( Space ) नव निर्माण प्रक्रिया असे म्हणू शकतो. आणि हे नव निर्माण सतत चालू आहे!


१९६४ साली वैश्विक पार्श्वभागीय उत्सर्जनाचा ( Cosmic Background Radiation ) शोध लागला. १९५० ते १९८० च्या दशकांमध्ये अविभाज्य यांत्रिकिच्या क्षेत्रसिद्धांताचा ( Quantum Mechanical Field theory ) विकास झाला आणि “ महास्फोटाचा सिद्धांत “ - उपपत्तीय विकास आणि प्रायोगिक निरीक्षणे ह्या दोन्ही माध्यमातून प्रमाणित झाला. आणि १९९८ साली सुपरनोवाचे ( स्फोटक तारा ) निरीक्षण करून विश्वाच्या दुसऱ्या प्रसरणाचा शोध लागला . सध्याच्या युगात देखील विश्वाचा पसारा वाढत्या प्रवेगाने अधिकच मोठा होत आहे , हे ते आश्चर्यकारक संशोधन. ह्या संशोधनाच्या अनुषंगानेच “ काळी ऊर्जा ” ही विश्वाच्या वस्तुमान ऊर्जेच्या संपूर्ण अंदाजाच्या ७० % आहे हे दिसून आले . ब ३ ) कालानुक्रमाचे महत्व वर दिलेल्या दोन्ही कालानुक्रमावरून हे स्पष्ट आहे , की मेहेरबाबांची विश्वोत्पत्तीबद्दल दिलेली स्पष्टीकरणे वैज्ञानिक संशोधनाच्या आधीच दिली गेली आहेत ( काही स्पष्टीकरणे तर त्या त्या संशोधनाच्या अनेक दशके आधी दिली गेली आहेत ) . मेहेरबाबांनी स्वतः असे सांगितले आहे की ह्या अवतार युगात जी अभूतपूर्व वैज्ञानिक प्रगती झाली तिला अप्रत्यक्षपणे माझे अवतरणच जबाबदार आहे . ह्याचे कारण अधिक स्पष्ट करताना ते सांगतात : आपल्या सृष्टीत अब्जावधी आकाश गंगा ( Galaxies and nebulae ) आहेत . त्याहूनही अनेक पटीने ज्यास्त सूर्यासारखे तारे आणि त्यांच्या ग्रह माला आहेत. पण पृथ्वीसारखे ग्रह , जेथे उत्क्रांती मनुष्य योनीपर्यंत झाली आहे , त्यांची संख्या केवळ १८००० आहेत. त्यातील बहुतेक सर्वांमध्ये माणसांची बौद्धिक उन्नती पृथ्वीवरच्या मानवांच्या तुलनेने ज्यास्त झाली आहे. आपल्या पृथ्वीची विशेषतः अशी आहे की ह्या ग्रहावर बुद्धी आणि हृदयाची ( प्रेम करण्याची क्षमता ) संतुलित आहे , इतर ग्रहांवर केवळ बुद्धीची उन्नती झाली असून हृदयाची क्षमता जेमतेमच आहे. या अवतारकालात परग्रहावरील कित्येक जीवात्मे माझ्या सहवासासाठी , त्यांच्या नकळत आकर्षित होऊन, या पृथ्वीवर जन्माला येत आहेत. या युगातील अभूतपूर्व वैज्ञानिक विकासाचे हेच गमक आहे . क ) वेज्ञानिक मर्यादा आणि विज्ञानाचे व्यापक अध्यात्मतत्वात समाकलन वरील समानतेचे आणि क्रमवारीचे विश्लेषण विज्ञान आणि अध्यात्मिक ज्ञान ह्या दोन्हींच्या परस्पर संबंधांकडे दिशानिर्देश करते. पण दोहोंतील काही महत्वाचे भेद देखील पहिले पाहिजे . क १) विज्ञानाच्या केंद्रस्थानी असलेली वस्तुनिष्ठ वास्तवाची संकल्पना

आजवरचा विज्ञानाचा विकास वस्तुनिष्ठ निरीक्षणे आणि वास्तुनिष्ठतेच्या कसोटीवर आधारित संकल्पनांवर आणि अनुमानांवर आधारित आहे. नव्हे, विज्ञानाला वास्तुनिष्ठतेचा अट्टाहासच आहे असे म्हणता येईल. पण आधुनिक विज्ञानातच आज अशी निरीक्षणे समोर आली आहेत ( विशेषतः अति सूक्ष्म वस्तूचे विज्ञान म्हणजे अविभाज्याचे गतिशास्त्र किंवा Quantum Mechanics आणि अति विशाल वस्तूंच्या विज्ञान , म्हणजे विश्वोत्पत्ती आणि उत्क्रांतिशास्त्र किंवा cosmology , ह्या दोन्हीमध्ये ) , जी वस्तुनिष्ठतेच्या पलीकडे , व्यक्तिनिष्ठ जाणिवेकडे दिशानिर्देश करतात . उदाहरणार्थ कण आणि तरंग ह्या दोन्ही संभावना असलेल्या सूक्ष्म वस्तुच्या निरीक्षणानंतर अचानक एका निश्चिततेत होणारे परिवर्तन ( ज्याला Quantum Collapse म्हणतात ) , किंवा पूर्वी संबंधित असलेल्या दोन सूक्ष्म कणांमध्ये दूर गेल्यावर त्यांच्या परस्पर प्रतिसादात प्रकाश वेगालाही मागे टाकणारी अ-स्थानीय गुंतागुंत - ( Non Local Entanglement ) , आणि अतिविशाल विश्वाच्या पसाऱ्यातील दिशानिरपेक्ष समानता - Isotropy and Uniformity इत्यादी . ह्या सर्व निरीक्षणांचा अन्वयार्थ विज्ञानाला लावता येत नाही आणि ह्याचे मूळ कारण आहे विज्ञानाला अभिप्रेत असलेली आणि त्याच्या केंद्रस्थानी मानली गेलेली वस्तुनिष्ठ वास्तवाची ( Objective Reality ) संकल्पना . म्हणूनच अति सूक्ष्म विज्ञानाचे अनेक अन्वयार्थ लागूनही त्याबाबतीत वैज्ञानिकांमध्ये एकवाक्यता आज शंभर वर्षांनंतरही होऊ शकली नाही - त्यांच्या सहमती मध्ये नेहेमीच वस्तुनिष्ठतेचा अट्टाहास बाधा निर्माण करतो . क २ ) विज्ञानाचा अभूतपूर्व विकास होऊनही ९५ % जग विज्ञानासाठी काळोखा सामान ! विश्वोत्पत्ती आणि उत्क्रांतिशास्त्र या आधुनिक शास्त्रांमध्ये आज वर दिलेली अशी अनेक निरीक्षणे आहेत ज्यांचा योग्य अर्थ लावण्यासाठी काही अपरिहार्य गृहीते करावी लागतात - उदाहरणार्थ काळी ऊर्जा - Dark Energy आणि काळे वस्तुमान Dark Matter . काळी ऊर्जा “ काळी ” आहे कारण तिच्या उत्पत्तीबद्दल आणि तिच्या विलयाबद्दल काहीच कयास आज विज्ञानाजवळ नाहीत. काळे वस्तुमान “ काळे “ आहे कारण ते प्रकाश किरणांना काहीच प्रतिसाद देत नाही. हे वस्तुमान कुठून उत्पन्न होते आणि त्याचा विलय कसा होतो ह्याबद्दल काहीच सांगता येत नाही. विश्वाच्या संपूर्ण वस्तुमान- ऊर्जेच्या खजिन्यातील अंदाजे ६८% ऊर्जा ही काळी ऊर्जा आहे आणि वैश्विक वस्तुमान-ऊर्जेच्या अंदाजे २७% इतके काळे वस्तुमान आहे. विश्वाच्या खजिन्यातील उरलेली केवळ ५% इतकीच वैश्विक वस्तुमान-ऊर्जा वैज्ञानिकांना ज्ञात आहे आणि केवळ ५% वस्तुमान ऊर्जा वैज्ञानिकांना उपलब्ध आहे. उरलेले ९५% विश्व आजही विज्ञानाला अनाकलनीयच आहे . ह्याचाच अर्थ विज्ञान आज तरी विश्वपसाऱ्याच्या ९५% भागाबाबत अज्ञानच आहे. क ३ ) वैज्ञानिक मर्यादांबद्दल मेहेरबाबांनी दिलेले स्पष्टीकरण मेहेरबाबानी आपल्या प्रवचनात हे स्पष्ट केले आहे की ज्ञानप्राप्ती बुद्धीच्या माध्यमातून होऊ शकत नाही. इंद्रियांच्या माध्यमातून परमेश्वराला जाणणे हे कानाने पाहण्यासारखेच निरर्थक आहे. अध्यात्म ज्ञान प्राप्ती साठी अध्यात्मिक माध्यमाचा वापरच योग्य आहे. आणि अध्यात्मिक माध्यमे प्रेमाच्या , ऐक्याच्या माध्यमातून गवसतात, मन-बुद्धीच्या , अनेकतेच्या आणि विभाजकतेच्या माध्यमातून नव्हे . अध्यात्मिक माध्यमे व्यक्तिसापेक्ष आणि व्यक्तिनिरपेक्ष ह्या दोन्ही पद्धतींचा समन्वय साधतात. मेहेरबाबांच्या ईश्वर , सृष्टी निर्मिती , सत्य इत्यादींवरील भाष्यांमध्ये मेहेरबाबांनी असा समन्वय साधला असून जाणिवेचा विकास ह्यालाच सृष्टी निर्मिती आणि उत्क्रांतीच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. उत्क्रांती ही केवळ आकृती रूपांची नसून ती जाणिवेच्या विकासासाठी झाली ; निरनिराळी स्वरूपे , आणि जीव-प्रजाती ह्यांचा विकास हा केवळ जाणिवेचा विकास व्हावा ह्या साठी झाला आहे असे प्रतिपादन करतात. क ४ ) व्यक्ती निरपेक्षतेच्या आग्रहात जाणीव म्हणजे काय असते हा विज्ञानासाठी अवघड प्रश्न ( Hard Problem of Consciousness ) होऊन बसलेला आहे वैज्ञानिक प्रगती आज एका अतिशय महत्वाच्या वळणावर येऊन ठेपली आहे . आपल्या मर्यादांची जाणीव विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये होऊ लागली आहे . ह्याची काही उदाहरणे म्हणजे गणितातील गोडेलचा “ अपूर्णता सिद्धांत ” , अविभाज्याच्या गतिशास्त्रातील ( Quantum Mechanics ) अ-स्थानीयता आणि दोन मूलकणांतील काळ-स्थाना पलीकडे असणारा रहस्यमय आणि गुंतागुंतीचा संबंध आणि त्यातुन निर्माण होणारे वास्तुनिष्ठतेसंबंधीचे प्रश्न , मानसशास्त्रातील आणि संगणकशास्त्रातील जाणिवेचा अवघड प्रश्न ( Hard Problem of Consciousness ) , वैद्यक शास्त्रातील स्वयं प्रतिकारशक्तीवरच आक्रमण करणारे रोग , मूलकणांची निर्वात ऊर्जा अथवा शून्य-बिंदू-ऊर्जा ( Vacuum Energy or Zero Point Energy ) अशी किती तरी उदाहरणे सांगता येतील. ह्या सर्व जटिल प्रश्नांना आज तरी विज्ञानात ( अपूर्ण चोरमार्ग आणि उपाय असले तरी ) समर्पक उत्तरे नाहीत . आणि हे सर्व प्रश्न तेंव्हाच निर्माण होतात जेंव्हा ते शास्त्र स्वतःच्याच कार्यपद्धतीवर, अथवा स्वतःच्याच मर्यादांवर किंवा अपूर्णतेवर उत्तरे द्यायचा प्रयत्न करू लागते तेंव्हा , किंवा जेंव्हा ते ते शास्त्र स्वतःच्याच अस्तित्वाबद्दल प्रश्न उपस्थित करते तेंव्हा . क ५ ) विज्ञानाची स्वीकृती आणि त्याचे अध्यात्म तत्वात समाकलन आधुनिक विज्ञानाचा अव्हेर न करता मेहेरबाबांनी विज्ञानाला त्याच्या मर्यादेसकट स्वीकारले आहे. नव्हे, ह्या विज्ञान युगात वैज्ञानिक वृत्तीला चालना देऊन विज्ञानाला अंतर्मुख होण्यास मेहेरबाबांनी भाग पाडले आहे . अध्यात्मिक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन निर्माण करून , वैज्ञानिक तत्वांना ह्या समग्र दृष्टिकोनातून पाहण्यास प्रवृत्त करून , नव मानवाच्या हृदयात प्रेमाची जागृती करणे हे मेहेरबाबांच्या वैश्विक कार्याचे एक उद्दिष्ट आहे. म्हणून ते म्हणतात “ मी शिकविण्याकरिता नव्हे तर जागृत करण्याकरता आलो आहे

16 views0 comments

Recent Posts

See All

उत्पत्तीच्या कथानकावरील उपासनी महाराज आणि मेहेर बाबांचे भाष्य

आज रमदान ईद आहे (ईद-अल-फत्र) आणि मुस्लिम लोक महिन्याभराचे रमदान रोजे आजच्या उत्सवाने संपन्न करतात. हे रोजे आणि हा उत्सव मोहम्मद पैगंबरांनी स्वतः सुरु केलेली परंपरा आहे आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे क

コメント


bottom of page